ग्रामीण विकास मंत्रालय
राष्ट्रीय पंचायती राज दिवस कार्यक्रमात 24 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते समावेशक विकास मोहिमेचा प्रारंभ होणार
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- समावेशक विकास या संकल्पने अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नऊ मोहिमांचा शुभारंभ
Posted On:
21 APR 2023 8:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून समावेशक विकास या संकल्पने अंतर्गत 24 एप्रिल 2023 रोजी मध्य प्रदेशात रेवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिवस कार्यक्रमात पंतप्रधान या नऊ मोहिमांचा शुभारंभ करणार आहेत. याच दिवशी पंतप्रधान “ समावेशी विकास” या वेबसाईट आणि मोबाईल ऍपचा देखील प्रारंभ करणार आहेत.
देशामध्ये ऑगस्ट 2023 पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव(एकेएएम) साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारे आणि विशेष करून सामान्य जनतेला सहभागी करून सरकारकडून विविध संकल्पनांतर्गत अनेक कार्यक्रम/ मोहिमा आयोजित करण्यात येत आहेत. समावेशक विकास ही एकेएएम अंतर्गत यापैकीच एक संकल्पना आहे. यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाकडे मुख्य जबाबदारी असून इतर चार मंत्रालये/ विभाग त्याला पाठबळ देत आहेत. या संकल्पने अंतर्गत असलेल्या नऊ मोहिमांपैकी मुख्यत्वे (i) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण(PMAY-G) अंतर्गत समग्र आवास, (ii) जिल्हा स्तरावर आर्थिक साक्षरता, (iii) ग्रामपंचायत पातळीवर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन आणि (iv) बचत गटांच्या(SHG) जाळ्यामध्ये पात्र ग्रामीण महिलांचे सामाजिक एकत्रिकरण, (v) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कायदा(मनरेगा) अंतर्गत नद्यांच्या काठावर वृक्षारोपण मोहीम या पाच मोहिमा ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत आहेत.
(i) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत ‘स्वस्थ महिला- समृद्ध समाज’, (ii) पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयांतर्गत पशुधन जागृती अभियान आकांक्षी जिल्ह्यात व्यापक जागृती मोहीम, (iii) पंचायती राज मंत्रालयांतर्गत स्वामित्व, मेरी संपत्ती, मेरा हक आणि (iv ) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत महिला बचत गटांसोबत नैसर्गिक शेती मोहीम या इतर चार मोहिमांचे नेतृत्व भागीदार मंत्रालये करत आहेत.
समावेशक विकास संकल्पने अंतर्गत निवड झालेल्या मोहिमांचा भर उच्च प्रभाव मूल्य आणि उच्च लोकसहभाग क्षमतेवर आहे. या मोहिमांच्या लाभार्थ्यांपर्यंत 100 टक्के पोहोच सुनिश्चित करणाऱ्या ‘ संपूर्ण समाज’ हा दृष्टीकोन ठेवण्याच्या दृष्टीने या मोहिमा तयार करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मोहिमेला “ समावेशी विकास” हे नाव देण्यात आले आहे. “अभिसरण” आणि “तळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे” या संकल्पनांमध्ये याची मुळे असून रोजगार निर्मिती, आरोग्य, सामाजिक समावेशन, सामाजिक सुरक्षा आणि उपजीविका निर्मिती यावर भर देत प्रत्येक सहभागी मंत्रालये/ विभागाद्वारे सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश, जिल्हे आणि ग्राम पंचायती यांच्या लक्ष्यित हस्तक्षेपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
या मोहिमांची माहिती संकलित करण्याच्या आणि त्यांच्या प्रगतीवर देखरेख करण्याच्या दृष्टीने “https://akam-samveshivikaas.nic.in” ही वेबसाईट तयार करण्यात आली असून 24 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय पंचायती दिवसाच्या निमित्ताने मध्य प्रदेशात रेवा येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते ती सुरू करण्यात येणार आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918638)
Visitor Counter : 242