आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केरळमधील कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी विभागाच्या उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया उपस्थित

Posted On: 04 MAR 2023 11:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्रावर आधारित केरळच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत उभारण्यात आलेला सुपर स्पेशालिटी विभाग हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील सहकार संघराज्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया म्हणाले. ते आज कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन सर्जिकल सुपर स्पेशालिटी विभागाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन उपस्थित होते.

Image

Image

प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करताना, डॉ. मांडविया यांनी अधोरेखित केले की देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधांबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गतिशील सहकार्य महत्त्वपूर्ण आहे कारण आरोग्य सेवा सुरक्षेचे ते महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. त्यातूनच देशातील सार्वत्रिक आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याचा पाया तयार होतो. नवीन सर्जिकल सुपर स्पेशालिटी ब्लॉकबद्दल बोलतांना, डॉ. मांडविया म्हणाले की, या सुविधेमुळे केवळ कोझिकोडच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यांच्याही तृतीय श्रेणीच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण होतील.

2.57 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेली सुपरस्पेशालिटी सुविधा असलेली इमारत महाविद्यालयाच्या संकुलात 273 एकर परिसरात उभारण्यात आली आहे, ज्याचा प्रकल्प खर्च 195.93 कोटी रुपये असून यात केंद्र सरकारचा वाटा 120 कोटी आणि राज्य सरकारचा वाटा 75.93 कोटी रुपये आहे. या सात मजली रुग्णालयात 500 खाटा आहेत तसेच 190 आयसीयू बेड्ससह एकोणीस मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आणि सी-आर्म, MRI, CT स्कॅन, CSSD आणि मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट सुविधा यांसारख्या उपकरणांचा समावेश आहे. यामुळे पाच सर्जिकल सुपरस्पेशालिटी विभाग, आपत्कालीन औषध आणि ऍनेस्थेसियोलॉजी यासह इतर सुविधा उपलब्ध होतील.

प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेमागे देशात कमी आरोग्य सेवा उपलब्ध असलेल्या भागात वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि अन्य आरोग्य सेवा क्षमता निर्माण करणे ही कल्पना आहे. परवडणाऱ्या/विश्वसनीय तृतीय श्रेणीच्या आरोग्य सेवांच्या उपलब्धतेतील प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी सुविधा वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. या योजनेत दोन व्यापक घटक आहेत:

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची स्थापना
  • विद्यमान शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/संस्थांचे उन्नतीकरण

आतापर्यंत 22 नवीन एम्सची स्थापना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/संस्थांच्या उन्नतीकरणच्या 75 प्रकल्पांना या योजनेअंतर्गत विविध टप्प्यांत मंजुरी देण्यात आली आहे. प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/संस्थांच्या उन्नतीकरणात सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि/किंवा ट्रॉमा सेंटर/किंवा इतर सुविधा आणि/किंवा वैद्यकीय उपकरणांची खरेदी यांचा समावेश होतो. केरळमध्ये आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/संस्थांच्या उन्नतीकरणाचे चार प्रकल्प या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. हे प्रकल्प पुढीलप्रमाणे -त्रिवेंद्रम वैद्यकीय महाविद्यालय (टप्पा -I); टीडी वैद्यकीय महाविद्यालय, अलप्पुझा (टप्पा -III); कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय, कोझिकोड (टप्पा -III) आणि SCTIMST, त्रिवेंद्रम [टप्पा -V(A)].असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी नमूद केले.

गेल्या नऊ वर्षांत आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या व्यापक सकारात्मक बदलांवर भर देत डॉ. मांडविया म्हणाले की, जनतेसाठी सर्वांगीण आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने विविध उपक्रम सुरू केले आहेत. यापैकीच एक दुय्यम आणि तृतीय श्रेणीच्या आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणारी आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार केरळ राज्य सरकारबरोबर एकत्र काम करत आहे.  देशाच्या तंत्रज्ञान विषयक सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी आणि आरोग्य सेवा आणि नोंदी यांची राष्ट्रीय पोर्टेबिलिटी सक्षम करून न्याय्य आणि सुगम्य आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केले असे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904343) Visitor Counter : 139


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam