पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
मार्जार कुळातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय आघाडी
प्रविष्टि तिथि:
10 APR 2023 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त 9 एप्रिल 2023 रोजी कर्नाटकात म्हैसूर इथे आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात, मार्जार कुळातील वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्युमा या सात वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीच्या आंतरराष्ट्रीय आघाडीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला.
भारताला वाघांच्या तसेच मार्जार कुळातील सिंह, हिमबिबट्या , बिबट्या यांच्या संवर्धनाचा दीर्घकाळाचा अनुभव आहे आणि आता नामशेष होत असलेल्या चित्त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत आणण्यासाठीचे प्रयत्न म्हणून भारताने चित्त्यांचे स्थानांतरण देखील केले आहे. वाघ, सिंह, हिमबिबट्या , प्यूमा, जग्वार आणि चित्ता यांचे नैसर्गिक अधिवास असणाऱ्या 97 देशांमध्ये पोहोचण्याचे या आघाडीचे उद्दिष्ट आहे. ही आघाडी जागतिक सहकार्य आणि वन्य अधिवास विशेषत: मार्जार कुळातील मोठ्या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठीचे प्रयत्न अधिक बळकट करेल.
मार्जार कुळातील वन्यप्राणी आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण केल्याने पृथ्वीवरील काही सर्वात महत्वाच्या नैसर्गिक परिसंस्था सुरक्षित होऊ शकतात यामुळे नैसर्गिक हवामान बदलांचे अनुकूलन, लाखो लोकांसाठी पाणी आणि अन्न सुरक्षा तसेच वन समुदायांना उपजीविका आणि उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध होऊ शकतात, असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी, मार्जार कुळातील वन्य प्राण्यांच्या संवर्धनाच्या जागतिक स्थितीसंदर्भातील, मंत्रालयीन सत्राचे अध्यक्षपद भूषवताना सांगितले. ही आघाडी मार्जार कुळातील वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागतिक प्रयत्न आणि भागीदारी बळकट करेल, माहिती आणि सर्वोत्तम पद्धतींच्या एकत्रीकरणासाठी एक व्यासपीठ विकसित करेल, विद्यमान प्रजातींसाठी असलेल्या विशिष्ट आंतर-सरकारी मंचाला पाठबळ देईल, तसेच अधिवासांमध्ये या प्राण्यांना पुन्हा आणण्यासाठीच्या प्रयत्नांना थेट समर्थन प्रदान करेल, असे ते म्हणाले.
शाश्वत विकास आणि उपजीविका सुरक्षितता भारतासाठी मार्जार कुळातील वन्य प्राणी शुभंकर म्हणून आणि मार्जार कुळातील वन्यप्राणी असलेले देश भविष्याचा मार्ग प्रशस्त करत पर्यावरण लवचिकता वाढवण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न करू शकतात.त्याचबरोबर असे भविष्य घडवू शकतो जिथे नैसर्गिक परिसंस्थेची सातत्याने भरभराट होत राहील आणि "अमृत काळ " मध्ये आर्थिक आणि विकास धोरणांमध्ये केंद्रस्थानी राहील, असे यादव यांनी सांगितले.
मार्जार कुळातील वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या देशांच्या मंत्र्यांनी मार्जार कुळातील वन्य प्राण्यांच्या संवर्धनामधील भारताचे नेतृत्व स्वीकारत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते मार्जार कुळातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठीच्या आंतरराष्ट्रीय आघाडीचा प्रारंभ करण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमावर बोलताना मार्जार कुळातील वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या देशांच्या मंत्र्यांनी खालील मुद्दे मांडले.
भूतानच्या वनमंत्र्यांनी आपल्या प्रभावी भाषणात बोलताना या क्षेत्रात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे नेतृत्व स्वीकारले. संपूर्ण वन बिरादरीवर देवी चामुंडी आशीर्वादाचा वर्षाव करो असे त्यांनी नमूद केले. त्यांचे हिंदी मधील 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हे शब्द सभागृहात घुमले.
सुंदरमणी आणि चटगाव वाघांच्या संवर्धनाच्या प्रयत्नात बांगलादेशच्या मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या वनमंत्र्यांनी भारताची प्रशंसा केली.
नेपाळच्या मंत्र्यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील भारताचे नेतृत्व स्वीकारले आणि आघाडीला सर्वतोपरी सहकार्य देऊ केले.
याशिवाय सुरीनाम, आर्मेनिया, टांझानिया, नायजेरिया, व्हिएतनाम, थायलंड आणि लाओच्या मंत्री आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या आघाडीला मिळालेला भरभरून पाठिंबा अधोरेखित केला आणि मार्जार कुळातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी स्थापन झालेल्या आघाडीला पुढे नेण्यासाठी निश्चित कार्यपद्धतींनुसार काम करण्याचे आश्वासन दिले तसेच सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915449)
आगंतुक पटल : 400