आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य क्षेत्राविषयीच्या भारताच्या जी-20 प्राधान्यक्रमांना साध्य करण्याच्या दृष्टीने गोव्यातील आरोग्य सेवा एक आदर्श प्रस्थापित करत आहेत


डिजिटल आरोग्य नवोन्मेष मॉडेल म्हणून गोव्याच्या STEMI प्रकल्पाचे सादरीकरण

गोव्यातील लसीकरणाचे मॉडेल म्हणजे प्रत्येक बालकाचे कालबद्ध पद्धतीने लसीकरण होणे सुनिश्चित करून घेण्यासाठी केलेल्या तंत्रज्ञानाच्या सुनियोजित आणि प्रभावी वापराचे उत्कृष्ट उदाहरण आहे

Posted On: 05 APR 2023 7:30PM by PIB Mumbai

गोवा, 5 एप्रिल 2023

 

दिनांक 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत गोवा येथील नियोजित जी-20 समूहाच्या आरोग्यविषयक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीपूर्वी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोवा राज्य सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या भागीदारीसह हळदोणा येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचा विशेष दौरा आयोजित केला. लसीकरण तसेच STEMI प्रकल्पाची अंमलबजावणी यासंदर्भात गोवा राज्याने केलेल्या कामगिरीची  माहिती उपस्थित स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांच्या  प्रतिनिधींना देण्यात आली.

प्रगत आरोग्य सेवा पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा स्वीकार करून  असंसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण एक तृतीयांशने कमी करण्याच्या उद्देशाने बेंगलुरू येथील ट्रायकॉग हेल्थ सर्विसेस या कंपनीच्या सहकार्याने गोवा राज्य सरकारने STEMI – गोवा या प्रकल्पाची सुरुवात केली होती.

एसटी एलीव्हेशन मायोकार्डीयल इनफार्कशन (STEMI) हा एक प्रकारचा हृदयविकार असून यात हृदयाच्या एका भागाला होणारा रक्तपुरवठा बंद होतो. सदर प्रकल्पाअंतर्गत हब आणि स्पोक मॉडेल कार्यरत केले जाते आणि कॅथ लॅब सुविधा असलेले कोणतेही तृतीयक सुविधा रुग्णालय हब म्हणून काम करते तर रुग्णाला पुढील उपचारासाठी पाठविण्यापूर्वी स्थिर करण्यासाठी एसटीईएमआय अंतर्गत कार्यरत रुग्णालयातील ज्या सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्राचा वापर होतो ते स्पोकचे कार्य करते. प्रत्येक स्पोकमध्ये टेली- ईसीजी सेवेशी जोडलेले ट्रायकॉग ईसीजी मशीन आणि बेंगळूरू येथील हृदयविकार तज्ञांशी जोडलेले कार्डीओनेट अॅप उपलब्ध असते. या सर्व व्यवस्थेमुळे, 5 मिनिटांच्या आत ईसीजी अहवाल मिळतो. रुग्णाला गरज भासली तर स्पोक कडून हब सुविधेकडे स्थलांतरित करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत कार्डीयाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे आणि स्थलांतर काळात रुग्णाच्या स्थितीवर थेट लक्ष ठेवण्याची सोय देखील या रुग्णवाहिकेत उपलब्ध आहे.

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला या मॉडेलमुळे, कमीतकमी वेळेत उपचार मिळतात. रुग्णाला झटका आल्यानंतरचा 90 मिनिटांचा सुवर्ण कालावधी उपचारासाठी योग्य प्रकारे वापरता येऊन असंख्य जीव वाचवता येतात. एक सरकारी हब आणि त्याच्या परिघातील 12 कार्यरत सरकारी रुग्णालये स्पोक म्हणून वापरून हा प्रकल्प सुरु करण्यात आला. आता या प्रकल्पाचा 4 हब्स आणि 20 स्पोक्स असा विस्तार झाला आहे.

हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मॉयडा  उपकेंद्रात राज्य सरकारच्या वतीने  राबवण्यात आलेला लसीकरण कार्यक्रम  देखील दाखवण्यात आला.  प्रत्येक  बालकाचे वेळेवर लसीकरण केले जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी, ही व्यवस्था  तंत्रज्ञानाच्या सुव्यवस्थित आणि प्रभावी वापराचे  उत्कृष्ट उदाहरण आहे. या मॉडेल अंतर्गत, बाळाच्या जन्मानंतर  त्याच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाची माहिती  ठेवण्यासाठी डिजिटल आणि मुद्रित नोंदी  ठेवल्या जातात.बालकाच्या  पालकांना दूरध्वनीच्या माध्यमातून लसीच्या आगामी मात्रेची  आठवण करून दिली जाते. पालक शहराबाहेर असल्यास, त्यांच्या बालकांना  लस देण्यासाठी  जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला जातो किंवा ते परत आल्यांनतर आरोग्य केंद्रात त्यांना लसमात्रा दिली जाते.

युनिसेफचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश  यांनी लसीकरण सेवांचे महत्त्व विशद केले आणि ते आरोग्य सुविधा आणि समुदायांना जोडण्यासाठी  पूल म्हणून  कशाप्रकारे काम करतात हे देखील सांगितले. आरोग्य सेवा उपलब्ध होण्यात अडथळे असणाऱ्या ग्रामीण खेड्यांमध्ये आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्येही प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी लसीकरण आउटरीच  उपक्रम  योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. सार्वत्रिक आरोग्य सुविधांच्या व्याप्तीचे  उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने, चुकलेल्या /शाळा सोडलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी  आणि आरोग्य केंद्रित शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देण्यासाठी  भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमांना युनिसेफ पाठबळ देते, असे त्यांनी नमूद केले.

आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणाच्या क्षेत्रात गोवा ताकदीने वाटचाल  करत आहे,असे  गोवा सरकारचे आरोग्य सचिव अरुण मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांच्या शिष्टमंडळाला संबोधित करताना सांगितले. या वर्षी जुलैपर्यंत राज्यातील संपूर्ण लोकसंख्या आयुष्मान भारत आरोग्य खात्यांतर्गत समाविष्ट होईल अशी त्यांची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील  डिजिटल आरोग्य सेवांचे कार्यक्षम मॉडेल गोव्यातील टेलिमेडिसिन सेवांचा मोठ्या प्रमाणातील वापर सिद्ध करते, असे ते म्हणाले.

भारताच्या जी 20 अध्यक्षेतेने आरोग्य कार्यगटासाठी, आरोग्य आपत्कालीन  स्थिती प्रतिबंध आणि सज्जता; औषध उत्पादन  क्षेत्रात सहकार्य बळकट  करणे आणि डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाय हे  तीन प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. आरोग्य कार्यगटांतर्गत निश्चित करण्यात आलेले  भारताचे जी 20 प्राधान्यक्रम साध्य करण्याच्या दिशेने. गोव्यातील वैद्यकीय सेवा कशाप्रकारे एक उदाहरण प्रस्थापित करत आहेत हे दाखवून देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या दौऱ्यामुळे मदत झाली आहे.

 

* * *

PIB Panaji | S.Patil/Sanjana/Sonal C/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914018) Visitor Counter : 238


Read this release in: English , Urdu , Hindi