पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय रोजगार मेळ्यात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

Posted On: 13 APR 2023 1:29PM by PIB Mumbai

नमस्कार !


मित्रांनो,
आज बैसाखीचा पवित्र सण आहे. मी सर्व देशवासियांना बैसाखी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.या आनंदोत्सवात आज 70 हजारांहून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागात सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

मित्रांनो,
विकसित भारताच्या  संकल्प पूर्तीसाठी युवा वर्गाच्या प्रतिभेला  आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे.केंद्र सरकारबरोबरच गुजरातपासून आसामपर्यंत, उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत रालोआ आणि भाजपशासित राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.कालच मध्य प्रदेशातील 22 हजारांहून अधिक शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. हा राष्ट्रीय रोजगार मेळाही  तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीची साक्ष  आहे.
 
मित्रांनो ,
आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. कोविडनंतर संपूर्ण जगाला मंदीचा सामना करावा लागत आहे, बहुतेक देशांची अर्थव्यवस्था सातत्याने  घसरत आहे. पण या सगळ्यात जग भारताकडे 'उज्वल स्थान ' म्हणून पाहत आहे.आजचा नवा भारत, आता जे नवीन धोरण आणि  रणनीती अवलंबत आहे त्यामुळे देशात नवीन शक्यता आणि नवीन संधींची दारे खुली झाली आहेत.एक काळ असा होता जेव्हा भारत तंत्रज्ञान असो वा पायाभूत सुविधा, एक प्रकारे प्रतिक्रियात्मक दृष्टिकोन ठेवून केवळ प्रतिक्रिया देत काम करत असे. 2014 पासून, भारताने सक्रिय   दृष्टीकोन स्वीकारला आहे. याचाच परिणाम म्हणजे एकविसाव्या शतकातील हे तिसरे दशक रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अशा संधी निर्माण करत आहे, ज्याची पूर्वी कल्पनाही करता येत नव्हती.
आज तरुणांसमोर अशी अनेक क्षेत्रे झुली झाली आहेत, जी 10 वर्षांपूर्वीही उपलब्धही  नव्हती. स्टार्टअप्सचे उदाहरण आपल्यासमोर आहे. आज भारतातील तरुणांमध्ये स्टार्टअप्सबाबत प्रचंड उत्साह आहे. एका अहवालानुसार, स्टार्टअप्सनी 40 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. ड्रोन उद्योगही तसाच आहे. आज कृषी क्षेत्र असो वा संरक्षण क्षेत्र, पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वेक्षण असो की स्वामित्व योजना असो, ड्रोनची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण ड्रोन उत्पादन , ड्रोन फ्लाइंगमध्ये सहभागी होत आहेत.गेल्या 8-9 वर्षांत देशाच्या क्रीडा क्षेत्राचा कशाप्रकारे कायापालट  झाला हे देखील तुम्ही पाहिले आहे. आज देशभरात नवनवीन स्टेडियम तयार होत आहेत, नवीन अकादमी तयार होत आहेत.प्रशिक्षक, तंत्रज्ञ, सहाय्य्यकांची  गरज आहे. देशातील क्रीडा क्षेत्रासाठीची तरतूद दुप्पट झाल्याने  तरुणांसाठी नवीन संधीही निर्माण होत आहेत.

मित्रांनो,
आत्मनिर्भर भारत अभियानामागचा  विचार आणि दृष्टीकोन  हा स्वदेशीचा अवलंब  आणि  व्होकल फॉर लोकलच्याही खूप  पलीकडे  आहे . ही मर्यादित व्याप्तीची बाब नाही. आत्मनिर्भर भारत अभियान हे  भारतातील गावापासून  शहरांपर्यंत कोट्यवधी नवीन रोजगार संधी निर्माण करणारे अभियान आहे.आज आधुनिक उपग्रहांपासून ते सेमी-हाय स्पीड रेल्वे पर्यंत सर्व काही केवळ  भारतातच तयार केले जात आहे. गेल्या 8-9 वर्षांत देशात 30 हजारांहून अधिक नवीन आणि सुरक्षित एलएचबी कोच बनवण्यात आले आहेत. याच्या  बांधकामात वापरलेले हजारो टन पोलाद , वापरलेली वेगवेगळी उत्पादने, त्यांनी संपूर्ण पुरवठा साखळीत हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.मी तुम्हाला भारतातील खेळणी उद्योगाचे उदाहरणही देईन. आता जितेंद्र सिंह जी यांनीही त्याचा उल्लेख केला आहे. अनेक दशकांपासून भारतातील मुले परदेशातून आयात केलेल्या खेळण्यांसोबत खेळत असत.या खेळण्यांचा ना  दर्जा चांगला होता, ना भारतीय मुलांना डोळ्यासमोर ठेवून ती बनवली गेली होते. . मात्र त्याकडे कधी कुणी लक्ष दिले नाही.आम्ही आयात केलेल्या खेळण्यांसाठी गुणवत्तेचे मापदंड निश्चित केले आणि आपल्या  स्वदेशी उद्योगाला चालना देण्यास सुरुवात केली. 3-4 वर्षात खेळणी उद्योगाला नवसंजीवनी मिळाली आणि त्यामुळे अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.आपल्या देशात अनेक दशकांपासून संरक्षण उपकरणे केवळ आयातच  केली जाऊ शकतात, बाहेरूनच येऊ शकतात, हा दृष्टिकोनही प्रबळ होता. आपल्या देशातील उत्पादकांवर आपला तितकासा विश्वास नव्हता.आमच्या सरकारने  हा देखील दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या  संरक्षण दलांनी अशा 300 हून अधिक उपकरणे आणि शस्त्रांची यादी तयार केली आहे, जी आता भारतात उत्पादित केली जातील आणि भारतीय उद्योगांकडून खरेदी केली जातील. आज भारत 15 हजार कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे परदेशात निर्यात करतो. यामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

मित्रांनो,  
आणखी एक गोष्ट तुम्ही कधीही  विसरणार नाही  . 2014 मध्ये जेव्हा देशाने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा भारतात विकले जाणारे बहुतेक मोबाईल फोन आयात करण्यात येत होते. स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिले. आज 2014 पूर्वीची परिस्थिती असती तर लाखो कोटी रुपयांचे परकीय चलन आपण खर्च केले असते. पण, आता आपण केवळ देशांतर्गत गरजा भागवत नाही तर मोबाईल फोनची निर्यातही करत आहोत. जगातील देशांपर्यंत  पोहोचवत आहोत . यामुळे रोजगाराच्या हजारो नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत.

मित्रांनो,
रोजगार निर्मितीची आणखी एक बाजू आहे आणि ती म्हणजे पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारने केलेली गुंतवणूक. आमचे सरकार पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या वेगवान कामासाठी ओळखले जाते.जेव्हा सरकार भांडवली खर्चावर भर देते , तेव्हा रस्ते, रेल्वे, बंदरे आणि नवीन इमारती अशा विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. पायाभूत सुविधांच्या उभारणीत अभियंते, तंत्रज्ञ, लेखापाल, मजूर, सर्व प्रकारची उपकरणे, पोलाद , सिमेंट अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते.आमच्या सरकारच्या काळात गेल्या 8-9 वर्षात भांडवली खर्चात 4 पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी आणि लोकांचे उत्पन्न दोन्ही वाढले आहे. मी तुम्हाला भारतीय रेल्वेचे उदाहरण देतो. 2014 पूर्वीच्या सात दशकांमध्ये सुमारे 20,000 किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते.गेल्या 9 वर्षात आम्ही सुमारे 40 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. 2014 पूर्वी एका महिन्यात केवळ 600 मीटरच्या नव्या मेट्रो मार्गिका बांधल्या जात होत्या. आज, आम्ही दर महिन्याला सुमारे 6 किलोमीटरच्या नवीन मेट्रो मार्गिका  बांधत आहोत. तेव्हा मोजणी मीटरमध्ये केली जात होती, आज किलोमीटरमध्ये मोजणी  केली जात आहे. 2014 मध्ये, देशात 70 पेक्षा कमी, 70 पेक्षा कमी, 70 पेक्षा कमी जिल्ह्यांमध्ये  गॅस  जाळ्याचा विस्तार होता. आज ही संख्या 630 जिल्ह्यांवर पोहोचली आहे. कुठे 70 जिल्हे आणि कुठे 630 जिल्हे. 2014 पर्यंत ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबीही 4 लाख किमीपेक्षा कमी होती.आज हा आकडा वाढून  7.25 लाख किलोमीटरहून अधिक झाला आहे. जेव्हा रस्ता गावात पोहोचतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत जलद गतीने रोजगार निर्माण होऊ लागतो.

मित्रांनो,
देशातील विमान वाहतूक क्षेत्रातही असेच काम झाले आहे. 2014 पर्यंत देशात 74 विमानतळ होते, आज त्यांची संख्या 148 झाली आहे. विमानतळाच्या परिचालनात  किती कर्मचाऱ्यांची गरज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तुम्ही अंदाज लावू शकता की इतक्या नवीन विमानतळांमुळे देशात हजारो नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.

आणि तुम्ही पाहिले असेल की नुकतीच एअर इंडियाने विक्रमी संख्येतील विमाने खरेदीची ऑर्डर दिली आहे. इतर अनेक भारतीय कंपन्या देखील यासाठी तयारी करत आहेत. याचाच अर्थ येत्या काही दिवसांत या क्षेत्रात खान-पान सेवेपासून विमानांतर्गत सेवांपर्यंत, देखभाल क्षेत्रापासून विमानतळावरील हाताळणीपर्यंत विविध बाबतीत मोठ्या संख्येने रोजगारसंधी निर्माण होत आहेत. अशाच प्रकारची प्रगती आपल्या बंदरांशी संबंधित क्षेत्रांमध्ये देखील होत आहे. सागरकिनाऱ्यांचा विकास होतो आहे, आपली बंदरे विकसित होत आहेत. आपल्या बंदरांमधून पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता दुपटीने मालवाहतूक होते आहे आणि यासाठी लागणारा वेळ निम्म्यावर आला आहे. या मोठ्या परिवर्तनामुळे बंदर क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.


मित्रांनो,
देशातील आरोग्य क्षेत्र देखील रोजगार निर्मितीचे उत्तम उदाहरण म्हणून स्थापित होत आहे. वर्ष 2014 मध्ये भारतात 400 पेक्षाही कमी वैद्यकीय महाविद्यालये होती, मात्र आज, देशात कार्यरत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 660 झाली आहे. 2014 मध्ये वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांची संख्या सुमारे 50 हजार होती, आज विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 1 लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत. पूर्वीपेक्षा दुप्पट संख्येने विद्यार्थी आज परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होऊ लागले आहेत. आयुष्मान भारत योजनेमुळे देशात अनेक नवीन रुग्णालये आणि दवाखाने सुरु होऊ लागले आहेत. म्हणजेच पायाभूत सुविधाविषयक प्रत्येक प्रकल्प रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील याची सुनिश्चिती करत आहे.

 

मित्रांनो,
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती करत आहे, स्वयंसहाय्यता बचत गटांना लाखो-करोडो रुपयांची मदत करत आहे, साठवण क्षमतेचा विस्तार करत आहे. सरकारच्या अशा अनेक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होत आहेत. 2014 नंतर देशात 3 लाखांहून अधिक नवी सामान्य सेवा केंद्रे स्थापन झाली. 2014 नंतर देशातील गावांमध्ये 6 लाख किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची ऑप्टीकल फायबर टाकण्यात आली. वर्ष 2014 नंतरच्या काळातच देशातील गरीब नागरिकांना 3 कोटीहून अधिक घरे बांधून देण्यात आली आणि यातील अडीच कोटीहून अधिक घरे ग्रामीण भागातच उभारण्यात आली. गेल्या काही काळात गावांमध्ये 10 कोटींहून अधिक शौचालये, दीड लाखांहून अधिक आरोग्य तसेच स्वास्थ्य केंद्रे, हजारो नव्या पंचायत इमारती उभारण्यात आल्या.या सर्व सुविधा उभारणी कार्यांनी गावातील लाखो युवकांच्या हाताला काम दिले, रोजगार मिळवून दिला. ज्या पद्धतीने आज कृषी क्षेत्रात वेगाने शेतीचे यांत्रिकीकरण होत चालले आहे त्यामुळे देखील गावांमध्ये रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.

 

मित्रांनो,
भारत आज ज्या पद्धतीने लघु उद्योगांना आधार देत आहे, देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे त्यामुळे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची सुनिश्चिती होते आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली. या 8 वर्षांमध्ये, मुद्रा योजनेच्या माध्यमातून कोणत्याही बँक हमीच्या मागणीविना 23 लाख कोटी रुपयांची कर्जे वितरीत करण्यात आली आहेत. आणि त्यापैकी 70% कर्जे महिलांना देण्यात आली आहेत. या योजनेच्या सहाय्याने 8 कोटी नवे उद्योजक तयार झाले म्हणजेच हे जे उद्योजक आहेत त्यांनी मुद्रा योजनेच्या मदतीने पहिल्यांदाच स्वतःचा असा काही उद्योग धंदा सुरु केलेला आहे. मुद्रा योजनेच्या यशाने देशातील करोडो लोकांना स्वयंरोजगारासाठी उभारी दिली आहे, नवी दिशा दाखवली आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. अगदी मुलभूत पातळीवर अर्थव्यवस्थेची शक्ती वाढविण्यात सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे किती महत्त्व असते, सूक्ष्म वित्त पुरवठा किती शक्तिमान असू शकतो हे आपण या 8-9 वर्षांमध्ये पाहिले आहे. स्वतःला रथी-महारथी समजणारे तसेच मोठमोठे अर्थशास्त्रातील प्रकांड पंडित आणि मोठमोठे वित्तीय पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे मालक, फोनाफोनी करून कर्ज देण्याची सवय असलेले लोक सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे सामर्थ्य कधीच ओळखू शकलेले नाहीत. आज सुद्धा हे लोक सूक्ष्म वित्तपुरवठ्याची खिल्ली उडवत आहेत. यांना देशातील सर्वसामान्य लोकांकडे असलेल्या ताकदीचा अंदाजच आलेला नाही.

 

मित्रांनो,
ज्या व्यक्तींना आज नियुक्तीपत्रे मिळाली आहेत त्यांना मी विशेष करून काही सूचना करू इच्छितो. तुमच्यापैकी काहीजण रेल्वे तर काही शिक्षण क्षेत्राशी जोडले जात आहेत. काही लोकांना बँकांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ही तुम्हा सर्वांसाठी देशाची विकासात योगदान देण्याची मोठी संधी आहे. आपला देश 2047 साली, स्वातंत्र्यप्राप्तीचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करेल, त्यासाठी विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य निश्चित करून आपण वाटचाल करत आहोत. आणि मला माहित आहे की आज तुम्हा सर्वांचे जे वय आहे तो तुमच्यासाठी अमृतकाळच आहे.तुमच्या जीवनातील या येणाऱ्या 25 वर्षांत देशामध्ये जलदगतीने प्रगती करण्याचे वातावरण असणार आहे आणि त्या काळात तुम्ही योगदान देणार आहात. तुम्ही किती उत्तम काळात आणि किती उत्तम संधींसह देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर नवी जबाबदारी घेत आहात याची कल्पना तुम्ही करू शकता. तुम्ही पुढे टाकलेले एक एक पाऊल, तुम्ही देशासाठी दिलेल्या वेळातील प्रत्येक क्षण देशाला वेगाने विकसित करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
तुम्ही आज एक सरकारी कर्मचारी म्हणून तुमचा यापुढील जीवनप्रवास सुरु करत आहात. गेल्या 5-10 वर्षांपासून जेव्हा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही आजूबाजूच्या गोष्टी समजून घेऊ लागलात, त्याबद्दल तुम्हाला तेव्हा काय वाटले याची आठवण तुम्ही या प्रवासात नेहमीच ठेवली पाहिजे. त्यावेळी कोणता सरकारी व्यवहार तुमच्या मनाला खटकत असे, कुठले सरकारी कार्यक्रम तुम्हाला आवडत असत याचेही स्मरण तुम्ही ठेवले पाहिजे. त्या काळात सरकारी व्यवहारांमध्ये तुम्हाला काही वाईट अनुभव आले असतील, पण आता तुम्ही मनाशी ठरवले पाहिजे की तुम्ही कर्तव्यावर असताना देशाच्या कोणत्याही नागरिकाला असा वाईट अनुभव येऊ देणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ज्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागला त्या समस्यांना तुमच्यामुळे इतरांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेणे हीच फार मोठी देशसेवा ठरेल.सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर, इतरांच्या अशा आशा आकांक्षा पूर्ण करणे, स्वतःला ते करण्यासाठी सक्षम बनविणे ही आता तुमची जबाबदारी आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्या कामातून या ना त्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकू शकतो, त्यांना प्रेरणा देऊ शकतो, त्यांना निराशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवू शकतो. यापेक्षा मोठे मानवतेचे कार्य काय असेल मित्रांनो? तुमच्या कार्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, तुमच्या कामामुळे सामान्य नागरिकाचे जीवन अधिक सुखकर होईल असाच प्रयत्न तुमच्याकडून व्हायला हवा. सरकारी व्यवस्थेवरचा नागरिकांचा विश्वास वाढायला हवा.
मी तुम्हां सर्वांकडे आणखी एका गोष्टीचा आग्रह धरू इच्छितो. तुम्ही सर्वांनी अत्यंत मेहनतीने हे यश मिळवले आहे. पण, सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही शिकण्याची प्रक्रिया थांबू देऊ नका. काहीतरी नवी माहिती मिळवण्याचा, नव्या गोष्टी शिकण्याचा तुमचा प्रयत्न हा तुमचे कार्य आणि व्यक्तिमत्व अशा दोन्हीवर चांगला परिणाम करेल. ‘iGoT कर्मयोगी’ या ऑनलाईन शिक्षण मंचामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमच्याकडील कौशल्ये अद्ययावत करू शकता. आणि मित्रांनो, माझ्या बाबतीत तर मी हे नेहमीच म्हणत असतो की मी माझ्यातील विद्यार्थ्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही. मी फार मोठा विद्वान आहे, मला सगळ्याच गोष्टी करता येतात, मी सगळं काही शिकलो आहे, असा मी स्वतःचा ग्रह करून जन्म घेतलेला नाही आणि माझी कामे करताना देखील मी अशा भ्रमात राहत नाही. मी नेहमीच स्वतःला एक विद्यार्थी मानत आलो आहे आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही सर्वांनी देखील तुमच्यातील विद्यार्थ्याला जिवंत ठेवा, सतत काहीतरी नवे शिकण्याचा प्रयत्न करत रहा. यातून,जीवनाची नवी कवाडे तुमच्यासाठी खुली होतील.  

 

मित्रांनो,
बैसाखीच्या पवित्र पर्वावर तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरु होत आहे यापेक्षा चांगला मुहूर्त काय असू शकतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा उज्ज्वल भविष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.

 

***

MaheshI/SonalC/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1916474) Visitor Counter : 183