वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

गेल्या वर्षीचा निर्यातीचा आकडा फेब्रुवारीमध्येच पार; या वर्षी व्यापार आणि सेवा निर्यात  750 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल असा विश्वास : पीयूष गोयल


देशात गुणवत्तापूर्णतेबाबत जागरुकतेवर सरकारचा भर; पुढील दोन वर्षांत गुणवत्ता नियंत्रण आदेशांची (क्यूसीओ) संख्या 2000 पर्यंत पोहोचेल : पीयूष गोयल

गुंतवणूकदार -अनुकूल व्यवसाय प्रणालीमुळे सेमी-कंडक्टर साखळीत भारतात गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या इच्छुक : पीयूष गोयल

भविष्यात भारताला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी शाश्वतता आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा : पीयूष गोयल

Posted On: 04 MAR 2023 7:51PM by PIB Mumbai

 

गेल्या वर्षीच्या निर्यातीचा आकडा देशाने फेब्रुवारीमध्येच ओलांडला असून या वर्षी व्यापारी आणि सेवा निर्यात 750 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत रायसीना संवादाच्या 8 व्या आवृत्तीला संबोधित करत होते.

गेल्या वर्षात भारताने सर्वाधिक निर्यातीचा आकडा गाठण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल म्हणाले की, हा सखोल विश्लेषण आणि व्यापक नियोजनाचे परिणाम आहे. भारताच्या क्षमतांचे कसून मूल्यांकन केले गेले, नवीन बाजारपेठ शोधण्यात आली, विशेषत्वाने दुर्गम जिल्ह्यांना निर्यात केंद्र बनण्याचे अधिकार देण्यात आले, यासारख्या उपायांसह परदेशातील सर्व भारतीय मोहीमांचा व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रभावीपणे फायदा झाला, असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांनी नमूद केले की, गेल्या वर्षी देशाने व्यापारी आणि सेवा व्यापार निर्यातीत 650 अब्ज अमेरिकी डॉलरचा आकडा ओलांडला होता.

स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण भारतातील सुमारे 35 दशलक्ष घरांचे विद्युतीकरण, एक मजबूत पॉवर ग्रीड तयार करणे, सर्वांसाठी घरे, 500 दशलक्षाहून अधिक लोकांना मोफत आरोग्यसेवा यासारखे परिवर्तनात्मक उपक्रम सरकारने गेल्या दशकभरात हाती घेतल्याचे गोयल यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत भारताला उच्च स्थानी पोहोचवण्यात या योजनांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे असे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाचे कौतुक केले. साथीच्या संपूर्ण काळात पंतप्रधान मोदींनी केवळ साथीच्या रोगावर मात करण्यासाठीच नव्हे, तर आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सतत कल्पना शोधल्याचे त्यांनी सांगितले.

या अशांत काळात भारताला आपली लवचिकता दाखवण्याची संधी मिळाली असे गोयल यांनी संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अन्न सुरक्षा हे जगासमोर एक गंभीर आव्हान बनले आहे असे गोयल यांनी स्पष्ट केले. खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करून भारताची अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी योजना तयार करण्याची दूरदृष्टी पंतप्रधान मोदींकडे होती, असेही ते म्हणाले.

वाढलेल्या किमतीचा बोजा शेतकऱ्यांना, विशेषत: लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बसणार नाही याची पंतप्रधान मोदींनी काळजी घेतली होती, असे गोयल यांनी खतांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या त्या काळाबद्दल बोलताना सांगितले. 'भारत अन्न सुरक्षेबाबत स्वयंपूर्ण असून शेजारी आणि इतर मित्र राष्ट्रांना मदत करता यावी यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात उत्पादन सुरू ठेवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

भारतामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार सक्षम वातावरण निर्माण करत आहे यावर मंत्र्यांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की भारत हे उत्कृष्ट व्यवस्थापकीय कौशल्यांसह इतर कौशल्ये असलेल्या 1.4 अब्ज तरुण आणि महत्वाकांक्षी लोकांचे राष्ट्र आहे, असे गोयल म्हणाले. सरकारने लोकांच्या जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात तसेच त्यांना जीवनाच्या मूलभूत सुविधा प्राप्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षातून मुक्त करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे लोक आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींची आकांक्षा बाळगण्यास सक्षम झाले आहेत, असे निरिक्षण गोयल यांनी नोंदवले.

या वर्धित आकांक्षा पातळीने गुंतवणूकदारांना भारतात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तसेच भारताच्या विकास गाथेत लोकांना अधिक परिश्रम करण्याची आणि अधिक योगदान देण्याची इच्छा असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मक धार वाढल्याचे मंत्र्यांनी सांगितले. सरकारने व्यवसाय सुलभीकरण, अनुपालनाचे ओझे कमी करणेगंभीर क्षेत्रांमध्ये प्रॉडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना लागू करणे, स्टार्टअपला प्रोत्साहन देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे ते म्हणाले. जगाला भारतासारखा चांगला मित्र आणि विश्वासू जोडीदार इतरत्र मिळणार नाही,' असे त्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत एका प्रश्नाला उत्तर दिले. भारतातील स्थिरता आणि गुंतवणूकदार-अनुकूल व्यवसाय प्रणालीमुळे सेमी-कंडक्टर साखळीत भारतात गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्या आधीच चर्चा करत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. भारतात उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असल्याने, भारत आयातीवरील अवलंबित्व झपाट्याने कमी करून स्पर्धात्मक किमतीत उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यात यशस्वी होत आहे, असे गोयल यांनी भारताची व्यापार तूट आणि आयात अवलंबित्वामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले.

गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीओ) सारख्या विविध उपक्रमांद्वारे गुणवत्ता जागरूकता आणण्यावर सरकार मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मंत्र्यांनी असेही नमूद केले की क्यूसीओची संख्या चार पटींनी वाढली असून आता सुमारे 440 उत्पादनापर्यंत पोचली आहे. येत्या दोन वर्षांत ही संख्या 2000 पर्यंत वाढून शून्य दोष, शून्य परिणामसाध्य करण्याच्या भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्र्यांनी भारताच्या शाश्वततेवर भर देण्याच्या धोरणाचा उल्लेख केला. अनादी काळापासून, निसर्गाचा आदर करणे हे भारताच्या सभ्यतेत खोलवर रुजलेले आहे असे ते म्हणाले. शाश्वतता आणि गुणवत्ता हे दोन घटक भारताला भविष्यात उच्च स्थानी स्थापित करतील’, असेही ते म्हणाले.

भारत लवकरच  5 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठेल आणि 2027-28 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 पर्यंत, भारत 32 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची एक विकसित आणि एक समृद्ध अर्थव्यवस्था असेल जिथे तळागाळातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन मिळेल, असेही ते म्हणाले. सर्व जण एक राष्ट्र या भावनेने एकत्र आले तर 2047 पर्यंत USD 40 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न भारत देखील पाहू शकतो, असे गोयल म्हणाले.  

***

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904272) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada