राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिमल्याच्या एनएएए येथे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद


देश आणि देशातील नागरिकांशी संबंधित समस्यांबद्दल निर्णय घेताना तसेच धोरणांची अंमलबजावणी करताना, मानवतेचा स्पर्श आणि संवेदनशीलतेचे महत्त्व समजून घ्यावे - राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतीय लेखापरीक्षण सेवेतील अधिकाऱ्यांना केले आवाहन

Posted On: 19 APR 2023 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023

भारताच्या राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू यांनी आज (19 एप्रिल, 2023) सिमल्याच्या राष्ट्रीय लेखापरीक्षण आणि लेखा अकादमीला भेट दिली आणि भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी- कॅग) आणि भारतीय लेखा आणि लेखा विभागाचे अधिकारी म्हणून जबाबदारी आणि पारदर्शकतेची तत्त्वे लागू करण्याची संधी मिळणे,ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्या म्हणाल्या,की सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेची भूमिका केवळ देखरेख ठेवण्‍यापुरती मर्यादित नाही तर माहितीपूर्ण धोरण तयार करण्यासाठी आवश्यक ‘इनपुट’  प्रदान करणे देखील आहे. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग आणि त्यांचे सक्षम अधिकारी यांच्यामार्फत कॅग या दोन्ही उद्दिष्टांचा प्रभावीपणे पाठपुरावा करत आहे. राज्यघटनेच्या आदर्शांचे पालन करणे आणि राष्ट्र उभारणीसाठी निष्ठेने आणि वचनबद्धतेने कार्य करणे हे सर्वांचे  कर्तव्य आहे.

लेखा परीक्षणाच्या  प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्‍याबद्दल  राष्ट्रपती म्हणाल्या  की, ‘वन इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट वन सिस्टीम’ हा अलीकडेच सुरू  करण्यात आलेला हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे. ब्लॉकचेन, डेटा अॅनालिटिक्स, व्हर्च्युअल ऑडिट रूम इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर पारदर्शकता आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो. परंतु तंत्रज्ञान मानवी हस्तक्षेपाची गरज बदलू शकत नाही आणि तसे केले जावू नये. निर्णय घेताना आणि धोरणांची अंमलबजावणी करताना देश  आणि नागरिकांशी संबंधित समस्यांबाबत मानवतेचा  स्पर्श आणि संवेदनशीलतेचे मूल्य समजून घेण्याचे आवाहन, त्यांनी   युवा  अधिकाऱ्यांना केले.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या  की ऑडिटचे प्राथमिक उद्दिष्ट दोष शोधण्याऐवजी प्रक्रिया आणि धोरणे सुधारणे हे असले पाहिजे. म्हणून, लेखापरीक्षणानतंर  शिफारशी स्पष्टपणे आणि खात्रीने कळवणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांच्या जास्तीत जास्त फायद्यासाठी सार्वजनिक सेवा आणि त्यांचे वितरण सुधारण्यास मदत होईल. राष्‍ट्रपतींनी  भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकाऱ्यांना नेहमी देशातील नागरिकांचे कल्याण आपल्याला करायचे आहे, हे  लक्षात ठेवावे  आणि त्याच  दृष्टिकोनात नि:ष्‍पक्षपणे काम होणे हे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1917893) Visitor Counter : 101