कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी, 'शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून किनारी अर्थव्यवस्थेसाठी लॉजिस्टिक' या विषयावरील जी 20 पूर्व परिषदेला केले संबोधित
भारतीय युवावर्गासाठी लॉजिस्टिकस हे क्षेत्र गुंतवणूक, उद्योजकता आणि रोजगाराच्या दृष्टीने संधींनी परिपूर्ण आणि रोमांचक असेल - राजीव चंद्रशेखर
भारत लवकरच नील अर्थव्यवस्थेतील उत्पादने, अन्नपदार्थ आणि कृषीक्षेत्रासाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल - राजीव चंद्रशेखर
Posted On:
24 APR 2023 7:50PM by PIB Mumbai
भुवनेश्वर , 24 एप्रिल 2023
कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज तिसऱ्या शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकी (EdWG) अंतर्गत अशा प्रकारच्या फ्यूचर ऑफ वर्क प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन केले.
या उद्घाटन समारंभाला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव, अतुल कुमार तिवारी, सी आय आय चे पदनियुक्त अध्यक्ष आणि टी व्ही एस सप्लाय चेन सोल्युशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष, आर दिनेश आणि डेलॉइटचे भागीदार एन एस एन मूर्ती, उपस्थित होते.
ही परिषद लॉजिस्टिक्स, किनारी अर्थव्यवस्था आणि शाश्वतता यांच्या एकत्रित केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित करत आहे आणि किनारी अर्थव्यस्थेतील कौशल्याच्या संदर्भातील एक अविभाज्य घटक आहे, असे राजीव चंद्रशेखर यावेळी म्हणाले. भारतातील तरुणांसाठी सेमी कंडक्टर्स, इलेकट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांप्रमाणेच येत्या काही वर्षात लॉजिस्टिक्स हे क्षेत्र अमाप संधी घेऊन येईल, असे ते म्हणाले. या क्षेत्राला गुंतवणूक, उद्योजकता आणि रोजगारानिर्मितीमध्ये मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
आजचे जग हे सर्व दृष्टींनी लवचिक अशा लॉजिस्टिक्स क्षेत्राची मागणी करत असून विश्वसनीय पुरवठा साखळीच्या आधारे, जोखीम कमी करून विश्वासार्ह लवचिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. असे ते म्हणाले. त्यामुळे, ओडिशासारख्या किनारी राज्यांमध्ये लॉजिस्टिक्सवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यादृष्टीने चर्चा करणे महत्त्वाचे आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनाचे उदाहरण देऊन ते म्हणाले की 2014 मध्ये, भारतात वापरण्यात आलेले 82% मोबाईल फोन आयात केले गेले, तर 2022 मध्ये, भारतात वापरण्यात आलेले जवळपास 100% मोबाईल फोन भारतात तयार केले गेले. 2014 मध्ये भारताने जवळपास शून्य मोबाईल फोनची निर्यात केली होती आणि या वर्षात भारताने सुमारे 11 अब्ज डॉलर्सचे ऍपल फोन आणि भारतात बनवलेले सॅमसंग फोन निर्यात केले आहेत. अनेक दशकांपासून भारताबाबत एक युक्तिवाद असा होता की, भारताकडे जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची व्यवहार्य बाजारपेठ आणि क्षमता नाही कारण भारतात व्यवसाय करण्यासाठी लॉजिस्टिक्स किंमत स्पर्धात्मक नाही, मात्र आज जागतिक स्तरावरील प्रमुख कंपन्या भारतात सेमी कंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, मोबाईल आणि इतर अनेक उत्पादने तयार करत आहेत, भारतात निर्यात आणि विक्री करत आहेत, भारतातील हीच लॉजिस्टिक परिसंस्था आता अधिक कार्यक्षम बनली आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहु उद्देशीय संपर्क यंत्रणेसाठी अनेक उपक्रम हाती घेतले असून गती शक्ती, बृहद राष्ट्रीय आराखडा या योजनांमुळे आधुनिक लॉजिस्टिक परिसंस्थांची निर्मिती होईल ज्यामुळे ज्यामुळे भारत नील अर्थव्यवस्थेतील उत्पादने, अन्न आणि कृषी उत्पादनांसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असे त्यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभानंतर राजीव चंद्रशेखर यांनी सुमारे 70 प्रदर्शन आयोजकांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचे मनोधैर्य उंचावले. या आयोजकांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC), राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), युनिसेफ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था,राउरकेला, आयआयटी भुवनेश्वर, आयआयएम संबलपूर, सीव्ही रमण ग्लोबल इन्स्टिट्यूट, ओडिशा येथील स्टार्ट अप्स आणि इतर विविध क्षेत्रातील प्रमुख संस्था आणि संघटनांचा सहभाग होता. या प्रदर्शनामध्ये आधुनिक कार्यालयीन ठिकाण, भविष्यातील कौशल्ये आणि नाविन्यपूर्ण वितरण प्रारूपांमध्ये सतत नवनवीन शोध घेऊन भविष्यातील कामाच्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले होते.
फ्युचर ऑफ वर्क प्रदर्शनात, निमंत्रित आणि अतिथींनी कृषी, गतिशीलता आणि आरोग्य या तीन क्षेत्रातील भविष्यातल्या कामांविषयीची अनेक वैशिष्ट्ये पहिली. मेटावर्स, रिवर्स इंजीनियरिंग आणि स्वयंचलित डिजाइन समाधान, ड्रोन तंत्रज्ञान, एआर/व्ही आर चा वापर करून केलेल्या शिक्षण-तंत्रज्ञानविषयक उपाययोजना, प्रादेशिक शिक्षण आधारित तंत्रज्ञानविषयक उपाययोजना, व्हर्च्युअल इंटर्नशिप सोल्यूशन्स, सहाय्यक तंत्रज्ञान आणि सहाय्यक तंत्रज्ञान नवोपक्रमाचा समावेश आणि लाइव्ह डेमोसाठी सहाय्यक तंत्रज्ञान यांचा या प्रदर्शनात समावेश होता. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील शिक्षणविषयक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकी (EdWG) च्या अनुषंगाने, हे विशेष प्रदर्शन ओडिशामध्ये भुवनेश्वर, येथे आयएमएमटी सभागृहात 23 ते 28 एप्रिल या कालावधीत मांडण्यात आले आहे.
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919291)
Visitor Counter : 196