रेल्वे मंत्रालय
रेल्वे सुरक्षा विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी यूआयसी जागतिक सुरक्षा काँग्रेसने आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन
Posted On:
22 FEB 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
रेल्वे सुरक्षा दल आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना यांनी जयपूरमध्ये संयुक्तपणे आयोजित केलेल्या 18 व्या युआयसी जागतिक सुरक्षा काँग्रेसच्या आजच्या दुसऱ्या दिवशी जगभरातील सर्वोत्तम रेल्वे सुरक्षा साधने आणि पद्धतींचा शोध घेण्यावर भर देण्यात आला. तिसर्यांदा भारतात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, रेल्वे क्षेत्रात सध्या भेडसावणाऱ्या सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि अभिनव उपायांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील आघाडीचे सुरक्षा तज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग प्रमुख सहभागी झाले आहेत.
सकाळच्या सत्रात उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप आणि भारतातील सर्वोत्तम रेल्वे सुरक्षा साधने आणि पद्धतींवर सादरीकरण झाले. रेल्वेगाड्या आणि स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यासाठी विविध राष्ट्रे तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संबंधित प्रक्रियांचा कसा वापर करत आहेत, हे सादरीकरणात अधोरेखित करण्यात आले.
रेल्वे स्थानक हे प्रवाशांसाठी केवळ प्रवेश करण्याचे आणि बाहेर जाण्याचे ठिकाण नाही तर सामाजिक, नागरी आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र म्हणून पाहण्याची गरज, विविध क्षेत्रांद्वारे हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची मध्यवर्ती संकल्पना होती. युक्रेनमधील निर्वासितांच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी विकसित केलेल्या उपायांवर पोलंडच्या प्रतिनिधी मॅग्डालेना कुजासिंस्का यांनी सामायिक केलेल्या अनुभवांमध्ये ही बाब समोर आली. भारताचे प्रतिनिधीत्व करताना, महाराष्ट्र रेल्वे पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे आणि मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक अजय सदानी यांनी मुंबईत राज्य पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने औपचारिक सुरक्षा यंत्रणा आणि नागरी वातावरणानुसार उपाय कसे विकसित केले याची माहिती दिली.
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागात, सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना विकसित करताना प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून पोलिसांद्वारे कायदा सुव्यवस्था राखण्याची मागणी केली. फ्रान्सचे व्हिन्सेंटरोक, बेल्जियमच्या डेल्फिन बीटसे, सेनेगलचे सांबा एनडियाये आणि यासीन सर, सौदी अरेबियातील अब्दुल्ला अलोतयबि , कॅनडातून ऑनलाइन सहभागी झालेले पीटर लॅम्ब्रिनाकोस यांनीही अतिशय उपयुक्त सादरीकरण केले.
“व्हिजन 2030” या संकल्पनेच्या दुपारच्या सत्रात भारताच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भविष्यातील सुरक्षा आव्हानांवर चर्चेचे प्रास्ताविक केले. रेल्वे पोलीस दलाचे माजी महासंचालक अरुण कुमार, कॅबिनेट सचिवालयच्या माजी सचिव (सुरक्षा) व्ही.एस.के.कौमुदी, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे अतिरिक्त सचिव एस एम सहाय यांनी या आव्हानांवर चर्चा केली , ज्यामध्ये रेल्वे क्षेत्राचा भारताच्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये विस्तार होत असताना अनोख्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. गुन्हेगारीच्या नव्या पद्धती आणि संभाव्य धोक्यांचा अंदाज वर्तवण्यासाठी एक सूचक यंत्रणा स्थापन करून मजबूत रेल्वे सुरक्षा विषयक पायाभूत सुविधा विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
सायबर सुरक्षा, अति-जलद रेल्वेची सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि दहशतवाद यासारख्या उदयोन्मुख धोक्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी या संस्थांना अधिक प्रयत्न करावे लागतील हे उपस्थितांच्या लक्षात आले. परदेशी प्रतिनिधी आणि भारताचे कायदे अंमलबजावणी करणारे वरिष्ठ अधिकारी यांना त्यांच्यासमोरील सामायिक रेल्वे सुरक्षा आव्हानांबाबत सूचना आणि मते सामायिक करण्यासाठी सहा गटांमध्ये विभागले होते, त्यामुळे भोजनाच्या वेळेतही ही चर्चा सुरू राहिली.
या परिषदेबद्दलची अधिक माहिती, नोंदणीचे तपशील आणि कार्यक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया https://uicwsc23.in. ला भेट द्या.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901543)
Visitor Counter : 188