कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
दारिद्र्य व उपासमार विरहीत, चांगले आरोग्य आणि कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि स्वच्छता यांसारखी अनेक शाश्वत विकास उद्दिष्टे अधोरेखित केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी भारताच्या जी -20 अध्यक्षतेचे केले कौतुक
आर्थिक दरी बुजवण्यासाठी भारत उठवत असलेल्या जोरदार आवाजामुळे भारताची जी -20 अध्यक्षता ही खरी तर एसडीजी -20 अध्यक्षता झाली आहे, संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शॉम्बी शार्प यांचे प्रतिपादन
Posted On:
10 MAR 2023 6:11PM by PIB Mumbai
दारिद्र्य व उपासमार नसणे, चांगले आरोग्य आणि कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि स्वच्छता यांसारखी अनेक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) अधोरेखित केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी भारताच्या जी -20 अध्यक्षतेचे कौतुक केले आहे.

बांगलादेश आणि अरुणाचल प्रदेशच्या नागरी सेवकांच्या 57 व्या क्षमताबांधणी कार्यक्रमाच्या संयुक्त समापन सत्राला संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक शॉम्बी शार्प यांनी आज संबोधित केले. आर्थिक दरी बुजवण्यासाठी भारत उठवत असलेल्या जोरदार आवाजामुळे भारताची जी -20 अध्यक्षता ही खरी तर एसडीजी -20 अध्यक्षता झाली आहे,असे ते म्हणाले.
विकसनशील देशांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ग्लोबल साउथ देशांचा आवाज होण्यासाठी प्रदीर्घ कालावधीनंतर इंडोनेशिया, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या चार उदयोन्मुख अर्थव्यवस्था जी -20 अध्यक्षता सलग भूषवणार आहेत, असे शॉम्बी शार्प यांनी निदर्शनाला आणून दिले. भारताच्या जी -20 अध्यक्षतेपाठोपाठ दोन आठवड्यांनंतर या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये एसडीजी शिखर परिषद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डीडीजी -17 उद्दिष्टांच्या मध्यावधी आढाव्यासाठी हा संयोग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ते म्हणाले.

2070 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत कटिबद्ध असून संयुक्त राष्ट्रांचे भारताच्या हरित संक्रमणाला पाठबळ असल्याचे शॉम्बी शार्प यांनी सांगितले. डिजिटल परिवर्तन, कमी कार्बन उत्सर्जन करणारे आर्थिक प्रारूप आणि लिंग समानता व महिला सक्षमीकरणासह महिलाप्रणीत शासन, या भारताच्या उच्च विकास प्रारूपाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असे ते म्हणाले.

जगाला इंधन, अन्न आणि खत यासारख्या परस्पर संबधी संकटांचा सामना करावा लागत आहे आणि सर्वात गरीब देशांतील विशेषतः दक्षिण आशियातील, गरीब समुदायांना अशा संकटाचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत असल्याचे शॉम्बी शार्प यांनी अधोरेखित केले.
बांगलादेश आणि अरुणाचल प्रदेशच्या नागरी सेवकांना संबोधित करताना सांगितले की सामान्य आणि गरीब माणसाला खात्रीशीर आणि कार्यक्षम सेवांचे वितरण हे कोणत्याही सेवेचे मर्म आणि मूल्य असते.

राष्ट्रीय सुशासन केंद्राचे (एनसीजीजी) महासंचालक भरत लाल यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. कोणत्याही नागरी सेवेचे अंतिम ध्येय सामान्य माणसाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे, हे असायला हवे, असे त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905777)