दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडले, टपाल कार्यालयांच्या माध्यमातून महिला सक्षमीकारणाचा मार्ग खुला
Posted On:
26 APR 2023 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज दुपारी संसद मार्ग इथल्या मुख्य टपाल कार्यालयाला भेट देऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) खाते उघडले. टपाल कार्यालयाच्या सर्वसामान्य ग्राहक म्हणून त्या खिडकी जवळ आल्या आणि खाते उघडण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. त्यांचे एमएसएससी खाते उघडण्यात आले आणि खिडकी मधेच संगणकाद्वारे तयार केलेले पासबुक त्यांना देण्यात आले.
यावेळी स्मृती इराणी यांनी टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि काही एमएसएससी आणि सुकन्या समृद्धी योजना खातेधारकांशी संवाद साधला. त्यांची ही कृती नक्कीच लाखो नागरिकांना पुढे येण्यासाठी आणि जवळच्या टपाल कार्यालयात आपले एमएसएससी आणि सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी प्रेरणा देईल. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या’ स्मरणार्थ, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर केली होती. मुलींसह महिलांचे आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे.
दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना दर तिमाहीला 7.5 टक्के चक्रवाढ आकर्षक व्याजदर देते.
यामध्ये दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह लवचिक गुंतवणूक आणि आंशिक पैसे काढण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.
ही योजना देशातील सर्व 1.59 टपाल कार्यालयांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून उपलब्ध करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 03 एप्रिल 2023 रोजी आपल्या ट्वीटर संदेशामधून या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
* * *
G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920075)
Visitor Counter : 176