आयुष मंत्रालय
आयुष मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांच्या हस्ते राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या 26 व्या दीक्षांत समारंभाचे उद्घाटन
भारत आज सर्वंकष आरोग्याच्या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी सज्ज - सर्बांनंद सोनोवाल
Posted On:
16 MAR 2023 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2023
केंद्रीय आयुष मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांच्या हस्ते आज, नवी दिल्लीत, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या(आरएव्ही) 26 व्या दीक्षांत समारंभाचे तसेच, तृणधान्यांचा वापर या विषयावरील 28 व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले. युवा वैद्यांनी, भारतातील पारंपरिक औषधे आणि प्राचीन ज्ञान जागतिक पटलावर न्यावे, तसेच, भारताला नव्या उंचीवर नेत मानवजातीची सेवा करावी, असे आवाहन सोनोवाल यांनी यावेळी केले.
आयुर्वेदात जागतिक नेतृत्व म्हणून भारताचे स्थान निर्माण करण्यात, पंतप्रधान मोदी यांनी जे अथक परिश्रम घेतले आहेत, त्याचा उल्लेख सोनोवाल यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारतात जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना केली. आयुष क्षेत्राकडे केंद्र चालवण्यासाठीचे स्त्रोत, संधी आणि क्षमता असल्यामुळे भारत आता सर्वंकष आरोग्याच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. याच समर्पित वृत्तीने काम करत, भारताला नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना केले.
दीक्षांत समारंभात, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मुख्य भाषण झाले. “राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या संकल्पनेचा जन्म, भारतातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञान आणि परंपरांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्याच्या उद्देशाने झाला होता. आज या वैद्यकीय शाखेतून पदवीधर झालेल्यांचे मी अभिनंदन करतो. आयुर्वेदाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतील, आणि देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तसेच आयुर्वेदाचे उपचार करणाऱ्या सर्व वैद्यांनी आणि गुरूंनी आयुर्वेदाच्या उपचारांचे दस्तऐवजीकरण करावे, आणि त्यांच्या उपचारादरम्यान आलेले रुग्णांचे अनुभव त्यांनी लिहून ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. प्रमोद सावंत यांना ‘आरएव्ही’ची फेलोशिप देण्यात आली आणि सोनोवाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. देशाच्या विविध भागांतील इतर नामवंत वैद्यांनाही यावेळी फेलोशिप देण्यात आली. आरएव्ही आणि अमृता स्कूल ऑफ आयुर्वेद, कोल्लम, केरळ यांच्यात यावेळी सामंजस्य करार झाला. देशभरातील 100 वैद्यकीय उपचारांचे दस्तऐवजीकरण करणारे परस्परसंवादी बहुआयामी वेब प्लॅटफॉर्म विकसित करणे असा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
या दीक्षांत समारंभासोबत, तृणधान्याच्या 18 व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात देशभरातील तृणधान्य तज्ञ सहभागी झाले आहेत.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1907820)
Visitor Counter : 148