निती आयोग
azadi ka amrit mahotsav

कृषी विज्ञान केंद्रे(केवीके)आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थासोबत जोडल्या गेल्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा(एटीएल)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे हे उदाहरण आहे- एटीएलना केवीकेशी जोडण्याचा पंतप्रधानांनी दिला होता प्रस्ताव

Posted On: 13 APR 2023 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

कृषी क्षेत्रातील अभिनव संशोधनाच्या बाबतीत  भारतभरातील शालेय विद्यार्थ्यांन प्रोत्साहन देण्यासाठी अटल नवोन्मेष अभियान (एआयएम), नीती आयोग आणि केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालय एकत्र आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत, या दोन सरकारी संस्थांनी, अटल टिंकरिंग प्रयोगशाळांना (एटीएल), कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके)आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेशी (आत्माशी) जोडण्यास मान्यता दिली आहे.

हा सहकारी संबंध म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा अविष्कार आहे. पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान या कल्पनेची रुजवात केली आणि एटीएलना देशभरातील केव्हीकेशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला. या दोन्ही सरकारी संस्थांनी मृदा चाचणी प्रयोगशाळांना एटीएल शाळांशी जोडण्याच्या कल्पनेबाबत विचार करण्याच्या सूचना देखील पंतप्रधानांनी दिल्या.

कृषी विज्ञान केंद्रे एक खिडकी ज्ञान स्त्रोत आणि क्षमता विकास केंद्रे म्हणून काम करतात आणि या जोडणीमुळे असंख्य भागधारकांना आवश्यक माहिती,प्रशिक्षण आणि इनपुट्स यांचा लाभ होणार आहे. कृषी-संबंधित अभिनव संशोधनाला पाठबळ पुरवण्यासाठी आत्माशी केलेल्या भागीदारीतून केव्हीके जवळच्या एटीएलशी जोडल्या जातील.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात 11 कृषी तंत्रज्ञान सुविधा संशोधन संस्थांच्या अखत्यारीतील प्रत्येकी एक केव्हीके सहभागी होऊन तंत्रज्ञानाचे पाठबळ पुरवेल आणि माहितीचे सामायीकीकरण तसेच कौशल्य उभारणी प्रयोगांचे सुलभ कार्यान्वयन करेल. केव्हीके मधील तज्ञ त्यांच्या जवळच्या एटीएलसाठी आवश्यकतेवर आधारित भेटीचा उपक्रम हाती घेतील, तर केव्हीके त्यांना साहित्य, बियाणे, लागवडीची साधने आणि इतर आवश्यक बाबी पुरवेल.दोन वर्षांच्या अंमलबजावणीनंतर हाती आलेल्या सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन करून नंतर या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उपक्रमाचा परिचय करून देण्यासाठी 12 एप्रिल 2023 रोजी शाळेला भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंत्रालयाच्या प्रतिनिधी मंडळाने दिल्लीच्या साकेत येथील अॅमिटी आंतरराष्ट्रीय शाळेतील एटीएल प्रयोगशाळेला भेट दिली. तेथे युवा शालेय विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित अभिनव संशोधनांसह विविध क्षेत्रांमध्ये  केलेले नवोन्मेष पाहण्याची संधी  या अधिकाऱ्यांना मिळाली. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील आयसीएआरमधील अधिकाऱ्यांसाठी अशाच प्रकारची भेट आयोजित करण्यात आली आहे.

एआयएम आणि केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या दरम्यानचा हा सहकारी संबंध म्हणजे भारताच्या कृषी क्षेत्रातील वृद्धी आणि विकास यांच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासातील  महत्त्वाचा टप्पा आहे आणि अटल नवोन्मेष अभियान आपल्या देशातील युवा वर्गामध्ये नवोन्मेष आणि सर्जनशीलता जोपासण्याच्या दिशेने करत असलेले प्रयत्न सुरु ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 1916377) Visitor Counter : 227


Read this release in: English , Urdu , Hindi