पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मुंबईत “SCO मिलेट्स फूड फेस्टिव्हल” चे उद्घाटन

Posted On: 14 APR 2023 3:13PM by PIB Mumbai

 

मुंबई 14 एप्रिल 2023

शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांमध्ये संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण आहे आणि ते त्यांच्या पाककृतींमध्येही दिसून येते. त्यामुळे शांघाय सहकार्य संघटना भरड धान्य महोत्सवाच्या माध्यमातून येत्या 6 दिवसांत मुंबईकरांना भरड धान्याचे महत्व जाणून घेता येईल आणि दक्षिण आशियाई, मध्य आशियाई आणि रशियन खाद्यपदार्थांच्या भरड धान्यावर आधारीत विविध स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेता येईल, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांनी म्हटले आहे.

2023 या वर्षासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदा अंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, मुंबईत ताजमहाल पॅलेस हॉटेल इथे 13 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत “SCO मिलेट्स फूड फेस्टिव्हल” या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील पर्यटन भरड धान्य खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन, 13 एप्रिल 2023 रोजी ताजमहाल पॅलेस, मुंबई इथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

शतकानुशतके भरड धान्य हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग राहिला आहे. आरोग्य विषयक मुबलक फायद्यांसोबतच, भरडधान्यांना जमिनीत पाणी आणि इतर पूरक घटक कमी प्रमाणात लागत असल्यामुळे, भरड धान्य पर्यावरणपूरकही आहेत आणि त्‍यांच्या सेवनाने संयुक्‍त राष्‍ट्रांनी ठरवून दिलेली शाश्‍वत विकासाची किमान सहा अनिवार्य उद्दिष्टे पूर्ण करण्‍यात, जगाला मदत होऊ शकते, अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली. म्हणूनच भरडधान्यांचे उत्पादन आणि वापर वाढवून जागरूकता निर्माण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मांडलेला प्रस्ताव मान्य करुन संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे  आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले असे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 ला 'लोक चळवळ' बनवण्यासोबतच भारताला भरड धान्यांचे जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले आहे, असेही नाईक म्हणाले. पंतप्रधानांनी, संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांसह गुजरात मध्ये केवडिया इथे मिशन LiFE या मोहिमेची घोषणा करुन या मोहिमेद्वारे जागतिक हवामान बदलाच्या समस्येच्या निवारणासाठी प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक योगदानाचे महत्व सुद्धा जगासमोर आणले असे सांगून नाईक म्हणाले की LiFE ही मोहीम, 'वापरा आणि फेकून द्या' या विघातक अर्थव्यवस्थे ऐवजी पुनर्वापरावर भर देणाऱ्या सर्क्युलर इकॉनॉमी या गोलाकार अर्थव्यवस्थेला प्राधान्य देते.

मुंबईतील या चौथ्या टप्प्याआधी पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची, नाईक यांनी यावेळी माहिती दिली. 9 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान SCO पर्यटन मार्ट, तसेच 13 ते 18 मार्च 2023 या कालावधीत वाराणसीमध्ये SCO तज्ञ स्तरावरील पर्यटन कार्यगटाची बैठक आणि SCO पर्यटन मंत्र्यांची बैठक असे उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले असे सांगून ते पुढे म्हणाले की यात, पर्यटनातील सहकार्याच्या विकासाबाबत SCO सदस्य राष्ट्रांमधील कराराच्या अंमलबजावणीसाठीच्या कृती आराखड्यावर चर्चा करून तो स्वीकारण्यात आला.

पर्यटन मंत्रालयाच्या इतर उपक्रमाविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली. पर्यटन मंत्रालय हे वर्ष ‘व्हिजिट इंडिया इयर 2023’ म्हणजे पर्यटकांनी पर्यटनासाठी भारताला प्राधान्य द्यायचे वर्ष म्हणून साजरे करत आहे. यामध्ये देशाची संस्कृती, वारसा, अध्यात्म, नैसर्गिक सौंदर्य, शाश्वत पर्यटन, ग्रामीण पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, अशा विविध प्रकारच्या पर्यटनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करून, प्रत्येक राज्य यापैकी कुठल्या पर्यटनसंधी देऊ करते यावर प्रकाश टाकणार आहोत, असे नाईक म्हणाले. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत पर्यटनामध्ये युवावर्गाचा मोठा वाटा आहे, तसेच इतर कोणत्याही आर्थिक क्षेत्रापेक्षा पर्यटन क्षेत्र युवा वर्गाला अधिक रोजगार देते. पर्यटन क्षेत्रातील कुशल युवावर्गाच्या उपलब्धतेची गरज ओळखून, पर्यटन मंत्रालयाने ‘युवा टुरिझम क्लब’ स्थापन करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती सुद्धा नाईक यांनी यावेळी दिली.

आपल्या भाषणाचा समारोप करताना नाईक यांनी कझाकिस्तानचे, शांघाय सहकार्य संघटनेच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या तसेच, शांघाय सहकार्य संघटनेच्या क्षेत्रात पर्यटन वृद्धीसाठी भारत नेहमीच सहकार्य आणि प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ताज पॅलेस हॉटेलचे, तसेच पर्यटन आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला उझबेकिस्तानचे परिवहन उपमंत्री जसुरबेक चोरिएव उपस्थित होते. SCO सदस्य देशांचे राजदूत तसेच नामांकित आचारी, कॉन्सुलेट जनरल, पर्यटन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील भागधारक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले.

या महोत्सवासाठी निमंत्रित रशिया, कझाकस्तान, किरगिझस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या SCO च्या सदस्य देशांचे, तसेच भारतातील नामांकीत प्रमुख आचारी, ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आपापल्या देशांमधील भरडधान्यांपासून बनवलेल्या पाककृती सादर करतील, तसेच आपापल्या देशातील खाद्य पदार्थांच्या महत्व विशद करतील.

पर्यटन मंत्रालयाच्या वतीने मुंबईत आयोजित हा महोत्सव 19 एप्रिलपर्यंत चालणार आहे. हा महोत्सव लोकांसाठी शामियाना रेस्टॉरंट, ताजमहाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे खुला असेल.

***

S.Tupe/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916558) Visitor Counter : 288


Read this release in: English , Urdu , Hindi