सांस्कृतिक मंत्रालय
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एनएमएमएलतर्फे आयोजित पंतप्रधान व्याख्यान मालेतील दुसरे व्याख्यान दिले
Posted On:
25 APR 2023 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
पंतप्रधान संग्रहालयातर्फे आयोजित पंतप्रधान व्याख्यानमालेत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी 19 एप्रिल 2023 रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आधारित दुसरे व्याख्यान दिले. या व्याख्यानात नेहरू यांचे धार्मिक तसेच अध्यात्मिक दृष्टीकोन यावर भर देण्यात आला होता. आरिफ मोहम्मद खान यांच्या मते, सत्य परिस्थिती नेहरू यांच्याविषयी प्रचलित धारणांच्या अगदी विरुध्द होती आणि नेहरू यांच्यावर त्यांच्या तारुण्यात आणि नंतरच्या काळात देखील धर्म आणि अध्यात्म यांचा मोठा पगडा होता. धर्माच्या रितीरिवाजांच्या पासून मात्र ते नेहमीच लांब राहिले. आरिफ यांच्या मते, नेहरू यांचा स्व-स्वीकृत अज्ञेयवाद आणि आधुनिक होण्यासाठी परंपरांचे ओझे फेकून देण्यावर भर देण्यामुळे त्यांच्याविषयी गैरसमज झाले आहेत.
नेहरू यांनी 1922 मध्ये नैनी तुरुंगातून महात्मा गांधी यांना लिहिलेल्या पत्रांचे उदाहरण देत त्या काळात नेहरू कशा प्रकारे गीता, उपनिषदे आणि रामायण या ग्रंथांच्या वाचनात बुडून गेले होते हे सांगण्यावर आरिफ खान यांनी भर दिला. जर आपण ‘निष्काम कर्म’ म्हणजेच फळाची अपेक्षा न धरता केलेले कार्य हा गीतेने सांगितलेला सर्वोच्च धर्म मानला तर नेहरू हे अत्यंत धार्मिक माणूस होते कारण त्यांनी आयुष्यभर इतरांचे भले करण्यासाठी हेच तत्वज्ञान अनुसरले असा मुद्दा खान यांनी मांडला आहे.नेहरूंसारख्या व्यक्ती तसेच सर्वांचे अस्तित्व एकच मानणारी भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांना समजून घेण्यात लोक कमी पडतात कारण ते धर्म या गोष्टीला धार्मिकतेमध्ये रुपांतरीत करतात असे ठाम प्रतिपादन आरिफ खान यांनी केले.
नेहरूंच्या भारताचा शोध तसेच इतर लिखाणांचे उदाहरण देत राज्यपालांनी सांगितले की नेहरू हे भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्यावर मनःपूर्वक प्रेम करणारे होते आणि संस्कृत भाषा तसेच तिचा वारसा हा आपल्या सभ्यतेच्या केंद्रस्थानी असून याशिवाय आपण समृद्ध होणे तर दूरच पण जिवंत देखील राहू शकत नाही यावर नेहरूंचा विश्वास होता. आपल्या व्याख्यानामध्ये मोठ्या प्रमाणात गीता, उपनिषदेतसेच इतर साहित्यातील विधानांचे संदर्भ देऊन राज्यपाल खान यांनी नेहरू यांचे या साहित्याशी आणि एकूणातच धर्माशी असलेले सूक्ष्म संबंध दाखवून दिले.
हे व्याख्यान पंतप्रधान संग्रहालयाने सुरु केलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा एक भाग होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 20 जानेवारी 2023 रोजी या पंतप्रधान व्याख्यानमालेतील उद्घाटनपर व्याख्यान दिले होते.पंतप्रधान संग्रहालय ही स्वातंत्र्यप्राप्तीपासून पंतप्रधानपदाची जबाबदारी घेतलेल्या प्रत्येकासाठी दिलेली आदरांजली आहे आणि गेल्या 75 वर्षात प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या काळात आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे वर्णन करणारी नोंद आहे. हा सामुहिक प्रयत्नांचा इतिहास आहे तसेच भारताच्या लोकशाहीच्या सर्जनशील यशस्वीतेचा सशक्त पुरावा देखील आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात खुल्या झालेल्या पंतप्रधान संग्रहालयाने आतापर्यंत दिल्ली परिसरातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी हे संग्रहालय जनतेसाठी खुले झाल्यापासून ते 20 एप्रिल 2023 पर्यंत या संग्रहालयाला सुमारे साडेतीन लाख लोकांनी भेट दिली आहे.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919672)