माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"मन की बात" ने भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरेप्रति सामान्य माणसाची रुची पुनरुज्जीवित केली


‘मन की बात @100’ वरील राष्ट्रीय परिषदेत ‘विरासत का उत्थान’ या विषयावर दुसरे सत्र आयोजित करण्यात आले

पंतप्रधान मोदी यांनी लोकांच्या दैनंदिन समस्यांचा सखोल विचार करून संस्कृती, परंपरा, लोककला आणि पर्यावरणाबद्दलची आवड पुनरुज्जीवित केली

Posted On: 26 APR 2023 4:57PM by PIB Mumbai

"मन की बात" या अत्यंत लोकप्रिय मासिक रेडिओ कार्यक्रमातले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन  आणि  त्यांनी लोकांशी साधलेला संवाद यामुळे भारताची समृद्ध संस्कृती आणि परंपरेप्रति सामान्य माणसाची रुची पुनरुज्जीवित झाली आहे. नवी दिल्ली येथे आज दिवसभर चाललेल्या “मन की बात @100” वरील राष्ट्रीय परिषदेत ‘विरासत का उत्थान’ (वारसा पुनरुत्थान) या विषयावरील दुसऱ्या सत्रात सहभागी झालेल्या पॅनेल सदस्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या या उपक्रमाने तळागाळातील लोकांना ओळख मिळवून दिली  आहे.
भारतातील सर्वात आवडते कथाकार आणि बिग एफएमच्या “यादों का इडियट बॉक्स” शोचे निवेदक निलेश मिश्रा म्हणाले, “‘मन की बात’ हा एक असाधारण उपक्रम आहे जो आपल्याला पुन्हा आपल्या मुळांकडे घेऊन जातो,”
‘सेव्ह द स्पॅरो’ मोहीम राबवणारे पर्यावरणवादी जगत किंखाबवाला म्हणाले की, आपण विकासाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, आपल्याला अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टींना बरोबर घेऊन जावे लागेल. "जेव्हा 2017 मध्ये पंतप्रधान मोदींनी सेव्ह द स्पॅरो मोहिमेचा आपल्या कार्यक्रमात उल्लेख केला, तेव्हा आमच्या कामाबद्दल जागरुकता वाढली आणि अगदी अमेरिका  आणि इतर देशांतील पर्यावरण कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले," असे ते म्हणाले.
तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार आणि पर्यावरणवादी रिकी केज म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी  या वर्षी जानेवारीमध्ये ‘मन की बात’ मध्ये आदिवासी संगीतकारांचा उल्लेख केला होता, ज्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  होते, आणि पुढच्या भागात, पंतप्रधान मोदींनी सुरसिंगार वादक जॉयदीप मुखर्जी आणि मँडोलिन वादक उप्पलापू श्रीनिवास या  कलाकारांचा उल्लेख केला, पंतप्रधान म्हणाले, "या वाद्यांनी नवीन प्राण  फुंकले आहेत." "मन की बात' द्वारे पंतप्रधानांनी भारतात जन्मलेल्या लोकसंगीताच्या  प्रकारांना मुख्य प्रवाहात आणले," असे ते म्हणाले.
पत्रकार आणि दूरचित्रवाणीवरील  वृत्तनिवेदिका  पल्की शर्मा म्हणाल्या की, महासत्ता बनण्यासाठी  संस्कृतीकडे चलन म्हणून पाहावे लागेल.
सर्पमित्रांची भूमी म्हणून जग भारताबद्दल  अजूनही संकुचित दृष्टीकोन बाळगतो, याबाबत खेद व्यक्त करत त्या म्हणाल्या, आपली समृद्ध संस्कृती आणि स्मारकांबद्दल अधिक बोलत असताना आपण तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनातील आपल्या उदयोन्मुख यशावरही लक्ष केंद्रित करायला हवे.    
 आरजे सिद्धार्थ कन्नन, जे सिड_के म्हणून प्रसिद्ध आहेत, ते म्हणाले, ‘मन की बात’द्वारे पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी मित्र आणि मोठ्या भावाप्रमाणे बोलत रेडिओची ताकद सिद्ध केली आहे. ऑस्करमध्ये भारतीय संगीताला अलीकडे मिळालेल्या यशाचा संदर्भ देताना, सिड_के म्हणाले, “भारताला भारताची कथा ऐकायची आहे.”
सत्राचा समारोप करताना निलेश मिश्रा  म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी भरड धान्यांप्रति रुची पुनरुज्जीवित केली.  “भरड धान्यांकडे आपण अनेक वर्षे दुर्लक्ष केले. जेव्हा पाश्चिमात्य देशांनी त्याला सुपर फूड म्हटले , तेव्हा आपल्या भरड धान्यांबद्दलच्या  प्रेमाला उमाळे आले. ” असे ते म्हणाले.

***

SushamaK/RajshreeA/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920117) Visitor Counter : 98


Read this release in: Punjabi , Hindi , Urdu , English