आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पंतप्रधानांनी 'ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023' च्या 6 व्या परिषदेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले
भारताची आरोग्यविषयक प्राचीन दृष्टी सार्वत्रिक होती. आज जेव्हा आपण ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ म्हणतो तेव्हा तोच विचार कृतीत येतो: पंतप्रधान
पंतप्रधानांनी "गुणवत्ता , तंत्रज्ञान, ट्रॅक रेकॉर्ड आणि परंपरा" हे भारताचे सामर्थ्य अधोरेखित केले
"चांगल्या आरोग्याच्या भारताच्या कल्पनेचा अर्थ केवळ रोगमुक्त असणे नाही तर प्रत्येकासाठी निरामय आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे आहे"
“जेव्हा गुणवत्तेबाबत बोलले जाते , तेव्हा या बाबतीत जगाने भारतीय डॉक्टरांचा प्रभाव पाहिला आहे. भारतात आणि परदेशातही आमच्या डॉक्टरांचा त्यांच्या क्षमता आणि वचनबद्धतेसाठी मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो.
‘ग्लोबल साऊथचा आवाज’ या नात्याने, असे भविष्य जिथे आरोग्यसेवा ही सेवा आहे, व्यवसाय नाही अशा चांगल्या भविष्यासाठी आकांक्षा बाळगण्याची जबाबदारी उचलतो : डॉ मनसुख मांडविया
Posted On:
26 APR 2023 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे ऍडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 च्या 6 व्या परिषदेचे उद्घाटन केले.
‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेसह G20 अध्यक्षपदाच्या भारताच्या प्रवासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ही संकल्पना पूर्ण करतांना लवचिक जागतिक आरोग्य सेवा प्रणालींचे महत्त्व लक्षात आले. ते म्हणाले की, वैद्यकीय मूल्य पर्यटन आणि आरोग्य कर्मचार्यांची गतिशीलता हे निरोगी पृथ्वीसाठी महत्त्वाचे घटक आहेत आणि ‘वन अर्थ, वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया २०२३’ हा या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आजचा कार्यक्रम भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी जुळलेला आहे ज्यामध्ये असंख्य देशांचा सहभाग आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या भारतीय तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागधारकांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला.
जगाला अनेक सत्यांची आठवण करून देणार्या शतकातील एकेकाळच्या साथीच्या आजारावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, खोलवर जोडलेल्या जगात सीमारेषा आरोग्यविषयक धोक्यांना रोखू शकत नाहीत. त्यांनी असेही निदर्शनास आणले की जगातील दक्षिणेतील देशांना संसाधने नाकारले जाण्यासह इतरही विविध अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागला. “खरी प्रगती ही जनकेंद्रित असते.वैद्यकीय शास्त्रात कितीही प्रगती झाली तरी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या टप्प्यावर त्याचे फायदे मिळायला हवे” असे स्पष्ट करून मोदींनी आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वासू भागीदाराची अनेक राष्ट्रांची गरज असल्याचे अधोरेखित केले. लस आणि औषधांद्वारे जीव वाचवण्याच्या उदात्त कार्यात भारताला अनेक राष्ट्रांचा भागीदार असल्याचा अभिमान वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले. मेड-इन-इंडिया लसीची जगातील सर्वात मोठी आणि जलद कोविड-19 लसीकरण मोहीम आणि त्याच्या पुरवठा व्यवस्थेची उदाहरणे दिली. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये COVID-19 लसींचे 300 दशलक्ष डोस, यातून भारताच्या क्षमतेची आणि वचनबद्धतेची झलक दिसून आली आणि आपल्या नागरिकांसाठी चांगले आरोग्य शोधणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचा आपला देश विश्वासू मित्र म्हणून कायम राहील, असा पुनरुच्चार मोदींनी केला.
“भारताचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हजारो वर्षांपासून सर्वांगीण आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले की, भारतामध्ये योग आणि ध्यान यांसारख्या प्रणालींसह प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्याची मोठी परंपरा आहे, ही आधुनिक जगाला भारताची प्राचीन भेट आहे जी आता जागतिक चळवळ बनली आहे. त्यांनी आयुर्वेदाचाही उल्लेख केला जो निरोगीपणाची संपूर्ण शिस्त आहे आणि ते म्हणाले की ते आरोग्याच्या शारीरिक आणि मानसिक पैलूंची काळजी घेते. “जग तणाव आणि जीवनशैलीतील आजारांवर उपाय शोधत आहे. भारताच्या पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये यासाठी बरीच उत्तरे आहेत”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी भारताच्या पारंपारिक आहारासाठी बनवलेल्या भरड धान्याचाही उल्लेख केला आणि यात जगभरातील अन्न सुरक्षा आणि पोषण समस्यांना तोंड देण्याची क्षमता आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडविया, डॉ व्ही के पॉल, सदस्य (आरोग्य), नीती आयोग, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. डॉ. माणिक साहा यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला 7 देशांचे (बांगलादेश, मालदीव, सोमालिया, आर्मेनिया, भूतान, नायजेरिया आणि इजिप्त) आरोग्य मंत्री, आसामचे आरोग्य मंत्री केशब महंता, हिमाचल प्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ. धनी राम शांडिल आणि सिक्कीमचे पर्यटन मंत्री बेदू सिंग पंत देखील उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया म्हणाले की, "'दक्षिणेकडील देशांचा आवाज' म्हणून आम्ही आरोग्यसेवा ही सेवा असावी आणि व्यवसाय नाही, अशा चांगल्या भविष्यासाठी आकांक्षा बाळगतो. पंतप्रधानांच्या गतिशील नेतृत्वाखाली, भारत सरकारने कोविड-19 महामारीचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, जीवन रक्षक आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेतील मोठी तफावत दूर करतानाच सर्वांसाठी उपजीविका सुनिश्चित केली आहे.”
केंद्रीय मंत्री म्हणाले की “आयुष्मान भारताच्या चार मुख्य स्तंभांवर आधारित एक मजबूत आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारताने, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांची उभारणी, आरोग्य विमा कवच, डिजिटल आरोग्य आणि आरोग्य सेवा पायाभूत सुविधा श्रेणी सुधारणा यावर लक्ष केंद्रित करून, सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारला आहे.”
आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करण्यामधील उद्योगांच्या भूमिकेवर डॉ. मांडवीय यांनी भर दिला. ते म्हणाले, “उद्योग, नागरी समज आणि संघटनांचे हे एकत्रित प्रयत्न असून, यामुळे भारतीय किफायतशीर वैद्यकीय प्रवास क्षेत्राला आणखी चालना द्यायला मदत होईल, आणि भारताला ‘किफायतशीर वैद्यकीय प्रवासाचे’ ‘पसंतीचे ठिकाण’ बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकारायला मदत करेल”, ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी AHCI कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भेट देणाऱ्या सर्व सात देशांच्या आरोग्य मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चाही केली.
डॉ व्ही के पॉल यांनी नमूद केले की, भारताने "जागतिक वैद्यकीय गंतव्यस्थान" म्हणून जगभरात मजबूत पाय रोवले आहेत आणि भारतीय MVT बाजाराचा आकार सध्याच्या 5-6 अब्ज अमेरिकी डॉलर्स (USD) वरून 2026 पर्यंत 13 अब्ज USD पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
प्रा. डॉ. माणिक साहा म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, सर्वांसाठी संपूर्ण आरोग्य सेवा देणारी भारताची "एक पृथ्वी, एक आरोग्य" ही संकल्पना, आजारांचा प्रतिबंध करायला, उपचाराचा खर्च कमी करायला, अन्न सुरक्षा वाढवायला आणि प्राण वाचवायला मदत करेल.
प्रेम सिंह तमांग यांनी, किफायतशीर आरोग्य पर्यंटन मजबूत करण्यामधील आणि सार्वत्रिक आरोग्य कवच प्रदान करण्यामधील ABDM, HWCs, PMJAY इत्यादी सारख्या डिजिटल उपक्रमांचा सकारात्मक प्रभाव नमूद केला.
आपल्या G20 अध्यक्षते अंतर्गत महामारी निधीसाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराची जागतिक बँकेने प्रशंसा केली, आणि महामारीच्या काळात मजबूत भारतीय फार्मा पुरवठा साखळी आणि कच्च्या मालाची उपलब्धता याचा जगाला मोठा आधार होता, जो ‘जगाची फार्मसी’ या नावाला साजेसा होता, असे नमूद केले.
भारताने अशा जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आणि त्यासाठी भागीदार देशांना आमंत्रित केल्याबद्दल घाना आणि मालदीव यांनीही प्रशंसा केली.
आफ्रिका, मध्य पूर्व, CIS आणि SAARC सह 73 देशांमधील सुमारे 125 प्रदर्शक आणि 500 पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधींनी या शिखर परिषदेला आपली हजेरी लावली.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि अर्न्स्ट अँड यंग (EY) यांनी तयार केलेल्या “हेल्थकेअर बियॉन्ड बाऊंडरीज” नावाच्या धोरण मसुद्याचेही या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
सहाव्या AHCI परिषदेत देखील भागधारकांची चर्चा सत्रे आणि पॅनल चर्चा सत्रे आयोजित केली जातील.
* * *
G.Chippalkatti/Jaydevi PS/S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920029)
Visitor Counter : 136