सांस्कृतिक मंत्रालय

समाजातील शेवटच्या व्यक्तीचा उदय आणि विकास सुनिश्चित करणे हा भारतीय संदर्भात ‘अंत्योदय’ या संकल्पनेचा अर्थ असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन


नैतिकता, अर्थव्यवस्था, पर्यावरणीय परिसंस्था हे समाजाचे तीन आधार स्तंभ आहेत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सिव्हील-20 इंडिया 2023 ची प्रारंभिक बैठक नागपूर इथे झाली संपन्न

Posted On: 21 MAR 2023 9:14PM by PIB Mumbai

नागपूर/मुंबई, 21 मार्च 2023

समाजातील शेवटच्या व्यक्तीचा उदय आणि विकास सुनिश्चित करणे हा भारतीय संदर्भात ‘अंत्योदय’ या संकल्पनेचा अर्थ असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते आज नागपूर मध्ये सिव्हील-20 (C-20) बैठकीच्या समारोप सत्राला संबोधित करताना बोलत होते. नैतिकता, अर्थव्यवस्था, पर्यावरणीय परिसंस्था हे समाजाचे तीन आधार स्तंभ असल्याचे ते यावेळी म्हणाले. सिव्हील-20 इंडिया 2023 (C-20) बैठकीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि सिव्हिल 20 इंडिया 2023 चे प्रभारी डॉ. विनय सहस्रबुद्धे, संयुक्त सचिव (G-20), परराष्ट्र मंत्रालय आणि सूस-शेर्पा, G-20 भारताचे राजदूत अभय ठाकूर, कन्याकुमारी इथल्या विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष, निवेदिता भिडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सिव्हील 20 इंडिया 2023 चे शेर्पा आणि माजी राजदूत विजय नांबियार, हे सिव्हील-20 इंडिया 2023 च्या प्रारंभिक बैठकीच्या समारोप सत्राचे अध्यक्ष होते.  

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 2070 पूर्वी भारताला कार्बन न्यूट्रल (कार्बन उत्सार्जन मुक्त) देश बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारत आता हरित इंधन, या जीवाश्म इंधनाच्या पर्यायी स्त्रोताच्या दिशेने वाटचाल करत आहे. विविध स्त्रोतांपासून बायो-इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितले की, शाश्वत धोरणांचा एक भाग म्हणून, नवी दिल्ली इथे 20 लाख टन कचरा रस्त्यांच्या बांधकामासाठी वापरला जात आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरित विकासाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे, असे केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले. ते म्हणाले की, ‘सबका साथ सबका विकास’ ही सरकारची कार्यपद्धती आहे, आणि सर्वसमावेशक विकास ही त्याची संकल्पना आहे.

नागपुरात सिव्हिल 20 इंडिया 2023च्या प्रारंभिक परिषदेसाठी जगभरातील प्रसिद्ध तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, स्वयंसेवी संस्था आणि धोरण अभ्यासकांची उपस्थिती पाहून आनंद झाला, असे नितीन गडकरी म्हणाले.

विजय नांबियार यांनी यावेळी  परिषदेचा संक्षिप्त अहवाल सादर केला. पुढील सी-20 शिखर परिषदेपूर्वी सिव्हिल 20 इंडिया 2023 च्या कार्यकारी गटाच्या संकल्पना पुस्तिकेचे धोरणात्मक  निर्णयात रुपांतर करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

भारताच्या जी-20 प्राधान्यक्रमांशी सुसंगत असलेल्या सामान्य लोकांच्यादृष्टीने काळजीच्या ठरलेल्या मुद्द्यावर आवाज उठवून सी-20 मोठी भूमिका बजावत आहे, असे अभय ठाकूर म्हणाले. लोकशाही शासन हा भारताच्या सामाजिक-आर्थिक चौकटीचा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. जी-20 अध्यक्षपद भारताची झालेली  आर्थिक वृद्धी दर्शवेल, असेही ते म्हणाले.

नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे सिव्हिल 20 प्रारंभिक परिषदेचे यजमानपद नागपूरला मिळणे यापेक्षा अधिक चांगली निवड असू शकत नाही असे ते पुढे म्हणाले.

परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांचा निवेदिता भिडे यांनी पुनरुच्चार केला सिव्हिल-20 प्रक्रियेत  . प्रथमच अध्यात्म या संकल्पनेचा समावेश  केला आहे. भारत हा अध्यात्माचा देश आहे.  आपण एकता या संकल्पनेवर कार्य करण्याचा प्रयत्न करतो असा याचा अर्थ आहे, असे त्या म्हणाल्या. ही परिषद एका महत्त्वाच्या टप्प्यातून गेली आहे आणि आता सी-20 धोरण बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. नागपूर हे स्वयंसेवेचा मोठा इतिहास असलेले शहर आहे. तंत्रज्ञानाला मानवता किंवा अध्यात्मिकतेची जोड देण्याची क्षमता स्वयंसेवे मध्ये आहे, असे ते म्हणाले. सिव्हिल 20 भारत 2023 (C-20) बैठकीच्या अध्यक्ष या नात्याने माता अमृतानंदमयी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सहस्त्रबुद्धे यांनी त्यांचे आभार मानले. परिषदेचे यशस्वी आयोजनात ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांचेही त्यांनी आभार मानले.

 

Jaydevi PS/Rajshree/Prajna/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1909328) Visitor Counter : 231


Read this release in: English , Urdu , Hindi