माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे राजभवन, गोवा इथे प्रसारण
‘मन की बात’ हा लोकसंवादाचा सर्वात मोठा बिगर राजकीय आणि सकारात्मक कार्यक्रम असल्याचं, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे प्रतिपादन
पद्म पुरस्कार प्राप्त सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी, ब्रह्मानंद शंखवाळकर, विनायक खेडेकर यांच्यासह मन की बात मध्ये उल्लेख झालेले विविध कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित
Posted On:
30 APR 2023 6:05PM by PIB Mumbai
गोवा, 30 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी वरून प्रसारीत होणाऱ्या "मन की बात" या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचं, गोव्यात राजभवन इथे आज विशेष प्रसारण आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यासह, सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी, ब्रह्मानंद शंखवाळकर, विनायक खेडेकर, तसेच सागर नाईक मुळे आणि रांगोळी कलाकार गुरुदत्त वांतेकर हे गोव्यातील स्थानिक कलाकार, असे अनेक पद्म पुरस्कार विजेते उपस्थित होते. या कार्यक्रमात या सर्व उपस्थित पद्मविजेत्यांचा आणि पंतप्रधानांनी मन की बात च्या मागील भागात उल्लेख केलेल्या गोवेकरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सुमारे 400 जण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा देशावर विशेषत: आरोग्य, स्वच्छता आणि जलसंधारण या क्षेत्रांवर लक्षणीय सकारात्मक परिणाम झाल्याचं, या प्रसंगी बोलताना राज्यपालांनी अधोरेखित केले. राजकारण, जात, पंथ यांच्या पलीकडे जाणारा या कार्यक्रमाचा बिगर राजकीय दृष्टीकोन, या कार्यक्रमाला मिळालेल्या यशातला एक महत्त्वाचा घटक आहे अशा शब्दात त्यांनी मन की बात ची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात, पारंपरिक भारत आणि त्याची मूल्ये यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं, तसेच आधुनिक समृद्ध राष्ट्रासाठी एक दृष्टीकोनसुद्धा हा कार्यक्रम सादर करतो, असा राज्यपालांनी आवर्जून उल्लेख केला. संपूर्ण देशावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे देशाच्या विकासाला चालना देण्यात या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं सांगत, लोक संपर्काचा हा भारतातील सर्वात मोठा प्रसारण कार्यक्रम आहे अशा शब्दात त्यांनी "मन की बात" ची प्रशंसा केली. मन की बात हा कार्यक्रम, देशाने आजवर मिळवलेल्या सर्वात मोठ्या यशा पैकी एक असल्याचही त्यांनी नमूद केलं.
राज्यपाल म्हणाले की, "मन की बात" हे पारंपरिक भारताचे प्रतिबिंब आहे आणि या कार्यक्रमाद्वारे देश विकास साधत आहे. लोक संपर्काचा हा कार्यक्रम देशानं कमावलेलं सर्वात मोठं यश असल्याचही त्यांनी सांगितलं.
केंद्रीय संपर्क विभागाने आजच्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, 'मन की बात आणि आझादी का अमृत महोत्सव' या नावाने प्रदर्शनही आयोजित केले होते. या प्रदर्शनात, कार्यक्रमाच्या आजवरच्या 100 भागांमधील प्रेरणादायी क्षण तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील निवडक प्रसंग मांडण्यात आले. या प्रदर्शनात एका ध्वनिमुद्रण कक्षाची प्रतिकृती उभारण्यात आली, जिथे पाहुण्यांना छायाचित्र काढण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि आकाशवाणी पणजी मधील गतकाळातील पुरातन रेडिओ उपकरणं, तसेच संच मांडण्यात आले होते. ध्वनिमुद्रण कक्षाच्या प्रतिकृतीच्या आत, या पुरातन उपकरणांसह स्वतःचे छायाचित्र काढण्यासाठी अभ्यागतांनी छायाचित्र स्थळांवर गर्दी केली.
प्रदर्शनातील नोंदवहीत लिहिलेल्या अभिप्रायात, राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी, अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांचे कौतुक केले. या देशातील लोकांचं प्रबोधन करुन त्यांना प्रेरणा देण्यासाठी असे प्रयत्न कौतुकास पात्र आहेत, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
उज्वल भविष्यासाठी भारतीयांना प्रेरणा आणि उत्तेजन देण्यात मन की बात ने दिलेलं अभूतपूर्व योगदान, मन की बात च्या शंभराव्या भागाचा साजरा होत असलेला उत्सव म्हणजे एक पुरावा आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग, 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर प्रसारीत झाला आणि असंख्य भारतीय श्रोत्यांच्या जीवनात यशस्वी परिवर्तन घडवण्यात यशस्वी ठरला.
* * *
PIB Panaji | N.Chitale/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920959)
Visitor Counter : 153