अर्थ मंत्रालय
शांघाय सहकार्य आंतरबँक संघटनेची 19 वी बैठक गोव्यात संपन्न
भारत 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे : सचिव, वित्त सेवा विभाग
पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करताना भारताचे शाश्वत विकासाकडे लक्ष : व्यवस्थापकीय संचालक, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि.
Posted On:
26 APR 2023 5:58PM by PIB Mumbai
गोवा, 26 एप्रिल 2023
भारताच्या अध्यक्षतेखाली, शांघाय सहकार्य आंतरबँक संघटनेची (SCO IBC) ची 19 वी बैठक आज गोव्यात पार पडली. या बैठकीत डेव्हलपमेंट बँक ऑफ कझाकिस्तान, चायना डेव्हलपमेंट बँक, आरएसके बँक (किर्गिस्तान), हबीब बँक लिमिटेड (पाकिस्तान), व्हीईबी.आरएफ (रशिया), ताजिकिस्तान गणराज्य बचत बँक अमोनातबोंक आणि उझबेकिस्तानची नॅशनल बँक या बँकांच्या प्रतिनिधींची बैठकीला उपस्थिती होती.
परिषदेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) चे व्यवस्थापकीय संचालक पी.आर. जयशंकर यांनी जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे यश आणि एक मजबूत आणि सक्रीय लोकशाही म्हणून भारताचा निरंतर उदय यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, 2022 मध्ये भारताचा विकास दर 6.8% होता, जो अमेरिका, इंग्लंड (युके) आणि युरोप यासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकतो. जयशंकर यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे जलद डिजिटायझेशन, शाश्वत विकासाचे प्रयत्न आणि निर्यातीतील लक्षणीय वाढ यासंबंधी प्रतिनिधींना माहिती दिली. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची उभारणी करताना भारत शाश्वत विकासाकडे वेगाने वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले.
जयशंकर यांनी एससीओ आयबीसी सदस्यांमध्ये सहकार्याविषयीच्या चार क्षेत्रांचा प्रस्ताव ठेवला:
- सहकार्याचा विस्तार: सदस्य बँकांमध्ये सहकार्याचा विस्तार करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या दिशेने प्रयत्नांची आवश्यकता.
- अनुभव आणि कौशल्यांची देवाणघेवाण: एससीओ आयबीसी सदस्य बँकांमध्ये अनुभव, कौशल्य आणि कर्मचारी प्रशिक्षणाची देवाणघेवाण करण्यावर भर, या दिशेने सदस्य देशांनी सकारात्मक पावले उचलली आहेत.
- स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजांचे इलेक्ट्रॉनिक संकलन: संघटनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त एससीओ आयबीसी सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजांचे इलेक्ट्रॉनिक संग्रह तयार करण्याच्या उपक्रमास समर्थन.
- भागीदारी मजबूत करणे: एससीओ आयबीसीच्या कार्यकक्षेत सदस्य बँकांना भागीदारी मजबूत करण्यासाठी प्रोत्साहन.
केंद्रीय वित्त मंत्रालयांतर्गत असलेल्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांनी भारताची मजबूत आर्थिक स्थिती, आर्थिक पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रातील सुधारणा यामुळे भारताच्या विकासगाथेला कशी चालना मिळाली, हे आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी प्रधानमंत्री जन धन योजनेविषयी (PMJDY) सदस्य देशांना माहिती दिली, जी योजना 2014 मध्ये राष्ट्रीय आर्थिक समावेशन मिशन म्हणून सुरू करण्यात आली. आर्थिक सेवांपासून वंचित समाज घटकांपर्यंत आर्थिक सेवांचा विस्तार करण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम म्हणून पीएमजेडीवाय यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.
एससीओ आयबीसी परिषदेच्या बैठकीत हवामान बदलाबाबत वाढलेली संवेदनशीलता आणि शाश्वत विकासाची गरज यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले कार्बन उत्सर्जन कमी करुन 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे आणि ग्रीन हायड्रोजनचा जगातील अग्रगण्य उत्पादक आणि पुरवठादार बनणे यासह हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी भारताची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली.
एससीओ आयबीसीची 19 वी बैठक सभासद बँकांमधील सहकार्य, अनुभव आणि कौशल्यांची देवाणघेवाण आणि शाश्वत विकास उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या नव्या वचनबद्धतेसह संपन्न झाली. 2023-24 या वर्षासाठी शांघाय सहकार्य आंतरबँक संघटनेच्या परिषदेचे यजमानपद 'डेव्हलपमेंट बँक ऑफ कझाकिस्तान' कडे असणार आहे.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919919)
Visitor Counter : 153