राष्ट्रपती कार्यालय

लक्षद्वीपमध्ये नागरी स्वागत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित


लक्षद्वीप संपूर्ण जगासाठी पर्यावरण पर्यटनाचे मॉडेल म्हणून उदयाला  येऊ शकते: राष्ट्रपती मुर्मू

Posted On: 18 MAR 2023 10:04PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी (18 मार्च 2023) लक्षद्वीपमध्ये  कवरत्ती येथे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित नागरी स्वागत समारंभाला उपस्थित होत्या.

लक्षद्वीपमध्ये समुद्री शेवाळ उद्योग विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे या कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी सांगितले. लक्षद्वीपमध्ये सागरी शेवाळाच्या लागवडीमुळे विदेशी उत्पादनांवर अवलंबून असलेल्या औषध कंपन्या आणि हॉटेल उद्योगाच्या आयात देयकात मोठी घट होईल , असे त्या म्हणाल्या.

शुभ्र वाळूचे किनारे, प्रवाळ  आणि वैविध्यपूर्ण सागरी परिसंस्थेचे  निसर्गसौंदर्य लाभलेल्या  लक्षद्वीप बेटांमध्ये पर्यटनाची उच्च क्षमता आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.   लक्षव्दीप मधील  प्रशासन नीती आयोगाच्या नेतृत्वाखालील  पथदर्शी प्रकल्प म्हणून  कडमत, मिनिकॉय आणि सुहेली येथे उच्च श्रेणीच्या  पर्यावरण - पर्यटन  प्रकल्पांचा विकास करण्यासाठी कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले.  या केंद्रशासित प्रदेशातील निळ्या तलावांमध्ये भारतातील पहिले वॉटर व्हिला बांधले जाणार आहेत ही अभिमानाची बाब आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. पर्यटन क्षेत्रातील या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पर्यटनाचा चेहरामोहरा  मोठ्या प्रमाणात बदलेल. महत्त्वाचे म्हणजे लक्षद्वीप  संपूर्ण जगासाठी पर्यावरण पर्यटनाचे  मॉडेल म्हणून उदयाला येऊ शकते,असेही त्या म्हणाल्या.

बेटांचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून लक्षद्वीप प्रशासन गेल्या काही वर्षांमध्ये बेटांच्या विकासाच्या मार्गात संपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी सुधारणांवर जोर देत आहे हे जाणून घेतल्यांनतर  राष्ट्रपतींनी  आनंद व्यक्त केला. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासोबतच  प्रशासनाकडून योग्य अंमलबजावणी  आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणे याशिवाय  लोकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी अनेक बेटांवर पृथक्करण संयंत्र उभारण्यासाठी लक्षद्वीप प्रशासन विशेष कौतुकास पात्र आहे, असे त्या म्हणाल्या.

केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप शालेय मुलांसाठी अत्याधुनिक सुविधा पुरवतो. आपल्या देशातील इतर ठिकाणांपेक्षा लक्षद्वीपमध्ये शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर उत्तम  आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. शालेय शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी प्रशासनाच्या वचनबद्धतेबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांनी प्रशंसा केली.  विद्यार्थ्यांना व्यावसायिक, रोजगारक्षम आणि उद्योजकीय कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी, शिक्षण विभाग लक्षद्वीपच्या शाळांमध्ये डिजिटल साक्षरता अभ्यासक्रम चालवत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण विभागाच्या या प्रयत्नांमुळे या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजच्या युगात कोणत्याही प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी इंटरनेटची सुविधा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षद्वीपमध्ये पाणबुडी ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल हे जाणून त्यांनी आनंद व्यक्त केला.

लक्षद्वीप हे भौगोलिकदृष्ट्या अलिप्त ठिकाण असल्याने वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर अतिरिक्त विचार करावा लागेल. उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांचा विकास या सुंदर बेटांच्या पर्यावरणाचे रक्षण करेल आणि जगाला पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग दाखवेल,असे राष्ट्रपती म्हणाल्या.

***

G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908468) Visitor Counter : 110


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali