वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये रुपांतरीत केले: पियुष गोयल
Posted On:
02 APR 2023 7:34PM by PIB Mumbai
भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये रुपांतरीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 9 वर्षाच्या दूरदर्शी आणि चतुर नेतृत्वाची केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली आहे.
पीयूष गोयल आज विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूरच्या वार्षिक ई-समिट कन्सोर्टियम 2023 च्या समारोप सत्रात दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभागी झाले होते. तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून जगभरात भारताला आदर आणि महत्व आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. एक राष्ट्र म्हणून भारत जगाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर अथक वाटचाल करत असून घडत असलेला विकास शाश्वत आणि सर्वसमावेशक असेल हे सुनिश्चित करत आहे, असे गोयल म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे सूकाणू यशस्वीरीत्या चालवत कोविड महामारीची प्रभावी हाताळणी आणि उदयोन्मुख महासत्तेची पायाभरणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक कंपन्यांचे नेतृत्व करत भारतीय तरुण जगभरात आपली प्रभावी प्रतिभा आणि क्षमता प्रदर्शित करत आहेत, असे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताचा प्रवास तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेने होत असल्यामुळे युवकांना नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनण्यास मदत होत आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाबरोबर नोंदणी केलेल्या 90,000 हून अधिक स्टार्टअप्सनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दहा लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी साधे पण अत्यंत प्रभावी उपाय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी स्टार्टअप्सचे कौतुक केले. या उपायांमुळे व्यवसाय करणे आणि जीवनमान सुलभ होते असेही ते म्हणाले. स्टार्टअपमध्ये लैंगिक समानता आहे कारण जवळपास निम्म्याहून अधिक स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे आणि अनेक यशस्वी स्टार्टअप्समध्ये महिला उद्योजक आघाडीवर आहेत, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच जाहीर झालेल्या परकीय व्यापार धोरण 2023 मध्ये, आत्मनिर्भर भारत हे एक शक्तिशाली आणि मजबूत राष्ट्र म्हणून जगासोबत समानतेने सहभागी होण्यास तयार असल्याचे प्रतिबिंबित करणारी अनेक वैशिष्ट्ये आहेत, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्था, उद्योग आणि गुंतवणूकदार यांच्या एककेंद्राभिमुखतेसाठी सरकार काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वदेशी आणि नाविन्यपूर्ण संशोधन ही काळाची गरज असून व्हीएनआयटीमधील विद्यार्थी नावीन्याची ही भावना त्यांच्यासोबत देशभर घेऊन जातील, असेही ते म्हणाले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1913119)
Visitor Counter : 233