सांस्कृतिक मंत्रालय

नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात आयोजित "सामायिक बौद्ध वारसा" या विषयावरील पहिल्या एससीओ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन


या परिषदेच्या माध्यमातून केवळ समान बौद्ध वारसा साजरा केला जाणार नसून, आपल्या देशांमधील परस्पर संबंध अधिक मजबूत आणि दृढ होतील, केंद्रीय मंत्री जी. के. रेड्डी यांचे प्रतिपादन

वारसा आणि इतिहास सर्व एससीओ देशांना जोडतो: केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी

भगवान गौतम बुद्धांची आत्म ज्ञान आणि आत्म परीक्षणाची शिकवण 21 व्या शतकासाठीही अत्यंत समर्पक आहे: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल

Posted On: 14 MAR 2023 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

 

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सामायिक बौद्ध वारसा या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात उद्घाटन झाले. ही परिषद, भारतीय संस्कृती आणि  शांघाय सहकार्य संघटना यांच्यातील संबंध, या विषयावर केंद्रित असेल.

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. के. रेड्डी, सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाचे महा संचालक अभिजित हलदर आणि चीन, पाकिस्तान, रशिया, बहारीन, म्यानमार, संयुक्त अरब अमिरात  येथील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या परिषदेच्या माध्यमातून केवळ समान बौद्ध वारसा साजरा केला जाणार नसून, आपल्या देशांमधील परस्पर संबंध अधिक मजबूत आणि दृढ होतील असे जी. के. रेड्डी यावेळी म्हणाले. ते असेही म्हणाले की, जगातील शाश्वत सुसंवादाचा आंतरिक दृष्टीकोन असलेला बौद्ध धर्म, सर्वदूर पोहोचला आहे, आणि त्याने शतकांपूर्वीच शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) देशांमधील जनतेच्या जीवनाला स्पर्श केला आहे. आपल्या सर्वांना घट्ट जोडणाऱ्या याच अंतर्गत दुव्यामुळे, आज अशा स्वरूपाच्या या पहिल्याच परिषदेत आपण एकत्र आलो आहोत. या ठिकाणी जमलेल्या देशांमधील सांस्कृतिक संबंध आणि सामायिक इतिहासाचे नूतनीकरण करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

उपस्थितांना संबोधित करताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांची आत्मबोध आणि आत्म परीक्षणाची शिकवण 21 व्या शतकासाठीही अत्यंत समर्पक आहे.

आपल्या भाषणामध्ये मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, वारसा आणि इतिहास शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सर्व देशांना जोडतो. त्या असेही म्हणाल्या की भगवान गौतम बुद्धांनी मूल्याधारित जीवनाचे महत्त्व सांगितले, जे आपल्या सह-अस्तित्त्वासाठी आवश्यक आहे. एससीओचे सदस्य बौद्ध तत्वज्ञानाने जोडले गेले असून, हे तत्त्वज्ञान शांघाय सहकार्य संघटनेला नैतिकता आणि मूल्य प्रणालीच्या आधारे एक प्रचंड मोठी शक्ती बनवू शकेल, असे त्या म्हणाल्या.

एससीओच्या भारताच्या  नेतृत्वाखाली (17 सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी) आयोजित करण्यात आलेली अशा स्वरुपाची ही पहिलीच परिषद असून, तिने  मध्य आशियाई, पूर्व आशियाई, दक्षिण आशियाई आणि अरब देशांना "सामायिक बौद्ध वारसा" या विषयावर चर्चा करण्यासाठी समान व्यासपीठावर एकत्र आणले आहे.

सांस्कृतिक मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ (IBC-सांस्कृतिक मंत्रालयाची अनुदान देणारी संस्था म्हणून) यांनी एकत्र येऊन हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतामधील बौद्ध धर्माचे अनेक अभ्यासकही या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

परस्परांमधील सांस्कृतिक दुवे पुन्हा प्रस्थापित करणे, मध्य आशियामधील बौद्ध कला, कला शैली, पुरातत्व स्थळे आणि एससीओ देशांमधील विविध संग्रहालयांकडे जतन केलेला पुरातन संग्रह यामधील साम्य शोधणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906976) Visitor Counter : 144


Read this release in: Hindi , Urdu , Odia , English