रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट बंदराला दिल्लीशी जोडणाऱ्या मार्गासह 15 हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा

Posted On: 30 MAR 2023 4:47PM by PIB Mumbai

रत्नागिरी, 30 मार्च 2023

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66) काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होऊन जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यांनी आज मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी केली. त्यानंतर रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी गडकरी यांनी संवाद साधला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की,  या प्रकल्पाची एकूण 10 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेसचे (P-9, P-10)  जवळपास 99% काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 5 पॅकेजेस असून यापैकी 2 पॅकेजेस (P-4, P-8)चे अनुक्रमे 92% व 98% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दोन पॅकेजेस (P-6, P-7) साठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेस (P-2, P-3) चे अनुक्रमे 93% व 82% काम पूर्ण झाले आहे. पॅकेज (P-1) चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल.

पनवेल-इंदापूर टप्प्यासाठी भूमी अधिग्रहण आणि पर्यावरण परवानग्या यामुळेही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उशीर झाल्याचे गडकरी म्हणाले. आता यातील सर्व बाबींची पूर्तता झाली असून कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात उड्डाणपूल काढून पर्यावरणाची काळजी घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. तसेच प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा मार्ग असल्यामुळे औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज 15 हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा 13,000 कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.

तत्पूर्वी, आज सकाळी रायगड जिल्ह्यातील पळस्पे गावात 414.68 कोटी रुपये किंमतीच्या आणि 63.900 किमी लांबीच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या प्रकल्पांमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि दिघी या दोन बंदरांवर आर्थिक गतिमानतेला चालना मिळेल. तर, पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवास गतीमान होईल आणि इंधनाची बचत होईल.

   

 

बांबूपासून निर्मित संरक्षणभिंत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात टाळण्यासाठी बांबूंपासून निर्मित संरक्षणभिंत उभी करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे दिला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्याची सूचना राज्य सरकारला करण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय मानकांनूसार चिन्हांची माहिती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंतरराष्ट्रीय मानकांनूसार चिन्ह (सायनेजेस) लावण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. यामुळे वाहनधारकांना सुलभता होऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.  

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Thakur/D.Rane



(Release ID: 1912257) Visitor Counter : 243


Read this release in: English , Urdu , Hindi