विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारत आणि मेक्सिको यांच्यात संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार- एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, पृथ्वी आणि महासागर विज्ञान आणि जल, खाणकाम, खनिजे, स्वच्छ ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य अशा प्रमुख क्षेत्रातील तंत्रज्ञानावर भर
Posted On:
04 MAR 2023 9:38PM by PIB Mumbai
भारत आणि मेक्सिको यांच्यात संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन आणि धोरणात्मक क्षेत्रं, सिव्हील, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंजिनिअरिंग, परिसंस्था, पर्यावरण, पृथ्वी आणि महासागर विज्ञान आणि जल, खाणकाम, खनिजे, धातू आणि सामग्री, रसायने (चामड्यासह) आणि पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा(पारंपरिक आणि अपारंपरिक) आणि ऊर्जा उपकरणे, कृषी, पोषण आणि जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य अशा प्रमुख क्षेत्रातील तंत्रज्ञानावर यामध्ये भर देण्यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एब्रार्ड यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत लोधी रोड येथे इंडिया सायन्स सेंटर येथे हा बहुस्तरीय ऐतिहासिक करार करण्यात आला.
एब्रार्ड आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की खाजगी यशस्वी स्टार्ट अप उपक्रमासोबत आलेले सरकारी शिष्टमंडळ म्हणजे स्वागतार्ह बाब आहे आणि शाश्वत स्टार्ट अप्स राखण्यासाठी दोन्ही बाजूंकडून नवोन्मेषी पूरक व्यवस्थेचा पुरेपूर वापर करण्यात येईल.
वैज्ञानिक नवोन्मेषाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि आपल्या प्रत्येक भाषणात पंतप्रधानांनी सागरी विज्ञान, हवामान बदल आणि जैव इंधने यांसारख्या वैज्ञानिक प्रकल्पांना अधोरेखित केले आहे याकडे डॉ. जितेंद्र सिंह यांनी मेक्सिकन शिष्टमंडळाचे लक्ष वेधले. भारत आणि मेक्सिको म्हणजे ‘विशेषाधिकारप्राप्त भागीदार’ असल्याचे सांगत ते म्हणाले की दोन्ही देश अनेक क्षेत्रात एकमेकांना पूरक असून परस्परांना सहाय्य करू शकतात आणि आपण अतिशय योग्य मार्गावर आहोत.
मेक्सिकोकडून मागणी करण्यात आलेल्या जल, लिथियम आणि लसी या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांवर सीएसआयआर आणि इतर सहयोगी संस्थांकडून देखरेख करण्यात येईल आणि आगामी काही महिन्यांमध्ये या संदर्भात भारताकडून समाधानकारक तोडगे उपलब्ध केले जातील, अशी ग्वाही डॉ. जितेंद्र सिंह यांनी मेक्सिकन परराष्ट्रमंत्र्याना दिली. भारत आणि मेक्सिको यांच्यात शाश्वत स्टार्ट अप्सच्या भविष्यकालीन दृष्टीव्यतिरिक्त लिथियम हा विषय खऱ्या अर्थाने दोन्ही देशांना जोडणारा महत्त्वाचा विषय आहे, असे ते म्हणाले. या सामंजस्य करारासाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीची मंत्र्यांनी प्रशंसा केली आणि यातून भारताशी असलेल्या संबंधांबाबत मेक्सिकन सरकारचे गांभीर्य प्रतिबिंबित होत आहे, असे त्यांनी सांगितले.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून सीएसआयआर आणि मेक्सिकन संस्था, तंत्रज्ञान विकासासाठी संशोधन आणि नवोन्मेषी भागीदारीच्या माध्यमातून परस्परांच्या बौद्धिक संपदेला व्यावसायिकीकरणासाठी आणखी उंचावतील आणि संशोधनविषयक पायाभूत सुविधांचा विकास आणि देवाणघेवाणीसाठी जागतिक समाजात अतिशय प्रभावी योगदान देऊ शकतील, याकडे डॉ. जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले.
नियमित संशोधन आणि विकास, क्षमतावृद्धी आणि ज्ञानप्रसाराच्या उपक्रमांमध्ये प्रशिक्षण आणि सहभाग या व्यतिरिक्त तंत्रज्ञान आणि उद्योग यातील सहकार्यावर या सामंजस्य करारामध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
विशिष्ट सहकार्यात्मक प्रस्ताव निवडण्यासाठीचा एक मार्ग म्हणून सीएसआयआर आणि मेक्सिकोमधील संस्थांमध्ये कटिबंधीय संवाद बैठकांचे या महिन्यातच नियोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये आरोग्य, ऊर्जा, एरोस्पेस आणि पर्यावरण रक्षणाच्या मुद्यांवर भर असेल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. उद्योग आणि इतर हितधारकांसोबत सल्लामसलतीने सहकार्य प्रस्ताव अंतिम करण्यासाठी या बैठका अतिशय उपयुक्त असतील असे त्यांनी सांगितले.
कोविड महामारी चा प्रकोप सर्वोच्च स्तरावर असताना मेक्सिको साठी कोविड प्रतिबंधक लसी पाठवल्याबद्दल मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि इतर अनेक आधुनिक महासत्ता आणि मित्रांनी लसी पाठवण्यासंदर्भात सुरुवातीला साशंकता दर्शवली असताना मेक्सिकोला लसी पाठवणारा भारत हा पहिला देश होता असे अधोरेखित केले
भारतासोबत अतिशय घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावेत आणि संयुक्त धोरणात्मक दृष्टीकोनातून काम करावे असे निर्देश मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रिआस मॅन्युएल ओब्रादोर यांनी मेक्सिकन शिष्टमंडळाला दिले आहेत, असे एब्रार्ड म्हणाले. भारत आणि मेक्सिको यांच्यातील द्विपक्षीय संबंध अतिशय जुने आहेत आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहेत पण द्विपक्षीय संबंध जोडणारा हा सर्वोत्तम क्षण आहे, असे त्यांनी सांगितले.
मार्सेलो एब्रार्ड यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या भारत भेटीदरम्यान डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती आणि लसी, माहिती तंत्रज्ञान, हरित क्रांती, आरोग्य, जैवतंत्रज्ञान आणि अंतराळ यांसारख्या नव्या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञानविषयक भागीदारी करण्याची मागणी केली होती याची आठवण या निमित्ताने होत आहे.
***
G.Chippalkatti/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904271)
Visitor Counter : 173