राष्ट्रपती कार्यालय
जर्मनीच्या चॅन्सेलरनी घेतली राष्ट्रतींची भेट
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2023 6:26PM by PIB Mumbai
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. पहिल्यांदाच जर्मनीचे चॅन्सेलर म्हणून भारताच्या भेटीवर आलेल्या शुल्झ यांचे राष्ट्रपतींनी स्वागत केले. भारत आणि जर्मनी यांच्यात अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध असून हे संबंध सामायिक मूल्ये आणि उद्दिष्टे यांनी एकत्र गुंफलेले आहेत, असे राष्ट्रपतींनी शुल्झ यांचे स्वागत करताना सांगितले. आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये विविध क्षेत्रांचा समावेश असून यातून अनेक वर्षांपासून जोपासलेल्या परस्पर विश्वासाचे प्रतिबिंब दिसून येते. अनेक दशकांपासून जर्मनी हा भारताचा युरोपमधील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तसेच सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे असे राष्ट्रपतींनी नमूद केले. त्याच प्रकारे जर्मनी भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विकास सहकार्य भागीदार आहे आणि भारताच्या विकासाच्या प्रवासात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडच्या काही वर्षात उच्च शिक्षण घेण्याची, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणाची इच्छा असलेले भारतीय विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी पसंतीचा देश म्हणून जर्मनीचा उदय झाला आहे. भारतावर अभ्यास करणाऱ्या अनेक भारत अभ्यासकांच्या प्रदीर्घ परंपरेमुळे भारत आणि जर्मनी यांच्यात अतिशय मजबूत सांस्कृतिक संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. भारत आणि जर्मनी यांची लोकशाही मूल्यांचे महत्त्व कायम राखणे, नियम आधारित आंतरराष्ट्रीय सीमा, बहुपक्षवाद त्याचबरोबर बहुपक्षवाद संस्थांमध्ये सुधारणा करणे यांसारखी सामाईक उद्दिष्टे आहेत. दोन सचेतन, बहुपक्षवादी लोकशाही देश म्हणून भारत आणि जर्मनी नव्या आणि उदयाला येणाऱ्या जागतिक आव्हानांचे निराकरण करू शकतील.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902366)
आगंतुक पटल : 231