पोलाद मंत्रालय
केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते ‘इंडिया स्टील-2023’ या मुंबईत आयोजित परिषदेचे उद्घाटन
जागतिक पोलाद संघटनेतील वैश्विक पोलाद तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात भारत जागतिक पोलाद विकासाच्या केंद्रस्थानी असेल: पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया
“वर्ष 2022 मध्ये भारतातील तयार पोलाद उत्पादनाचे प्रमाण 6 टक्क्यांनी वाढले आहे, याच काळात जागतिक पोलाद उत्पादनात मात्र 4.2% ची घट झाली आहे ”
“आर्थिक वर्ष 2024 पर्यंत, देशांतर्गत पोलाद वापर आणि निर्यात एकत्रित सुमारे 132 दशलक्ष ते 135 दशलक्ष टन इतके असेल : पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते
Posted On:
19 APR 2023 8:34PM by PIB Mumbai
मुंबई, 19 एप्रिल 2023
'इंडिया स्टील 2023' या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे आज मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय पोलाद मंत्रालयाने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासह, फिक्कीच्या सहकार्याने मुंबईत, गोरेगावच्या प्रदर्शन केंद्रात ही तीन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. पोलाद क्षेत्रातील उद्योग प्रमुख, धोरणकर्ते आणि तज्ञांना एकत्र आणून, या क्षेत्रातील अत्याधुनिक घडामोडी, आव्हाने तसेच संधी यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत, केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आपला व्हिडिओ संदेशाच्याद्वारे मार्गदर्शन केले. “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने, पोलाद क्षेत्रासह, संपूर्ण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. गेल्या दशकात, भारतातील पोलाद क्षेत्रात,सहा टक्क्यांपर्यंत स्थिर वृद्धी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. जागतिक पोलाद संघटनेतील तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात भारत, जागतिक पोलाद वृद्धिच्या केंद्रस्थानी असेल, असेही त्यांनी सांगितले. वर्ष 2022 मध्ये देशातील तयार पोलाद उत्पादने, 6 टक्क्यांनी वाढली आहेत, मात्र त्याचवेळी जागतिक पोलाद उत्पादनात 4.2% ची घट झाली, असेही त्यांनी सांगितले.
या वृद्धीचे अनेक पटीने परिणाम दिसणार आहेत. ज्यात, उद्योग आणि सरकार यांच्यातील एकत्रित प्रयत्न, ज्यात सरकार सुविधा प्रदात्याची भूमिका पार पाडेल आणि उद्योग जगत विकासाच्या इंजिनाला चालना देईल. असेही त्यांनी सांगितले.
पोलाद मंत्रालयाने अलीकडेच उत्पादन- संलग्न-प्रोत्साहन योजनेंतर्गत विशेष पोलादासाठी 27 कंपन्यांसोबत 57 सामंजस्य करार केले आहेत. पुढील पाच वर्षांत, या क्षेत्रात सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 25 दशलक्ष टन विशेष पोलादाची अतिरिक्त क्षमता निर्माण करणारी ही योजना, या क्षेत्राचा कित्येक पटीने विकास करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि अमृत काळात 60,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण करेल तसेच 2030-31 पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यातही महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरणपूरक पोलाद उत्पादनावर पंतप्रधानांनी भर दिला असून त्या अनुषंगाने पोलाद क्षेत्र अधिकाधिक हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी पोलाद मंत्रालय आवश्यक ती पावले उचलत आहे, असेही सिंधीया यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारतातील पोलादाची मागणी सातत्याने वाढत आहे. "पंतप्रधानांनी देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिल्यामुळे, विकासाची गती कायम राहील, अशी आपण अपेक्षा करू शकतो, त्यामुळे आर्थिक वर्ष 2024 मध्ये निर्यातीसह पोलादाचा वापर सुमारे 132 दशलक्ष टन ते 135 दशलक्ष टन राहील, अशी अपेक्षा करणे योग्य ठरेल," ते म्हणाले.
उद्योगांना स्टील स्क्रॅपचा (भंगार मधील पोलाद) पुरवठा वाढवा म्हणून, केंद्र सरकारने स्टील स्क्रॅपिंग धोरण आणि वाहन स्क्रॅपेज (भंगार मध्ये काढणे) धोरण लागू केले असून, यामुळे पर्यायाने चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. परिषदेमध्ये चर्चेसाठी महत्त्वाचे तीन मुद्दे त्यांनी मांडले, ते पुढीलप्रमाणे: i) लो-ग्रेड (कमी प्रतीचे) लोहखनिजाचा वापर, ii) शहरी आणि ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या वापरामधील तफावत दूर करणे आणि iii) तंत्रज्ञानाची अंमलबजावणी असे त्यांनी पुढे सांगितले .
पोलाद मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी ही संकल्पना मांडताना सांगितले की, आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगतीच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अमृत काळामध्ये देशातील पोलाद उत्पादक महत्वाची भूमिका बजावू शकतील.
फिक्कीचे अध्यक्ष सुभ्रकांत पांडा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि फिक्कीच्या पोलाद समितीचे अध्यक्ष सोमा मंडल यांच्यासह इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
इंडिया स्टील 2023:
इंडिया स्टील 2023 मध्ये विविध श्रेणींमधील सत्रांचा समावेश आहे. यामध्ये "लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा सक्षम करणे", "भारतीय पोलाद उद्योगापुढील मागणीची आव्हाने", “हरित पोलादाच्या माध्यमातून शाश्वत ध्येये गाठणे: आव्हाने आणि पुढील वाटचाल”, "भारतीय पोलाद उद्योगासाठी अनुकूल धोरण चौकट आणि त्याला सक्षम करणारे प्रमुख घटक" आणि "उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपाययोजना", या विषयांचा यात समावेश आहे. त्या शिवाय, ही सत्रे भागधारकांना कल्पना, जाणीव आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, उद्योगाच्या भविष्यातील वाढीसाठी सहकार्य आणि नवोन्मेष विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतील. इंडिया स्टील 2023 मध्ये पोलाद उद्योगाशी संबंधित प्रमुख समस्यांवर गोलमेज चर्चेची मालिका देखील आयोजित करण्यात आली आहे.
इंडिया स्टील 2023 बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या www.indiasteelexpo.in
Jaydevi PS/Radhika/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1918077)
Visitor Counter : 218