संरक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने सांस्कृतिक पुनर्जागराच्या युगात प्रवेश केला आहेः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे सोमनाथ येथे प्रतिपादन
Posted On:
17 APR 2023 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने सांस्कृतिक पुनर्जागराच्या युगात प्रवेश केला आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते आज 17 एप्रिल 2023 रोजी गुजरातमध्ये सोमनाथ येथे सौराष्ट्र- तामिळ संगमम् कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या अनेक शतके जुन्या परंपरा आणि संस्कृतीसोबत लोकांना जोडण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे, असे ते म्हणाले. भारताच्या अतिशय खोलवर रुजलेल्या परंपरा सामर्थ्य आणि एकतेचे दर्शन घडवतात, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी क्षमता आणि कार्यक्षमता प्रदान करतात, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
सांस्कृतिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. देशाच्या सीमांच्या सुरक्षेइतकीच आणि अन्न, ऊर्जा, पर्यावरण, सायबर आणि अंतराळ यांसारख्या इतर पैलूंप्रमाणेच ती महत्त्वाची आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. सांस्कृतिक सुरक्षेवर सरकार भर देत आहे आणि सांस्कृतिक एकता कायम राखण्याकडे विशेष लक्ष पुरवले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सौराष्ट्र आणि तामिळनाडूचा हा संगम म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा सोहळा आहे आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे तेजस्वी उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.
सौराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक संबंधांवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की यांच्यातील संबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत. 11 व्या शतकात परकीय आक्रमकांकडून अनेकदा सौराष्ट्रवर हल्ले करण्यात आले. हा तो काळ होता ज्या काळात सौराष्ट्रमधून हजारो लोक दक्षिण भारतात स्थलांतरित झाले. त्यावेळी तामिळनाडूमधील जनतेने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना एका नव्या आयुष्याचा प्रारंभ करण्यासाठी मदत केली, असे ते म्हणाले. एकसंध भारताच्या अनेक झळाळत्या अध्यायांपैकी एक असलेला अध्याय म्हणजे सौराष्ट्र आणि तामिळनाडू मधील संबंध असे सांगत त्यांनी अनेक शतके जुन्या असलेल्या सौराष्ट्र- तामिळनाडू संबंधांची अनेक उदाहरणे दिली.
तेलंगणच्या राज्यपाल डॉ. तामिळीसाई सौंदरराजन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917328)
Visitor Counter : 177