रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
कटरा येथील ‘आयएमएस’ या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रकल्पामुळे माता वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंना प्रवासाचा उत्तम अनुभव येईल - नितीन गडकरी
भारतातील लोकांसाठी आता काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास केवळ स्वप्न राहणार नाही - नितीन गडकरी
Posted On:
11 APR 2023 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री,नितीन गडकरी यांनी आज सांगितले की, कटरा येथे आयएमएस म्हणजेच ‘इंटर मॉडेल स्टेशन’ स्थापन करण्यात येणार आहे, त्यामुळे माता वैष्णो देवी मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना प्रवासाचा उत्तम अनुभव घेता येईल. आयएमएस हा जागतिक दर्जाचा अत्याधुनिक प्रकल्प असणार आहे.कटरा येथील माता वैष्णोदेवी आध्यात्मिक वृद्धी केंद्रामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना गडकरी यांनी ही माहिती दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींबरोबर बोलताना नीतीन गडकरी म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये रस्ते, वाहतूक मंत्रालयाद्वारे 1,30,000 कोटी रुपयांची विकास कामे हाती घेण्यात येत आहेत. 2014 पासून या प्रदेशात सुमारे 500 किमी रस्त्यांचे जाळे पूर्ण झाले आहे.जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 45,000 कोटी रुपये खर्चून 41 महत्त्वपूर्ण बोगदे बांधले जात आहेत, केंद्रशासित प्रदेशात 5,000 कोटी रुपयांचे 18 रोपवे निर्माण करण्यात येतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
जम्मू आणि श्रीनगर दरम्यानच्या प्रवासासाठी 35,000 कोटी रुपयांचे तीन कॉरिडॉर बांधले जात आहेत. या नवीन कॉरिडॉरमुळे पूर्वीचे 320 किलोमीटरचे अंतर 70 किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ दहा तासांवरून चार ते पाच तासांपर्यंत कमी होईल, अशी माहितीही मंत्री त्यांनी दिली.
अमरनाथ तीर्थक्षेत्राला जाणार्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी पहलगाममधील पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणारा 110 किमी लांबीचा अमरनाथ मार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणाही मंत्र्यांनी केली. या मार्गासाठी सुमारे 5300 कोटी रुपये खर्च येईल, असे गडकरी यांनी सांगितले.
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये,अगदी संपूर्ण देशात अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे विकसित केल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करणे असे आता भारतातील लोकांचे केवळ स्वप्न राहिलेले नाही. ते सहजपणे हा प्रवास करू शकतात, असे गडकरी यावेळी म्हणाले.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915755)
Visitor Counter : 191