कृषी मंत्रालय

अमृत​​काळातील आव्हानांवर मात करणे हे आमचे ध्येय - तोमर


2047 पर्यंत नव भारत घडवण्यात कृषी शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची – केंद्रीय कृषिमंत्री

Posted On: 10 MAR 2023 7:34PM by PIB Mumbai

 

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही जगातील सर्वात मोठी आणि व्यापक संशोधन संस्था असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. परिषदेने आतापर्यंत केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंतचा हा प्रवास समाधानकारक आहे, पण अमृतकाळातील आव्हानांवर मात करून 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्राच्या समूहात आणण्याचे ध्येय असल्याचे तोमर म्हणाले.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) सोसायटीच्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला  ते संबोधित करत होते. कृषी क्षेत्रातील भारताचे वर्चस्व जगभरात वाढत आहे, त्यासोबतच आपल्याकडून असलेल्या देखील अपेक्षाही वाढत आहेत, असे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत नव  भारत घडवण्याचे  लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. नवीन भारताला नवीन विज्ञान, नवीन संशोधन, नवीन कौशल्ये आणि नवकल्पनांची आवश्यकता  आहे कारण उद्याचा दिवस नवीन भारताचा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार नवीन तत्त्वांच्या आधारे काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयासहा आपला मूलमंत्र आहे, कोणालाही मागे न ठेवता ध्येयाकडे वाटचाल करत राहा अशी सूचना त्यांनी केली.

नव्या भारतात आपल्याला नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवायचे आहे, त्यांच्या घरोघरी आणि खेड्यात समृद्धी आणायची आहे आणि कृषी क्षेत्र समृद्ध करायचे आहे, हे सर्व आपण सर्वांनी एकत्रितपणे  पूर्ण करायचे आहे  असे ते म्हणाले.

आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 4 लाख कोटी रुपयांची कृषी निर्यात झाली असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात आपली नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीची उत्पादने जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आपल्या भाषणात, भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे लम्पी-प्रोव्हॅक ही लस विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. या लसीमुळे देशातील मोठ्या पशुसंख्येला लंपी या त्वचेच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असेही ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905785) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi