शिक्षण मंत्रालय
जी-20 शिक्षण कार्यगटाअंतर्गत भविष्यातील कार्यपद्धतीची झलक दाखवणाऱ्या अभिनव प्रकारच्या प्रदर्शनाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
एकविसाव्या शतकातील जगाच्या आकांक्षा पूर्ण करण्यात, भारत आघाडीची भूमिका पार पाडत आहे- धर्मेंद्र प्रधान
Posted On:
23 APR 2023 6:06PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते, आज शिक्षणविषयक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीअंतर्गत, एका अभिनव कार्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
प्रधान यांनी इथल्या 70 प्रदर्शकांना भेट दिली, त्यांच्या स्टॉलवरील कामांमध्ये रस घेऊन त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या प्रदर्शकांमध्ये, एनआयटी राउरकेला, आयआयटी भुवनेश्वर, आयआयएम संबलपूर, मायक्रोसॉफ्ट, मेटा, युनिसेफ, एनसीईआरटी यासारख्या विविध क्षेत्रातील प्रमुख संस्थांचा समावेश आहे. या संस्थानी भविष्यातील कामांसंबंधातील तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोग प्रदर्शनात मांडले आहेत. आधुनिक कार्यालयीन जागा, भविष्यातील कौशल्ये, आणि अभिनव डिलिव्हरी मॉडेल यांचा यात समावेश आहे. पहिल्या दिवशी प्रदर्शनाला 10,000 लोकांनी भेट दिली.
यावेळी आलेल्या पाहुण्यांना, तीन क्षेत्रातील भविष्यातल्या कामांविषयीचे प्रयोग बघता आले, यात, कृषी, वाहतूक आणि आरोग्यक्षेत्र, ड्रोन तंत्रज्ञान, एआर/व्ही आर चा वापर करून केलेल्या शिक्षण-तंत्रज्ञानविषयक उपाययोजना, चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक कौशल्ये, प्रादेशिक शिक्षण आधारित तंत्रज्ञानविषयक उपाययोजना, व्हर्च्युअल इंटर्नशिप सोल्यूशन्स यांचा या प्रदर्शनात समावेश होता. हे विशेष प्रदर्शन ओडिशातील भुवनेश्वर इथल्या CSIR-इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरिअल्स टेक्नॉलॉजी (IMMT) 23 ते 28 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर, प्रधान यांनी, तिसऱ्या शिक्षणविषयक बैठकीच्या आधीच्या एका सत्राला संबोधित केले. यावेळी, भुवनेश्वर इथल्या आयएमएमटी सभागृहात, भविष्यातील कार्यासाठी आवश्यक अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देत, डीप टेक या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, एकविसावे शतक हे ज्ञान-आधारित आणि तंत्रज्ञान प्रणित असेल. आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे मार्गदर्शन आणि गुणवत्तेचा नैसर्गिक खजिना असलेले, तसेच एक मोठी बाजारपेठ आणि संसाधने या सगळ्या बळावर, एकविसाव्या शतकात,भारत जागतिक आशा-आकांक्षांचे नेतृत्व करणार आहे, असे प्रधान यांनी सांगितले. केवळ पदव्या नाहीत, तर कौशल्य आणि क्षमता, हेच भविष्याचे दिशादर्शक ठरणार आहेत, असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताच्या युवा शक्तीला नोकरी शोधणारे नाही, तर त्यांनी नोकरी देणारे व्हावे, अशी आकांक्षा बाळगली आहे. जसजसे नवनवीन तंत्रज्ञान जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेत आहे, तसतसे आपणही नवे दृष्टिकोन बाळगत, युवकांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार करायला हवे, असेही प्रधान म्हणाले.
इंटरनेट, गतिशीलता आणि जागतिक संपर्क यंत्रणा आपल्याला आज जागतिक गरजा काय आहेत, हे समजून घेण्याची संधी देत आहे. भारतातील तसेच एकूणच ग्लोबल साउथ देशांमधल्या तरुणांसाठी ह्या संधीचे सोने करण्यासाठी आपण एकत्रित काम करायला हवे, असे आवाहन प्रधान यांनी केले.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919016)
Visitor Counter : 237