आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दोन दिवसीय जागतिक भरड धान्य (श्री अन्न ) परिषदेच्या निमित्ताने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने तांत्रिक सत्रांचे केले आयोजन


परिसंवादाच्या 2 ऱ्या दिवशी, तज्ञांनी नवोन्मेष , संशोधन आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित केले तसेच विविध सत्रांमध्ये श्री अन्न (भरड धान्ये ) हे उत्पादने म्हणून मुख्य प्रवाहात आणण्याच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली

“युवकांना केंद्रस्थानी ठेवून नवोन्मेष, पोहोच आणि विपणन हीच भविष्यात भरड धान्याला सर्वोत्तम पोषक आहार बनवण्याची गुरुकिल्ली आहे”,असे जगभरातील तज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील सदस्यांनी काल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयद्वारे आयोजित जागतिक भरड धान्य (श्री अन्न ) परिषदेत सांगितले

Posted On: 20 MAR 2023 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जागतिक भरड धान्य  (श्री अन्न ) परिषदेच्या निमित्ताने  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने भरड धान्याचा  प्रचार आणि जनजागृतीबाबत  तांत्रिक सत्रांसह परिसंवाद आयोजित केला होता. या दोन दिवसीय जागतिक भरड धान्य  (श्री अन्न) परिषदेला शनिवारी  पुसा, नवी दिल्ली येथील एनएएससी संकुलात सुरुवात झाली.

दोन दिवसीय परिषदेच्या समारोपाच्या दिवसाच्या पूर्ण सत्राची सुरुवात ब्रिटनच्या इन्स्टिट्यूट ऑफ फूड, न्यूट्रिशन अँड हेल्थ (IFHN),युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे संचालक डॉ, डी इयान गिव्हन्स यांच्या विशेष भाषणाने झाली. डॉ गिव्हन्स यांनी सूक्ष्म पोषक तत्वांची  कमतरता कमी करण्यासाठी शाश्वत उपाय म्हणून भरड धान्यावर भर दिला.

भरड धान्याची  लागवड आणि वापर पुनरुज्जीवित करण्याच्या महत्त्वावर चर्चा पुढे सुरु ठेवत दुसऱ्या दिवशीचे पहिले  सत्र आणि परिषदेचे चौथे सत्र "संशोधन, नवोन्मेष  आणि शाश्वतता " यावर  केंद्रित होते. या सत्राचे संचालन केंद्र  सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव  लव अग्रवाल यांनी केले. सत्राचा संदर्भ स्पष्ट करताना अग्रवाल म्हणाले की, भरड धान्याच्या वापराला चालना देण्यासाठी जागरूकता, नवोन्मेष , बाजारपेठांचे एकत्रीकरण आणि भक्कम पुरवठा साखळी यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल आणि बैठी जीवनशैली यामुळे  आजारांचा भार  अधिक वाढला आहे. असे  अग्रवाल म्हणाले.

सत्रांना उपस्थित असलेल्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता आणि  पॅनेलच्या सदस्यांनी काही औत्सुक्यपूर्ण  प्रश्न विचारले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  जी. कमला वर्धन राव यांनी परिषदेचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीसाठी काही सूचना केल्या. समारोपाच्या भाषणात  त्यांनी पुरवठा आपोआप मागणी निर्माण करतो हा  'से' चा बाजाराचा नियम सांगितला.  ब्रेड, बिस्किटे, नूडल्स, चॉकलेट सारख्या  दैनंदिन खाद्यपदार्थांमध्ये आता भरड धान्याचा  समावेश व्हायला हवा , असेही ते म्हणाले.

राव म्हणाले की, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, मात्र हे अभियान  इथेच थांबू नये, ते वर्षानुवर्षे सुरूच रहावे.

तांत्रिक सत्रातील भागधारकांनी नमूद केले की भरड धान्याच्या  जंगली जाती अनेक आजारांवर  अत्यंत उपयुक्त  आहेत मात्र त्यांचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. भरड धान्याला जास्त मागणी आहे आणि भरड धान्याचा टिकाऊपणा  वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पॅकेजिंग उपायांवर  संशोधन केले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला विविध देशातल्या शैक्षणिक संस्था, सार्वजनिक आरोग्य सुविधा, विकास भागीदार, उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1908916) Visitor Counter : 540


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil