युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

चौथी वाय20 सल्लागार बैठकः हवामान बदलासंदर्भातील सत्रादरम्यान हवामानविषयक मुद्दे युवा वर्गाने उपस्थित करण्याचे आवाहन


‘हवामानाच्या मुदयांबाबत जागरुकतेच्या अभावाची हाताळणी करण्यासाठी ग्राहकांना शिक्षित करणे हे पहिले पाऊल’

‘हवामान बदलाच्या मुद्यांची हाताळणी सार्वत्रिक पद्धतीने न झाल्यास वैयक्तिक प्रयत्न निष्फळ ठरतील’

Posted On: 11 MAR 2023 5:40PM by PIB Mumbai

पुणे, 11 मार्च 2023 

 

पुण्यामध्ये लवले येथे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात(एसआययू) आज युवा20(वाय20) सल्लागार बैठकीमध्ये ‘हवामान विषयक कृती’ या सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या पॅनेलिस्टनी युवा वर्गाने हवामानविषयक मुद्दे लावून धरावेत आणि धाडसी बनावे असे  आवाहन केले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत युवा वर्गाला भागधारक म्हणून समाविष्ट करण्यावर आणि समग्र विकासासाठी लहान, स्थानिक आणि विकेंद्रित उपाययोजनांना पाठबळ देण्यावर या सत्रात बोलणाऱ्या पॅनेलिस्टनी भर दिला. आपल्या संपर्कातील इतर मानवांसोबत आणि पर्यावरणासोबत सौहार्दाने राहण्याचे आवाहन देखील या वक्त्यांनी युवा वर्गाला केले.

या सत्रातील उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना हवामान बदलविषयक तज्ञ आणि चक्राकार  लाईफस्टाईल सोल्युशन्स प्रा. लि. चे संस्थापक प्रियदर्शन सहस्रबुद्धे म्हणाले की आपल्यापैकी प्रत्येकजण हा भागधारक असून पृथ्वी या ग्रहाचा ऋणी आहे. जगाला भेडसावत असलेल्या समस्येमध्येच त्याचे उत्तर आहे आणि तिथूनच नवोन्मेषाच्या दिशेने उद्योजकांचा प्रवास सुरू होतो. सर्वप्रथम आपल्याला लोकांमध्ये काही तरी करण्याची भावना निर्माण केली पाहिजे आणि शाश्वत आणि पर्यावरण स्नेही उपाय साध्य केले पाहिजेत. त्यानंतर मुख्य अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करताना धोरणकर्त्यांनी पर्यावरण स्नेही आणि टाकाऊ पदार्थ व्यवस्थापनाच्या धोरणांचा प्रसार करण्यासाठी योग्य प्रसारमाध्यम स्रोतांचा वापर सुनिश्चित केला पाहिजे.

सामाजिक पातळीवर याबाबत जागरुकता नसल्याच्या मुद्याची हाताळणी कशी करायची याबाबत विचारले असता सहस्रबुद्धे म्हणाले, “ विचार प्रक्रियेत बदल घडवण्याच्या दिशेने ग्राहकांना शिक्षित करणे हे पहिले पाऊल आहे आणि यासाठी संपर्काचे योग्य माध्यम निवडणे हे त्यापुढील पाऊल आहे.”

हॅनोव्हर सिटी कौन्सिलचे निर्वाचित सदस्य आणि जर्मनीचे हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण प्रवक्ते डॉ. बाला रामाणी यांनी या चर्चेची सुरुवात जगातील लोकांमध्ये असलेले परस्परसंबंध आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यातील कृतीचा परिणाम आपल्यापासून हजारो मैलावर असलेल्या लोकांच्या जीवनावर कशा प्रकारे होतो ते अधोरेखित करून केली.

पुनर्चक्रीकरणयोग्य ऊर्जेचा वापर करण्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन साध्य करण्यासाठी जर्मनी कशा प्रकारे सजग झाला आहे याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. विविध प्रकारच्या उपाययोजनांमध्ये ई-मोबिलिटी वाहनांचा वापर करण्यासाठी वीजनिर्मिती करण्याच्या उद्देशाने नूतनक्षम पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा समावेश आहे.

जर्मनीच्या कार्बन उत्सर्जन कार्यक्रमाबद्दल विचारले असता डॉ. बाला रामाणी म्हणाले की जर्मनीने नूतनक्षम ऊर्जानिर्मितीवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे, मग ती पवन ऊर्जा असो किंवा जलविद्युत असो. कार्बन उत्सर्जनाच्या समस्येला हाताळण्यासाठी अतिशय कठीण वाटणाऱ्या हायड्रोजन प्रकल्पाबाबत देखील सिटी कौन्सिल महत्त्वाकांक्षी आहे, असे ते म्हणाले.

वन नेशन वन ग्रीड धोरणाबाबत उत्तर देताना ते म्हणाले की ही संकल्पना जगभरातील देशांना लागू होते. जोपर्यंत हवामान बदलाच्या समस्येची हाताळणी सार्वत्रिक पद्धतीने होत नाही तोपर्यंत आपल्याला वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांना न्याय देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हिमनदी आणि जल संवर्धनतज्ञ आणि लडाखमधील नवीकरण ट्रस्टचे सहसंस्थापक लोबजांग वँगटाक यांनी युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्रालयाने अतिशय महत्त्वाच्या आणि तातडीने लक्ष देण्याची गरज असलेल्या हवामान बदलाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अशा प्रकारचा सर्वसमावेशक मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मानवाचे निसर्गासोबत सौहार्दाने राहण्याचे महत्त्व आणि लडाखच्या जनतेची त्यांच्या भूमीविषयी असलेली भावना यावर त्यांनी भर दिला. 

पुण्यामधील गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक आणि प्रोफेसर डॉ. गुरुदास नुलकर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

सर्व जी20 सदस्य देशांच्या युवा वर्गाला एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी उपयुक्त असलेला वाय20 हा अधिकृत सल्लागार मंच आहे. ‘शांतता प्रस्थापित करणे आणि सलोखा निर्माण करणे- वसुधैव कुटुंबकमचे तत्वज्ञान- युद्धविरहित युगामध्ये प्रवेश’ ही चौथ्या वाय20 सल्लागार बैठकीची संकल्पना आहे.

या परिसंवादाच्या सहा उपसंकल्पना आहेत

1) भारतामधील विकासाचे राजकारण संघर्षाचे निराकरण करण्यामध्ये कारक 
2) 
हवामानविषयक कृती, 
3) लिंगसंबंधित वाद 
आणि सुधारणा
4)शिक्षण
5)सामाजिक 
बदलासाठी गरजेच्या असलेल्या कायदेशीर सुधारणा 
6) कामाचे भविष्य.

या सल्लामसलत बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये युवा प्रतिनिधी, विविध स्पर्धांचे विजेते, निमंत्रित आणि भारत आणि जी20 देशातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1905934) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Hindi