कृषी मंत्रालय
पीक विशिष्ठ कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन वापरासंबंधी जारी केली मानक कार्यप्रणाली
कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर
Posted On:
20 APR 2023 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मार्गदर्शनासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये पीक विशिष्ठ कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन वापरासंबंधी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली. मंत्री तोमर यांनी "मशिनरी फॉर मिलेट्स प्रॉडक्शन,प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ऍडिशन (भरड धान्य उत्पादन,प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी यंत्रे)" या पुस्तिकेचे प्रकाशनही केले.यावेळी तोमर म्हणाले की, शेतीला आमचे प्राधान्य आहे, त्यामुळे संशोधन असो की योजना सुरू करणे, शेतीला चालना देणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे.आज कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. शेतकऱ्यांना या क्षेत्रामध्ये टिकवून ठेवण्यासाठी, नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवे, यासाठी कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे, या दिशेने सरकार निरंतर प्रयत्न करत आहे.
केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, कृषी क्षेत्रात नवीन आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळोवेळी रणनीती बदलण्याबरोबरच कार्यपद्धतीतही बदल करण्याची आवश्यकता आहे.
मंत्री तोमर म्हणाले की, ज्यावेळी आपण कोणतीही नवीन योजना हाती घेतो त्यावेळी तिचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही,याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. यामुळेच ज्यावेळी ड्रोन वापराची योजना बनवली जात होती, त्यावेळी सर्वसामान्य शेतकरी, सामान्य पदवीधरांनाही त्यात सामील करून घेण्यात आले. यामुळे ड्रोनचा वापर लहान शेतकऱ्यांनाही करता येईल. या दिशेने सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्रे अधिक कार्यक्षम बनविण्याच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की, कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये पदवी/पदव्युत्तर कृषी विद्यार्थ्यांसाठी जागरुकता सत्रांचे आयोजन करण्यात आले पाहिजे.विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये कोणत्या कामांमुळे रोजगार मिळू शकेल,याचा विचार केला गेला पाहिजे,याशिवाय स्वमालकीची शेती करण्यासाठी त्यांना सक्षम बनवले पाहिजे.ड्रोनचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी योजना आखली पाहिजे,असेही तोमर यावेळी म्हणाले.
S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918395)
Visitor Counter : 220