विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लंडनच्या इंपीरियल कॉलेज महाविद्यालयात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 400,000 पाऊंड्सची शिष्यवृत्ती केली जाहीर

Posted On: 29 APR 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2023 

 

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतातील तरुणांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे, विशेषत: पंतप्रधान मोदींनी गेल्या 9 वर्षांत त्यांच्या मार्गातील अनेक अडथळे दूर केले आहेत आणि एक सक्षम वातावरण निर्माण केले आहे. यामुळे तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता येतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इंग्लंडची राजधानी लंडन इथल्या इंपीरियल कॉलेजला भेट दिली आणि महाविद्यालयातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या युवा-केंद्री धोरणांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी हा कदाचित सर्वोत्तम काळ असल्याचे सिंह यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंग यांच्या इम्पीरियल कॉलेज लंडनच्या भेटीच्या प्रसंगी महाविद्यालय व्यवस्थापनाने येथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 400,000 पाऊंड्सची शिष्यवृत्ती जाहीर केली असून यापैकी 50% शिष्यवृत्ती भारतातील महिला विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

पेनिसिलिन, होलोग्राफी आणि फायबर ऑप्टिक्स यासह इतर अनेक गोष्टी जगाला देणाऱ्या युरोपमधील सर्वात नाविन्यपूर्ण विद्यापीठाला भेट देण्याचा मला आनंद आहे, असे यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. 

इंपीरियल कॉलेज लंडन हे इंग्लंडमधील लंडनस्थित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. इम्पीरियल कॉलेज लंडन हे संशोधन परिणामांसाठी आणि संशोधन वातावरणासाठी इंग्लंडमध्ये प्रथम, तर संशोधन प्रभावासाठी रसेल विद्यापीठ समुहामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ही संशोधन केंद्र, 'मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन रोग आणि संबंधित स्थिती असलेल्या व्यक्तींनी दान केलेल्या केंद्रीय मज्जासंस्थेच्या ऊती नमुन्यांचा संग्रह' असणारी मल्टिपल स्क्लेरोसीस आणि पार्किन्सन्स टिश्यू बँक देखील आहे. या सोबतच हे संशोधन केंद्र इंग्लंडमधील सर्वात मोठी ब्रेन बँक संग्रह बनवणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. या केंद्रात सुमारे 1,650 मेंदू नमुन्यांच्या रुपात उणे 80ºC तापमानात साठवले जातात. हे नमुने जगभरातील 100 हून अधिक विविध संस्थांमध्ये संशोधन प्रकल्पांमध्ये वापरले जातात.

गेल्या पाच वर्षांत इंपीरियलमधील विद्यार्थ्यांनी 300 हून अधिक भारतीय संस्थांमधील भागीदारांसह सुमारे 1,200 संशोधन प्रकाशनांचे सह-लेखन केले आहे. संशोधन भागीदारांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर, भाभा अणु संशोधन केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा संस्थांचा समावेश आहे. या महाविद्यालयात सध्या 700 भारतीय विद्यार्थी आहेत आणि भारतात या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या 3,000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांचा समूह आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी सुमारे तासभर संवाद साधला. भारतातील तरुणांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. याचे विशेष कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत अनेक विद्यार्थ्यांच्या मार्गातील अनेक अडथळे दूर केले आहेत, अनेक प्रतिबंधक नियम आणि एक सक्षम वातावरण तयार केले आहे. यामुळे तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता येतील असे, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

भारतातील होतकरू तरुण विद्यार्थी म्हणून, इम्पीरियल कॉलेज लंडन हे तुमचे आयुष्यभर गुरुकुल राहणार आहे, परंतु त्याच वेळी तुम्ही भारतात परत यावे आणि येथून गोळा केलेले तुमचे सर्व ज्ञान आणि शिक्षण देशाला समर्पित करावे, असे डॉ. सिंह म्हणाले. डॉ. जितेंद्र सिंग इंग्लंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. 

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920751) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil