वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय उत्पादने जगातील सर्वोत्तम गुणवत्तेची ठरण्‍याची वेळ : केंद्रीय वाणिज्य, उद्योग तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे मुंबईतील एसआरटीईपीसी वार्षिक निर्यात पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

Posted On: 09 MAR 2023 7:43PM by PIB Mumbai

मुंबई, 9 मार्च 2023 

 

केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत ‘द सिंथेटिक अँड रेयॉन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ (SRTEPC) तर्फे आयोजित निर्यात पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

आपल्याला प्रत्येक मुक्त व्यापार कराराचा अभ्यास करून इतर देशांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घ्याव्या लागतील. असे वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. "निर्यात प्रोत्साहन परिषदांनी इतर देशांमध्ये दुबईसारख्या ठिकाणी कार्यालये उघडली पाहिजेत. आपल्याला चाकोरी बाहेरचा विचार करावा लागेल.” असेही ते म्हणाले. 

गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. “आपली गुणवत्ता जगात सर्वोत्तम होण्याची वेळ आली आहे. भारतातील आणि जगभरातील ग्राहकांची ही मागणी आहे. देशांतर्गत गुणवत्ता आणि निर्यात गुणवत्ता - अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तेची उत्पादने तयार करण्याची वेळ आता संपली आहे, असेही ते म्हणाले. 2,000 उत्पादने लवकरच गुणवत्ता नियंत्रणाखाली येतील. कमी दर्जाची उत्पादने वापरणे आपण थांबवायला हवे. आपल्याला उत्पादनाचे प्रमाण वाढवायचे आहे आणि गुणवत्तेवर देखील लक्ष केंद्रित करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

कोणत्या उत्पादनांवर गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करणे आवश्यक आहे,  याबाबत उद्योगांनी सरकारला मार्गदर्शन करावे असा सल्ला मंत्र्यांनी दिला. “उद्योगांनी सल्लामसलतीमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास आपल्याला उत्पादनांची योग्य गुणवत्ता मिळेल आणि सोबतच खर्चात होणारी अतार्किक वाढ टाळता येईल. आपल्याला गुणवत्ता मानके विकसित करावी लागतील, असे गोयल म्हणाले. काही कारणाने देशांतर्गत उद्योगांना हानी पोहोचत असल्यास आम्हाला कळवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.

मंत्री महोदयांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पुरस्कार विजेते खरे तर देशाची सेवा करत आहेत आणि हा पुरस्कार त्यांच्या परिश्रमाला दिलेली एक पोचपावती, छोटीशी ओळख आहे, अशा शब्दांत त्यांनी विजेत्यांचा गौरव केला. 

उद्योगांनी संयुक्त संशोधन प्रकल्पांसाठी प्रस्ताव आणावेत तसेच नवनवीन शोध लावावेत आणि नवीन बाजारपेठा काबीज कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. "राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग मोहिमेचा लाभ घेत उद्योगाला जलद गतीने पुढे नेण्याची विनंती मंत्र्यांनी केली." उद्योगातील कौशल्याची पातळी सुधारण्यासाठी उद्योगांनी समर्थ (वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता वाढवण्याची योजना) योजनेचा लाभ घ्यावा अशी सूचना त्यांनी केली. 

जग भारताबद्दल दाखवत असलेला विश्वास आणि भारताला देत असलेले महत्त्व, आपण जागतिक अर्थव्यवस्थेत एक उज्ज्वल स्थान आहोत हे दर्शवते, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले. “जागतिक अर्थव्यवस्थेची भविष्यातील वाढ भारताशिवाय अशक्य आहे. आज आपल्याला मिळालेली संधी अत्यंत दुर्मिळ आहे.  आपल्याला यश प्रदान करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, आता आपण  या  संधी हस्तगत करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. एसआरटीईपीसी या मोहिमेत नक्कीच यशस्वी होतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कदाचित पहिल्यांदाच पंतप्रधानांनी स्वत: निर्यात प्रोत्साहन परिषदेची भेट घेतली आणि निर्यात लक्ष्यांसह पुढील मार्गावर चर्चा केल्याचे निरिक्षण मंत्र्यांनी नोंदवले. "गेल्या वर्षीच्या विक्रमी निर्यातीनंतर, या वर्षी, आत्तापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे, आपण 750 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा आकडा पार करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक पातळीवर संकटे असूनही आपण हे लक्ष्य गाठत आहोत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. 

क्रिकेटसारख्या खेळाप्रमाणे आता, व्यवसाय आणि उद्योगाची स्थिती देखील केवळ विजय-विजय अशीच असल्याचे गोयल म्हणाले. “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापार करार हा एकता करार असून दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक उत्पादित वस्तू आयात करत असताना, आम्हाला अनेक प्रकारचा कच्चा माल ऑस्ट्रेलियाकडून मिळतो. लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात गुंतवणुकीची संधी आहे, कारण त्यांची बाजारपेठ वाढत आहे.” असे त्यांनी सांगितले. 

मंत्र्यांनी निरीक्षण केले की स्पॅनिश फ्लूच्या काळात, फ्लूची लागण होण्याऐवजी उपासमारीने जास्त मृत्यू होत होते. मात्र, कोविड-19 च्या जगातील सर्वात वाईट आरोग्य संकट काळातही, भारताने कोणालाही उपासमार सहन करावी लागणार नाही याची खात्री दिली होती. यासाठी सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाच्या शासकीय योजनेचे आभार, असे गोयल म्हणाले. “लोक आज गरीबीतून मध्यमवर्गाकडे वेगाने जात आहेत; आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे, उत्पादकता वाढत आहे, त्यांना चांगला भावही मिळत आहे. पावसाचे प्रमाण देखील बर्‍याच वर्षांपासून चांगले असल्याचे ते म्हणाले.  

जन धन – आधार – मोबाईल जेएएम त्रिसूत्रीने देशाला महामारीच्या काळात थेट लाभ हस्तांतरण कसे करण्यास सक्षम केले याचे स्मरण त्यांनी केले. “आता, एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत तुम्ही तुमचे धान्य देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मिळवू शकता. संपूर्ण यंत्रणा डिजिटल करण्यात आली आहे त्यामुळे चोरीची काळजी करण्याची गरज नाही, असे सांगत मंत्र्यांनी सर्वांना आश्वस्त केले. 

मंत्र्यांच्या हस्ते वेलस्पन समुहाचे अध्यक्ष बाळकृष्णन गोयंका यांना सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

व्यवसायाचे जागतिक स्थान असूनही एसआरटीईपीसीच्या सदस्यांनी चांगली कामगिरी केली आहे, असे एसआरटीईपीसीचे अध्यक्ष धीरज रायचंद शहा यावेळी म्हणाले . निर्यात वाढवण्यासाठी उद्योगाला अधिक परिश्रम करावे लागतील, संशोधन आणि विकासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि पुढील वर्षी उद्योगाने किमान 20% निर्यात वाढवावी लागेल, असे ते म्हणाले. सरकार उद्योगांना उत्तरदायी असून उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. “उद्योगाच्या हितासाठी आपण एकत्र आलो तर आपल्या सर्वांना फायदा होईल. गेल्या आठ वर्षांत सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यानूसार आता कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा सरकारकडून शिकण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. पीएलआय योजनेसारख्या योजनांद्वारे निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक ते करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसआरटीईपीसीच्या इतिहासात वाणिज्य आणि उद्योग मंत्री एसआरटीईपीसी निर्यात पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देत असल्याची ही पहिलीच वेळ आहे, असे एसआरटीईपीसीचे तत्कालिन माजी अध्यक्ष रोनक रुघानी म्हणाले. वर्षानुवर्षे परिषद आणि उद्योगांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.

 

या कार्यक्रमाला वस्त्रोद्योगातील विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

<आम्ही थोड्याच वेळात पुरस्कारांच्या संपूर्ण यादीसह हे प्रकाशन अद्यतनित करू.> 

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905427) Visitor Counter : 204


Read this release in: English , Urdu , Hindi