आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी दुसऱ्या जी-20 आरोग्य विषयक कार्यगटाच्या बैठकीदरम्यान हवामान बदल आणि आरोग्याविषयी झालेल्या सत्राला केले संबोधित
हवामान बदलाचे संकट वाढण्यासाठी जबाबदार बाबी, आरोग्य क्षेत्राने टाळाव्यात आणि पशु-संलग्न आजारांबाबतच्या टेहळणीत वाढ करून आरोग्याबाबतची आपत्कालीन स्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे केंद्रीय मंत्री रूपाला यांचे आवाहन
मानव, पशु आणि पर्यावरण या सगळ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी, ‘एक आरोग्य’हा दृष्टिकोन महत्वाचा असल्याचा, जी-20 चे शेर्पा अमिताभ कांत यांचा पुनरुच्चार
Posted On:
20 APR 2023 4:06PM by PIB Mumbai
पणजी, 20 एप्रिल 2023
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी आज आरोग्य कार्य गटाच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान आयोजित, “हवामान बदल आणि आरोग्यविषयक आव्हानांचा सामना: एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या विषयावरील उद्घाटनपर सत्राला संबोधित केले.
आशियाई विकास बँक आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. आरोग्य क्षेत्राचा विकास पॅरिस करारातील उद्दिष्टांशी संलग्न करणे आणि “एक आरोग्य” या दृष्टिकोनाअंतर्गत, हवामान-बदलावर परिणाम न होऊ देणारी, तसेच टिकावू आरोग्य व्यवस्था उभारणे, तसेच, मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या आरोग्यातील परस्पर संबंध लक्षात घेणे, अशी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची उद्दिष्टे आहेत. भारताचे जी-20 शेर्पा, अमिताभ कांत देखील यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात, परषोत्तम रूपाला यांनी, “ एक आरोग्य” या दृष्टिकोनाचे महत्त्व विशद केले. या दृष्टिकोनात, मानव, प्राणी आणि पर्यावरण विषयक आरोग्यातील परस्पर संबंध समजून घेतला गेला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचाही पुनरुच्चार केला. भौगोलिक सीमा असूनही, संपूर्ण मानवता, याच विश्वाचा भाग आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज आरोग्य क्षेत्राने, ज्यात पशु आरोग्याचाही समावेश आहे, हवामान बदलावर होणारे दुष्परिणाम टाळावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, प्राणीजन्य आजारांच्या बाबतीत दक्ष राहून या आजारांमुळे आरोग्य क्षेत्रात आपत्कालीन स्थिती निर्माण होणार नाही, यांची काळजी घ्यावी, प्रादेशिक आजार फैलावण्यावर नियंत्रण ठेवले जावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा आजारांचा पशुधनावर, आर्थिक उत्पादनावर आणि मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
भारताचे जी- 20 शेर्पा अमिताभ कांत यांचेही या कार्यक्रमात भाषण झाले. त्यांनी हवामान बदल, आरोग्यसेवा आणि दारिद्र्य यासारख्या विविध आव्हानांचा परस्परांशी संबंध आहे, यावर भर दिला. कोविड-19 महामारीने आरोग्य आणि हवामान बदल हे विषय कसे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत हे दाखवून दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संसर्गजन्य रोग आणि संसाधनांच्या मर्यादांमुळे ‘ ग्लोबल साउथ’ अधिक असुरक्षित आहे, असे ते म्हणाले. भारताने आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे आणि आता भारत संपूर्ण जगाचा औषधनिर्माता बनला आहे, असे त्यांनी नमूद केले. टेलिमेडिसिन आणि दूरसंचार यांसारख्या डिजिटल उपक्रमांमुळे हवामान- संबंधित आरोग्य सेवा शाश्वत उपाय ठरू शकतात. "टेलीमेडिसिन आणि टेलिकन्सल्टेशनसारखे भारताचे डिजिटल उपक्रम हे हवामानसंबंधित आरोग्य सेवा मॉडेलसाठी शाश्वत उपाय आहेत", असे ते म्हणाले.
मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय सचिव राजेश के सिंह यांनी झुनोटिक म्हणजे प्राण्यांमुळे माणसांना होणा-या रोगांच्या संक्रमणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. अशा रोगराईविषयी दक्षता बाळगणे सुनिश्चित करण्यासाठी पशु महामारीविषयी भारताने सुरू केलेल्या तयारी उपक्रमावर त्यांनी प्रकाश टाकला. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल यांनी हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी तसेच हवामान बदल आणि आरोग्य यांच्यातील संबंधांना सर्वसमावेशकपणे संबोधित करण्यासाठी 'एक आरोग्य' दृष्टिकोनाच्या गरजेवर भर दिला.
अशियाई विकास बँकेचे (एडीबी) आग्नेय आशिया विभागाचे महासंचालक रमेश सुब्रमण्यम यांनी, आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिल्याने जागतिक आरोग्य आणि हवामान समस्या अशी दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी समन्वयाने उपाय करणे शक्य होईल, यावर भर दिला. तसेच आशियाई विकास बँकेसारख्या संस्था यासाठी पाठिंबा देण्यासाठी सदस्य देशांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, एडीबीचे भारतातील संचालक ताकेओ कोनिशी, एडीबीचे मुख्य क्षेत्र अधिकारी सुंगसुप रा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
S.Kakade/Radhika/Suvarna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918265)
Visitor Counter : 293