उपराष्ट्रपती कार्यालय
देश आरोग्यसंपन्न राहावा यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याकरता दररोज 1 तास समर्पित करावा- उपराष्ट्रपतींचे आवाहन
उपराष्ट्रपतींनी जागतिक होमिओपॅथी दिन 2023 निमित्त आयोजित वैज्ञानिक अधिवेशनाचे केले उद्घाटन
Posted On:
10 APR 2023 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याकरता दररोज 1 तास समर्पित केला पाहिजे, कारण निरोगी व्यक्तीच देशाची प्रगती साध्य करू शकतात, असे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी म्हटले आहे. जागतिक होमिओपॅथी दिन 2023 निमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे आयोजित केलेल्या एका वैज्ञानिक अधिवेशनाचे उद्घाटन करत असताना ते बोलत होते.
दोन शतकांचा इतिहास लाभलेल्या होमिओपॅथीचा विकास आपल्या देशात होत असून गेल्या काही वर्षांत भारताच्या आरोग्य यंत्रणेचा होमिओपॅथी हा एक महत्वाचा घटक बनला आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. होमिओपॅथी निसर्गाशी निगडित असून जागतिक आरोग्य संघटनेने तिला जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आणि झपाट्याने वाढणारी औषधप्रणाली म्हणून मान्यता दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्यसेवा केवळ औषधोपचारांपुरतीच सीमित नसून प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी तसेच समुदायाच्या सामाजिक व आर्थिक वातावरणात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ती उपयोगी ठरते असे मत त्यांनी व्यक्त केले. हल्ली वाढीस लागलेल्या तीव्र स्पर्धात्मक वातावरणामुळे समाजातील ताणतणाव वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हा तणाव नष्ट करण्यासाठी आपण काही पद्धती विकसित केल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
भारताला भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांनी कधी स्वतःच्या देशावर टीका केलेली आपल्याला आढळून येत नाही. आपल्यालाही आपल्या देशातील वैज्ञानिकांचा, प्रतिभावान लोकांचा ,आरोग्य योद्धयांचा अभिमान वाटला पाहिजे. परदेशात भेट देताना आपली राजकीय मते बाजूला ठेवून ‘राष्ट्र प्रथम’ ठेवले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेने हे एकदिवसीय वैज्ञानिक अधिवेशन आयोजित केले होते. ‘होमिओ परिवार - सर्वजन स्वास्थ्य , एक आरोग्य , एक कुटुंब’ या अधिवेशनाचे बोधवाक्य होते.
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915381)
Visitor Counter : 166