गृह मंत्रालय
पाचवा भारत-यूके गृह मंत्रालय संवाद
Posted On:
12 APR 2023 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
पाचव्या भारत-यूके गृह मंत्रालय संवादाचे (HAD) आज नवी दिल्ली इथे आयोजन करण्यात आले. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी केले, आणि यूकेच्या गृह मंत्रालयातील स्थायी सचिव सर मॅथ्यू रायक्रॉफ्ट यांनी यूकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या सहकार्याचा आढावा घेण्यात आला आणि दहशतवाद प्रतिबंध, सायबर सुरक्षा आणि जागतिक पुरवठा साखळी, अमली पदार्थांची तस्करी, स्थलांतर, प्रत्यार्पण, युके मधील खलिस्तान समर्थक अतिरेकी कारवायांसह इतर भारत-विरोधी कारवाया,यांसारख्या मुद्यांवर सहकार्य वाढवण्याच्या संधी शोधण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात, याचा आढावा घेण्यात आला.
भारतामधील दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी खलिस्तानी समर्थकांकडून यूकेमधील आश्रयाच्या स्थितीचा गैरवापर होत असल्याबद्दल भारताला वाटत असलेल्या चिंतेची यावेळी विशेषत्वाने जाणीव करून देण्यात आली. या प्रकरणी, यूकेकडून अधिक चांगले सहकार्य मिळावे, यूकेस्थित खलिस्तान समर्थक अतिरेकी गटांवरील देखरेख वाढवावी आणि योग्य ती सक्रीय कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली. भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबद्दल भारताला वाटत असलेल्या चिंतेवरही भर देण्यात आला.
दोन्ही बाजूंनी परस्परांबरोबर सुरु असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले, परस्परांबरोबरचे द्विपक्षीय सहकार्य आणखी दृढ करण्यावर आणि दोन्ही देशांमधील वाढीव सुरक्षा सहकार्य कायम राखण्यावर सहमती दर्शवली, आणि बैठकीचा समारोप झाला.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915966)
Visitor Counter : 202