वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज मुंबईत अंधेरी इथे ईसीजीसीचे नवे कॉर्पोरेट कार्यालय- ईसीजीसी भवन चे उद्घाटन


आपण या वर्षात 750 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा निश्चित गाठू- पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास

ईसीजीएसने आपल्या विस्तारीत 90 टक्के पतजोखमीची निर्यात कर्जाची मर्यादा 20 कोटींवरुन 40 कोटींपर्यंत वाढवण्याची गोयल यांची सूचना

Posted On: 05 MAR 2023 6:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार मंत्री, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज मुंबईत अंधेरी इथे, निर्यात पतहमी महामंडळ- ईसीजीसी च्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. भारत सध्या आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. त्यामुळे ह्या वर्षात, आपण 750 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचा टप्पा गाठणे यथोचित ठरेल, असं मत यावेळी गोयल यांनी व्यक्त केलं. अत्यंत जबाबदारी आणि आत्मविश्वासाने मी अतिशय आनंदाने आपल्याला सांगतो आहे, की फेब्रुवारी 2023 पर्यंतच्याच आकडेवारीनुसार, आपण आताच, गेल्या वर्षीचे निर्यातीचे आकडे ओलांडले असून, यावर्षात आपण 750 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा ऐतिहासिक आकडा नक्कीच पार करु. असे गोयल म्हणाले.

ईसीजीसी ने काळानुरूप आधुनिक बनत आपल्या व्यवहारात अधिकाधिक डिजिटल साधने वापरावीत, ज्यामुळे या संस्थेची कार्यक्षमता वाढेल, निर्यातदारांमढे विश्वास निर्माण होईल आणि कामगिरी देखील सुधारेल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. आपल्याला आपल्या मुलांसाठी असा भारत निर्माण करायचा आहे जो पूर्णतः भ्रष्टाचार मुक्त असेल. त्यामुळे कोणत्याही अनियमित, बेकायदा व्यवहार करणाऱ्यांबाबत आपल्याला कठोर राहावे लागेल. भारताला जर महाशक्ती बनायचे असेल, तर आपल्याला असा निर्णय घ्यावा लागेल, की आपल्या नव्या भारतात उच्च दर्जाची प्रमाणिकता, निष्ठा असेल, आणि त्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र, ईसीजीसी सारखी मंडळे, एक्झिम बँक आणि इतर भागधारक या सगळ्यांनी मिळून पूर्ण प्रयत्न करायला हवेत. काय घडते आहे, याबद्दल ईसीजीसी ने जागरूक असायला हवं, आपल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता आणायला हवी, सहकार्याची भावना असावी, शक्य तेवढे ऑनलाईन असायला हवे. कोणावरही अविश्वास दाखवण्याचे कारण नसेल तर पारदर्शक कामकाजासह आपण सर्वांवर विश्वास ठेवण्याचे धोरण ठेवावे, त्यांच्याशी पूर्णपणे डिजिटल ऑनलाइन संवाद साधावा. मी ईसीजीसी ला तुमच्या सर्व प्रक्रियांवर पुनर्विचार करण्याची विनंती करेन. मी उद्योगांना विनंती करेन की भारताची प्रतिमा स्वच्छ करण्यात आम्हाला मदत करावी जेणेकरून जगाला हेवा वाटेल.

ईसीजीसी ने केलेल्या अभिनव प्रयोगांची गोयल यांनी प्रशंसा केली, ज्यानुसार, ईसीजीसी ने असे धोरण आणले आहे, जिथे 20 कोटी रुपये पतमर्यादा असलेल्या निर्यातदारांना आता त्यांच्या नुकसानाच्या 90%पर्यंतची भरपाई दिली जाते. पूर्वी हे प्रमाण 60 टक्के इतके होते.सर्व प्रलंबित दावे आता पारदर्शकपणे ऑनलाइन निकाली काढले जातात. आज आपण जागतिक दर्जाच्या इमारतीचे उद्घाटन करत असताना, मी  ईसीजीसीच्या महाव्यवस्थापकांना 20 कोटी रुपयांची निर्यात मर्यादा 40 कोटींपर्यंत वाढवण्याची सूचना करतो,जेणेकरून रत्न आणि दागिने तसेच इतर  वस्तू क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रेही  कोणत्याही संभाव्य जोखीम किंवा तोट्यासाठी या विस्तारित म्हणजे 90 टक्क्यांपर्यंतच्या जोखीम योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्या बदल्यात, उद्योगक्षेत्राने, आपले दावे करतांना संपूर्ण प्रामाणिकता आणि सचोटी दाखवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हळुहळू, आपल्या सर्वांनाच ईसीजीसी सोबत काम केल्याची फळे अनुभवता यावीत, अशी आमची इच्छा आहे. या लाभांचा आनंद घेण्यासाठी आम्हाला अधिक निर्यात हवी आहे. आज आम्ही एकूण निर्यातीपैकी सुमारे 22% ते 25% माल निर्यातीला संरक्षण देतो. ही व्याप्ती 50% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले पाहिजे, जेणेकरून जवळपास सर्वच एमएसएमई उद्योग देखील या योजनांचा आणि कमी व्याजदरांचा लाभ घेऊ शकतील.

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन कल्पना आणण्यासाठी आणि 2030 पर्यंत देशाची निर्यात 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत म्हणजेच वस्तू आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रात डॉलरची निर्यात एक ट्रिलियनपर्यंत नेण्याच्या भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा घटक बनण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो यासाठी ईसीजीसीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केलेतरच आपण विकसित भारताच्या उद्दिष्टांसाठी काम करु शकतो, ज्यामुळे भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल. आणि भारत जसजसा समृद्ध होईल, तसतसे जगही समृद्ध होईल. असे गोयल म्हणाले.

नवी दिल्लीत नव्याने उद्घाटन करण्यात आलेले वाणिज्य भवन ही दिल्लीतील सर्व मंत्रालये कशी दिसतील याची झलक दाखवणारी आहेत असे गोयल म्हणाले. जगभरातील ज्येष्ठ मंत्री आणि पंतप्रधानांसह पाहुणे जेव्हा वाणिज्य भवन बघतात, तेव्हा ते किती आधुनिक, डिजिटल आणि कार्यक्षम आणि असे असूनही वास्तुकलेच्या दृष्टीने भारताची संस्कृती प्रतिबिंबित करणारे आहे, हे पाहून ते आश्चर्यचकित होतात. आपल्या कार्यस्थळांमधून आपल्या कार्याचे प्रतिबिंब जाणवले पाहिजे, ही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे. असे गोयल म्हणाले.

आज, ईसीजीसी जगाला दाखवून देत आहे की ते उद्योगांच्या विस्ताराला सक्षम बनवण्यासाठी, व्यवसायविषयक कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी, व्यवसाय कल्पनांना सीमांच्या पलीकडे प्रोत्साहन देण्यासाठी आणि निरोगी व्यवसाय वातावरणाची स्थापना करण्यासाठी कार्य करतील, असे सांगत, ही सर्व उद्दिष्टे आज उद्घाटन झालेल्या ह्या नव्या कार्यालयात प्रतिबिंबित होत आहेत, असे गोयल म्हणाले.

हे कार्यालय नव्या भारताचेही प्रतिबिंब आहे, जो आज जागतिक विकासात मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे आणि आगामी अनेक दशकांपर्यंत सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील. नवभारतामध्ये कल्पनेपलिकडच्या क्षमता आहेत, जिथे प्रत्येक लहान मूल उत्तम दर्जाच्या जीवनाची आकांक्षा बाळगत आहे.

विकसित राष्ट्र बनण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले. आपल्याला आंतरराष्ट्रीय सहभागाकडे आणखी लक्ष द्यावे लागेल, कारण जगातील कुठलाही देश आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याशिवाय विकसित राष्ट्र बनलेला नाही. आपल्याला अशी अर्थव्यवस्था आणि परिसंस्थेची संस्कृती तयार करायची आहे, जी पूर्ण आत्मविश्वासाने आणि ताकदीने जगातील सर्वोत्तम लोकांसोबत काम करू शकेल."

आपल्या युवा पिढीसाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा भारत मागे सोडायचा आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. गेल्या काही वर्षांत, सरकारने स्वतःचे आधुनिकीकरण करण्याचा, त्याला अधिक समकालीन बनवण्याचा विचार केला नाही. वसाहती व्यवस्थेचे प्रतिबिंब असलेल्या कार्यालयांमध्ये फायलींचा खच पडून होतापंतप्रधानांनी India@100 साठी आपल्याला व्यापक दृष्टी दिली; आपल्याला कशा प्रकारचा देश विकसित करायचा आहे, आपल्या मुलांसाठी आपण मागे काय सोडणार आहोत याचा आपल्याला नव्याने विचार करावा लागेल? आपल्याला वारशाने जे मिळाले ते त्यांना वारशाने मिळणार आहे की आपण आपल्या युवकांना आधुनिक समकालीन भारत देणार आहोत, जो त्यांना आत्मविश्वास आणि अभिमान देऊ शकेल, ज्यासाठी ते खरोखरच पात्र आहेत?

पंतप्रधानांनी केलेली पंचप्रणची घोषणा आपल्याला एक समृद्ध राष्ट्र बनण्यास सक्षम करेल असे गोयल म्हणाले. पंतप्रधान जेव्हा पंचप्रण बद्दल बोलले, तेव्हा त्यांनी 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनण्याचा तसेच आपण वसाहतवादी भूतकाळापासून मुक्त होण्याच्या आणि आपल्या मुळांकडे परत जाण्यासह अन्य चार वचनबद्धतेचा उल्लेख केला होता. आपली संस्कृती, कौटुंबिक मूल्ये आणि परंपरेतून निर्माण होणारा आदर आपल्याला सुस्थितीत ठेवेलभारताची एकता आणि अखंडता आणि संपूर्ण जग हे एक कुटुंब या तत्त्वज्ञानाचाही त्यांनी उल्लेख केलाजर आपण भारताला एक विकसित राष्ट्र बनवायची इच्छा बाळगली आणि कर्तव्याच्या भावनेने आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करत राहिलो तर भारताला समृद्ध राष्ट्र होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.

ईसीजीसीचे नवीन कॉर्पोरेट कार्यालय ही आपल्याकडील सर्वात हरित इमारत ठरेल अशी आशा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव विपुल बन्सल यांनी व्यक्त केली.   गेल्या दोन वर्षांत ईसीजीसीने खूप चांगली कामगिरी केल्याचा मला अभिमान आहे. प्रीमियममधील वाढ आपल्या एकूण निर्यात कर्जापेक्षा अधिक आहे, त्यामुळे आपला बाजार हिस्सा सुधारत आहे आणि आपल्या निर्यातीवरील विमा संरक्षण देखील सुधारत आहे.  ईसीजीसीकडे आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज फेडण्याची क्षमता आहे असे सांगत सहसचिवांनी आशा व्यक्त केली की देशातील सर्वात लहान निर्यातदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी विस्तार करेल.

SMILE नावाच्या अत्याधुनिक आयटी प्रणालीकडे वळण्याचा ईसीजीसी विचार करत आहे असे सहसचिव म्हणाले. "गिफ्ट सिटी शाखा कार्यान्वित करावी लागेलपुढील काही महिन्यांत दावा निपटाऱ्याचे प्रमाण (क्लेम डिस्पोजल रेशो) सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठेल अशी आम्हाला आशा आहे.

भारतीय निर्यात संघटना महासंघाचे अध्यक्ष डॉ. . शक्तीवेल म्हणाले की, वाणिज्य मंत्र्यांच्या सक्रिय सहभागाने भारत गेल्या वर्षी 420 अब्ज डॉलर्सचा निर्यातीचा टप्पा ओलांडू शकला. मला पूर्ण विश्वास आहे की चालू आर्थिक वर्षात आपण 800 अब्ज डॉलर्सचा निर्यातीचा टप्पा पार करू. प्रथमच परदेशातील आपले दूतावास आपल्या निर्यातीला चालना देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत.

पाहुण्यांचे स्वागत करताना, ईसीजीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एम. सेंथिलनाथन म्हणाले की पत जोखीम विमा सेवा पुरवणाऱ्या कंपनीने देशातील प्रमुख निर्यात-केंद्रित ठिकाणी 46 शाखा कार्यालये आणि 4 प्रादेशिक कार्यालयांचे जाळे उभारले आहे.

ईसीजीसी विद्यमान बाजारपेठांचे संरक्षण आणि नवीन बाजारपेठ शोधण्यात निर्यातदारांना मदत करत आहे असे ते म्हणालेनिर्यातदारांना आपली निर्यात क्षमता वापरण्यास मदत करण्यात आपली भूमिका प्रभावीपणे बजावण्यात ईसीजीसी कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिले.

हा कार्यक्रम पुढील लिंकवर पाहता येईल:: https://www.youtube.com/live/Kx_gUeCzPQs?feature=share

ईसीजीसी ही (पूर्वीची एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची कंपनी असून निर्यातीसाठी पत जोखीम विमा आणि संबंधित सेवा प्रदान करून निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने 1957 मध्ये स्थापन करण्यात आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ही कंपनी काम करते आणि सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग आणि विमा आणि निर्यातदार समुदायाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या संचालक मंडळाद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जातेकंपनीने नेहमीच भारतीय निर्यातदार आणि निर्यात कर्ज पुरवणाऱ्या व्यापारी बँकांच्या गरजेनुसार विविध निर्यात पत जोखीम विमा उत्पादनांची रचना केली आहे.

ईसीजीसी ही प्रामुख्याने एक निर्यात प्रोत्साहन संघटना आहे, जी भारतीय निर्यातदारांना पत विमा संरक्षण प्रदान करून त्यांची स्पर्धात्मकता सुधारण्याचा प्रयत्न करते.

***

N.Chitale/R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904435) Visitor Counter : 260


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil