युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाय20 सत्रामध्ये आधुनिक भारतासाठी कायदेशीर सुधारणांच्या रुपरेषेची चाचपणी

Posted On: 11 MAR 2023 10:32PM by PIB Mumbai

पुणे, 11 मार्च 2023 

 

आपल्या विकासाच्या आकांक्षाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने कोणत्या कायदेशीर सुधारणांची आपल्याला गरज आहे?

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने पुण्यामध्ये सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात(एसआययू) आयोजित झालेल्या वाय20 सल्लामसलत बैठकीत सहभागी झालेल्या तज्ञ  वक्त्यांनी या प्रमुख संकल्पनेवर व्यापक विचारमंथन केले.

या बैठकीच्या प्रामुख्याने ‘शांतता आणि सलोखा प्रस्थापित करणे- वसुधैव कुटुंबकमचे तत्वज्ञान- युद्धविरहित युगामध्ये प्रवेश’  आणि ‘ कामाचे भविष्य- उद्योग 4.0, नवोन्मेष आणि 21व्या शतकातील कौशल्ये’ या दोन संकल्पना आहेत.

मेघालयच्या रिभोई जिल्ह्यातील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे मुख्य न्याय दंडाधिकारी आणि सचिव अल्बर्ट लॅनॉन्ग यांनी या बैठकीत आपले विचार व्यक्त केले. महिला लोकप्रतिनिधींनी दिलेली माहिती आणि विचार यांचा संसदेत मोठा प्रभाव असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. संक्रमणात्मक न्यायाविषयी बोलताना ते म्हणाले की पूर्वी लोकांना इतिहासाशी संबंध तोडायची आणि भविष्यात जगण्याची इच्छा होती. मात्र, आता कायद्याचे राज्य आहे ज्यामुळे सर्वोत्तम न्याय आणि समानता प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. बऱ्याचदा गुन्ह्यांमध्ये सहभागी बालके स्वतःहून ते गुन्हे करत नसतात तर त्यांना तसे करण्यासाठी प्रौढांनी प्रवृत्त केलेले असते असे ते म्हणाले. आपण जेव्हा एक करार करतो, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट कालमर्यादा निश्चित केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कायदे करणे पुरेसे नाही आणि न्यायव्यवस्था आणि कार्यकारी यामध्ये संतुलन राखणे देखील महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. कायदेनिर्मितीमध्ये हितधारकांशी अधिक जास्त प्रमाणात सल्लामसलत करण्याचे आणि त्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बंधने विचारात घेण्याचे त्यांनी आवाहन केले. 

   

महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी विविध प्रकारच्या पोलिस सुधारणा आणि कार्मिक अद्ययावतीकरण, प्रशिक्षण आणि पोलिस पायाभूत सुविधा आदी मुद्यांवर विवेचन केले. दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी मानसिक स्थितीच्या काळजीचे महत्त्व त्यांनी सविस्तर विशद केले आणि संकटकाळात आपत्तीचे स्वरुप आणि प्रसारमाध्यम व्यवस्थापन यांची भूमिका अधोरेखित केली.

  

युवा वर्गाने आपल्या कल्पना आणि बुद्धीचातुर्य यांचा वापर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत सहभागी झालेल्या तज्ञ  वक्त्यांनी व्यक्त केले.

* * *

PIB Mumbai | JPS/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906011) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu