कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या 3 दिवसीय जी 20 बैठकीत मालमत्ता वसुली, फरारी आर्थिक गुन्हेगार, माहितीची देवाणघेवाण, भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी संस्थात्मक चौकट आणि परस्पर कायदेशीर सहाय्याशी संबंधित अनेक प्रमुख क्षेत्रांवर गहन आणि फलदायी चर्चा
भ्रष्टाचार आणि संबंधित आर्थिक गुन्हेगारी विरुद्ध कारवाईसाठी कायदेशीर अंमलबजावणी सहकार्य बळकट करण्याच्या आवाहनासह हरियाणातील गुरुग्राम येथे जी 20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या पहिल्या बैठकीची सांगता
Posted On:
03 MAR 2023 6:19PM by PIB Mumbai
केंद्रीय कार्मिक आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 1 मार्च रोजी उदघाटन झालेल्या जी 20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या (एसीडब्ल्यूजी) पहिल्या बैठकीची आज गुरुग्राममध्ये सांगता झाली. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आणि जी 20 एसीडब्ल्यूजी चे अध्यक्ष राहुल सिंह, इटलीच्या कृती दलाचे प्रमुख आणि जी 20 एसीडब्ल्यूजीचे सहअध्यक्ष जिओव्हानी टार्टाग्लिया पोलसिनी यांनी एसीडब्ल्यूजी बैठकीच्या शेवटी माध्यमांना संबोधित केले.

राहुल सिंह यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांमध्ये मालमत्ता वसुली, फरारी आर्थिक गुन्हेगार, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सहकार्याची औपचारिक आणि अनौपचारिक माध्यमे, भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी संस्थात्मक चौकट आणि परस्पर कायदेशीर सहाय्य यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर सखोल आणि फलदायी चर्चा झाली. यामध्ये देशांचे प्रतिनिधी आणि यूएनओडिसी, ओईसीडी, एग्मोन्ट ग्रुप, इंटरपोल आणि आयएमएफ मधील तज्ज्ञांचे सादरीकरण आणि मध्यस्थी यांचा समावेश होता. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीश चंद्र मुर्मू, केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख भाषणांनी एसीडब्ल्यूजी ची बैठक परिपूर्ण झाली.

मान्यवरांना गुरुग्राम येथे त्यांच्या मुक्कामादरम्यान भारताच्या समृद्ध संस्कृती, वारसा आणि पाककृतीचा आस्वाद देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, हे राहुल सिंह यांनी अधोरेखित केले.
प्रसारमाध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना, जिओव्हानी टार्टाग्लिया पोलसिनी यांनी जी 20 एसीडब्ल्यूजी मधील भारताच्या कार्यक्रम पत्रिकेला इटलीच्या दृढ समर्थनाची पुष्टी केली. गुरुग्राम येथे पहिल्या जी 20 एसीडब्ल्यूजी चे आयोजन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
जी 20 एसीडब्ल्यूजी च्या पहिल्या बैठकीत 20 सदस्य देश, 10 निमंत्रित देश आणि 9 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून 90 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते, जे भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांमधील आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या समृद्धीचे सच्चे प्रतिनिधित्व आहे. जी 20 एसीडब्ल्यूजी चे सह-अध्यक्ष म्हणून इटलीच्या उपस्थितीबद्दल भारताने प्रामाणिक कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त केली.
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904087)