आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी 25 देश एकत्र आले

Posted On: 29 MAR 2023 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मार्च 2023

 

भारताच्या अध्यक्षतेखालील एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) अंतर्गत, आयुष मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय आरोग्य परिषद, B2B परिषद आणि एक्स्पो मध्ये, पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी 25 एससीओ देश यशस्वीपणे एकत्र आले आहेत, ज्यायोगे, ते आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षणामध्ये योगदान देतील, आणि एससीओ देशांचे आरोग्य सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करतील. या कार्यक्रमात म्यानमारचे आरोग्य मंत्री डॉ. थाट खाइंग विन, मालदीवचे आरोग्य उपमंत्री साफिया मोहम्मद सईद, आणि आयुष राज्य मंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई उपस्थित होते. तसेच, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तांत्रिक संत्रांमधील चीन, रशिया आणि पाकिस्तानचा सहभाग देखील लक्षात घेण्याजोगा होता. परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

एससीओ B2B परिषदेच्या पार्श्वभूमीवर, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमधील सहकार्यावर चर्चा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने म्यानमार बरोबर, द्विपक्षीय बैठक देखील आयोजित केली होती. भारताचे आयुष मंत्रालय आणि म्यानमारच्या आरोग्य मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2016 रोजी याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून, त्याची मुदत 28 ऑगस्ट 2026 पर्यंत आपोआप वाढली आहे. आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी भारतीय बाजूचे नेतृत्व केले, तर म्यानमारचे नेतृत्व म्यानमारच्या आरोग्य मंत्री डॉ थाट खाइंग विन यांनी केले.

या परिषदेत एकूण 214 जण सहभागी झाले. यामध्ये 16 SCO देशांमधील 83 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि 131 भारतीय प्रतिनिधींचा समावेश होता. या कार्यक्रमात एकूण 30 सादरीकरणे करण्यात आली, यापैकी 19 सादरीकरणे SCO देशांची होती. आयुष मंत्रालय आणि उद्योग मंत्रालयाच्या सादरीकरणांसह भारताने एकूण 11 सादरीकरणे केली. या परिषदेत एकूण 11 सत्रे आयोजित करण्यात आली होती. विविध चर्चा सत्रे/सादरीकरणे, व्यापार उपक्रम आणि त्याच वेळी सुरु असलेल्या राष्ट्रीय आरोग्य परिषद/प्रदर्शनातील सर्व प्रतिनिधींचा सक्रीय सहभाग विशेष उल्लेखनीय होता.  

गुवाहाटी येथील B2B प्रदर्शनात संस्था आणि पायाभूत सुविधांचा सहभाग होता. यावेळी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि आयुष सेवा पुरवठादारांसह 56 प्रदर्शकांनी आयोजित केलेल्या त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाला 11 देशांमधील 60 खरेदीदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.

परिषद आणि प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि विक्रेते यांच्यात 125 पेक्षा जास्त प्रत्यक्ष बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. आयुर्वेदाचे शिक्षण, पारंपरिक औषधी उत्पादने आणि किफायतशीर वैद्यकीय प्रवासा अंतर्गत आयुर्वेद आणि योग उपचार देण्यासाठीच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यापार करण्यासाठी 13  एससीओ  देशांनी उत्सुकता दर्शवली. या B2B बैठकीत ताजिकिस्तान, आर्मेनिया, उझबेकिस्तान, मंगोलिया, कझाकिस्तान, बहरीन, म्यानमार, श्रीलंका आणि भारत हे देश सहभागी झाले.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911872)