संरक्षण मंत्रालय
सुरक्षित सीमा आणि स्वावलंबनापासून ते मजबूत अर्थव्यवस्था आणि बदललेल्या जागतिक प्रतिमेद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सर्वात सामर्थ्यशाली देशांपैकी एक म्हणून उदयाला येत असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नवी दिल्ली इथल्या 'रायझिंग इंडिया कॉन्क्लेव्ह' मध्ये प्रतिपादन
आत्मनिर्भरतेवर आधारित राष्ट्रीय सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा राजनाथ सिंह यांचा पुनरुच्चार
चालू आर्थिक वर्षात देशाची संरक्षण निर्यात जवळजवळ 14,000 कोटीवर पोहोचली असून, 2026 पर्यंत 40,000 कोटीचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट: राजनाथ सिंह
भारत कधीही कोणाचे नुकसान करणार नाही, मात्र कुठलीही धमकी देखील खपवून घेणार नाही, देशाचे सशस्त्र दल कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास
लढाऊ विमान उडवण्यापासून ते तोफखाना दलात समाविष्ट होत, भारतीय महिला, सशस्त्र दलांना सामर्थ्य देत आहेत; सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे: राजनाथ सिंह
Posted On:
30 MAR 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2023
सुरक्षित सीमा आणि स्वावलंबनापासून ते मजबूत अर्थव्यवस्था आणि बदललेल्या जागतिक प्रतिमेद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सर्वात सामर्थ्यशाली देशांपैकी एक म्हणून उदयाला येत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली इथे 30 मार्च 2023 रोजी एका खासगी माध्यम संस्थेने आयोजित केलेल्या 'रायझिंग इंडिया कॉन्क्लेव्ह (परिषद)'ला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रांमध्ये, विशेषतः संरक्षण क्षेत्रात अनेक परिवर्तनीय बदल घडले आहेत, त्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशाच्या स्वयंपूर्ण संरक्षण उद्योगाच्या पाठबळावर सीमा सुरक्षित झाल्या आहेत आणि सशस्त्र दल युद्ध सज्ज झाले आहे, याचे संपूर्ण श्रेय त्यांनी सरकारचा धाडसी दृष्टीकोन आणि दृढ संकल्पाला दिले. राष्ट्रीय सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, ते उद्दिष्ट गाठण्याचे स्वावलंबन हे एकमेव माध्यम असल्याचे सांगून, संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर होण्यासाठी अथक प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्वदेशी उपकरणांच्या खरेदीसाठीच्या याद्यांची अधिसूचना, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये स्वदेशी उद्योगांच्या संरक्षण भांडवल खरेदीसाठी अर्थसंकल्पामध्ये 75 टक्के विक्रमी वाटा राखून ठेवणे, आणि स्थानिक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न, यासारख्या संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या काही पावलांचा त्यांनी उल्लेख केला.
गेल्या काही वर्षांत देशांतर्गत संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.“आपण केवळ आपल्या स्वतःच्याच गरजा भागवत नाही तर इतर देशांना शस्त्रे आणि उपकरणे निर्यात करत आहोत, असे संरक्षण मंत्र्यांनी या निर्णयांच्या यशाबद्दल बोलताना सांगितले. 7-8 वर्षांपूर्वी 900 कोटी रुपये असलेल्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत आता अभूतपूर्व वाढ झाली असून चालू आर्थिक वर्षात ती 14,000 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. 2026 पर्यंत 40,000 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असे ते म्हणाले. संरक्षणमंत्र्यानी यावेळी बोलताना देशात निर्माण केलेल्या स्टार्ट-अप-आधारित नवोन्मेष कार्यक्षेत्राचाही उल्लेख केला. सरकारच्या प्रयत्नांमुळे 100 हून अधिक युनिकॉर्न तयार झाले असून ही या कार्यक्षेत्रातील यशाचीच साक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताने दहशतवादासारख्या मुद्द्यांवर जगाचे नेतृत्व केले आहे आणि दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी जगातील इतर देशांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. भारत कधीही कोणाचेही विनाकारण नुकसान करत नाही मात्र देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही सोडत नाही हे वास्तव, जे देश दहशतवादाचा एक हत्यार म्हणून वापर करतात त्यांना माहीत आहे, असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत , या कारवाईने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले तसेच भारत स्वत:च्या भूमीवरील आणि गरज पडल्यास परदेशी भूमीवरच्याही दहशतवादाचा नायनाट करेल असा कडक संदेश या कारवाईने जगाला दिला, असे त्यांनी सांगितले. "चीनसोबतची तणावाची स्थिती असो किंवा पाकिस्तानचे दुष्ट इरादे असोत , आपल्या सैन्याने गरज पडेल तेव्हा त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.", असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीचे आणखी एक उदाहरण असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे या केंद्रशासित प्रदेशाने शांतता आणि प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले.
'नव्या भारतामध्ये ' अभिजनवादी मानसिकतेला स्थान नाही,140 कोटी भारतीयांना समान संधी देण्यावर आमचा विश्वास आहे.जेव्हा सर्व लोक एकत्रितपणे संपूर्ण उर्जेसह समर्पणाने देशाला पुढे घेऊन जातील तेव्हाच सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल ,” असे सांगत राजनाथ सिंह यांनी भाषणाचा समारोप केला
* * *
R.Aghor/S.Chavan/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912372)
Visitor Counter : 148