राष्ट्रपती कार्यालय
भारतीय कृषी संशोधन परिषद-राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या 19 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
24 APR 2023 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (24 एप्रिल, 2023) हरियाणातील कर्नाल येथे भारतीय कृषी संशोधन परिषद - राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या 19 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या देशाची अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यात दुग्धव्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात डेअरी क्षेत्राचा 5 टक्के वाटा आहे आणि भारतातील सुमारे 8 कोटी कुटुंबांना तो उपजीविका पुरवतो. त्यामुळे देशाच्या सर्वसमावेशक विकासात राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेसारख्या संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, गाय आणि इतर पशुधन हे भारतीय समाज आणि परंपरांचा अविभाज्य भाग आहेत. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने अधिक दूध देणाऱ्या म्हशी आणि गायींचे क्लोन तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे त्या म्हणाल्या.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे नेहमीच भारतीय आहार आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिले आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या . भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. मात्र दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय चांगल्या दर्जाच्या चार्याची उपलब्धता, हवामानातील बदलामुळे हवामानात होणारे बदल आणि पशुधनामध्ये होणारे रोग यासारख्या आव्हानांनाही दूध उत्पादन क्षेत्राला सामोरे जावे लागत आहे. दुग्धोत्पादन आणि दुग्धव्यवसाय शाश्वत बनवणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. पशु कल्याण केंद्रस्थानी ठेवून पर्यावरणस्नेही आणि हवामान-अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून डेअरी उद्योगाचा विकास करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था दुग्धशाळांमधील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाना प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच बायोगॅस उत्पादन सारख्या स्वच्छ ऊर्जेवरही ही संस्था भर देत आहे.
भारतातील डेअरी उद्योगाच्या व्यवस्थापनात महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यात हे क्षेत्र खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे राष्ट्र्पती म्हणाल्या. त्यामुळे त्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासात अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. महिलांना दुग्धव्यवसाय क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी सुलभ कर्ज आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919162)
Visitor Counter : 209