नागरी उड्डाण मंत्रालय
युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक शिखर परिषदेला नवी दिल्लीत प्रारंभ
जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या हवाई वाहतूक बाजारपेठेचा एक भाग होण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्योग धुरिणांना दिले आमंत्रण
Posted On:
20 APR 2023 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023
युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील दोन दिवसीय हवाई वाहतूक शिखर परिषदेला आज नवी दिल्लीत प्रारंभ झाला. या शिखर परिषदेदरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने युरो कंट्रोल सोबत इरादापत्राच्या घोषणेवर स्वाक्षरी केली आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, डीजीसीएने निकट सहकार्याच्या उद्देशाने युरोपियन संघ हवाई सुरक्षा संस्थेसोबत इरादा ज्ञापन पत्रावर स्वाक्षरी केली.

या शिखर परिषदेत युरोपियन संघ आणि भारतातील हवाई वाहुतक संबंध तसेच हवाई वाहतूक क्षेत्राचे कोविड पश्चात पुनरुज्जीवन, वाढती शाश्वतता, सुरक्षितता कायम ठेवणे, मानवरहित विमान प्रणाली विकसित करणे यासारखी परस्पर सामायिक आव्हाने तसेच संधी यावर विचारमंथन झाले.
केंद्रीय नागरी उड्डाण आणि पोलाद मंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या परिषदेला आभासी माध्यमाद्वारे संबोधित केले. भारत आणि युरोपीय संघामध्ये मजबूत ऐतिहासिक संबंध असून भौतिक स्वरूपात, डिजिटल पद्धतीने आणि विमान वाहतूक उद्योगाच्या सहाय्याने लोकांचा लोकांशी वाढलेल्या संपर्कामुळे हे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशांतर्गत विमान निर्मितीला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले. देखभाल, दुरुस्ती आणि तपासणी (MRO) करता पोषक वातावरण निर्मितीसाठी केंद्र सरकारने नियामक वातावरणात सुधारणा केली आहे - या सेवांवरील वस्तू आणि सेवा कराच्या दरात 18 टक्क्यांवरून 5 टक्के इतकी कपात केली असून या क्षेत्रात 100% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. व्यवसाय सुलभ वातावरण निर्मितीसाठी या सेवा पुरवणाऱ्या प्रदात्यांवर लावले जाणारे शुल्क तर्कसंगत करण्याच्या उद्देशाने नवीन MRO मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युरोपियन संघातील उद्योग धुरिणांनी या संधींचा लाभ घ्यावा आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या हवाई वाहतूक बाजारपेठेचे एक भाग व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी युरोपियन संघातील उद्योगांनी भारतासोबत भागीदारी करण्यासाठी सिंधिया यांनी त्यांना आमंत्रित केले आणि हवाई उद्योग क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन समस्येवर उपाय शोधण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन केले. 2024 पर्यंत हरित ऊर्जा वापरण्यासाठी आणि 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही विमानतळांना प्रोत्साहन देत आहोत, 2025 पर्यंत आणखी 121 विमानतळांना कार्बन तटस्थ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या विमानतळांसाठी आम्ही निविदा कागदपत्रांमध्ये अक्षय उर्जेचा वापर अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. आम्ही शाश्वत विमान इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही काम करत आहोत. इंडियन एअरलाइन्सने आधीच एव्हिएशन टर्बाइन इंधन ATF सह मिश्रित जैव -इंधन वापरून विमानांची प्रात्यक्षिक उड्डाणे केली आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात सांगितले.

S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918320)