वस्त्रोद्योग मंत्रालय
10 व्या 'टेक्नोटेक्स 2023' - या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि तांत्रिक वस्त्रोद्योगावरील परिषदेचा मुंबईत प्रारंभ
वस्त्रोद्योग क्षेत्राचे भवितव्य तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या विकासाशी दृढतेने निगडित आहे : राज्यमंत्री (वस्त्रोद्योग) दर्शना जरदोश
"भारताचे G20अध्यक्षपद आपल्या वस्त्रप्रावरणे, तयार कपडे आणि व्यापारी उद्योगाला बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते"
बी टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यासाठी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी, प्रति महिना रु. 20,000 अनुदान मिळणार
Posted On:
22 FEB 2023 8:04PM by PIB Mumbai
मुंबई , 22 फेब्रुवारी 2023
मुंबईतील गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रामध्ये आयोजित, टेक्नोटेक्स 2023 -भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योग दृष्टीकोन @2047' या 10 व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि तांत्रिक वस्त्रोद्योगावरील परिषदेचे उद्घाटन, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते आज झाले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की ) द्वारे आयोजित टेक्नोटेक्स हा खरेदीदार-विक्रेता संमेलन, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद यांचा समावेश असलेला पथदर्शी कार्यक्रम आहे. 22 - 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक तांत्रिक वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील हितसंबंधितांमध्ये परस्पर संवादासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी यावेळी 'भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग कार्यक्षेत्र : बाजारपेठ आढावा , मूलभूत दुवे आणि विकासाच्या संधी' या तांत्रिक वस्त्रोद्योगावरील ई-पुस्तकाचे प्रकाशन केले. ई-बुक येथे पाहता येईल.
वस्त्रोद्योग क्षेत्राचे भवितव्य तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या विकासाशी दृढतेने निगडित आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी उद्योग प्रतिनिधी आणि इतर संबंधितांना संबोधित करताना सांगितले. जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात वाढ होत असल्याने भारताला या विस्ताराचा फायदा होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. आगामी काही वर्षांमध्ये देशांतर्गत उपभोग आणि निर्यात या दोन्हींमध्ये वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे या उद्योगासाठी हा एक महत्त्वाचा काळ ठरत आहे, असेही त्या म्हणाल्या.
उत्पादन आणि मूल्याच्या बाबतीत भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योग झपाट्याने विस्तारत आहे आणि वाहन , कृषी, गृह निगा (होम केअर ), बांधकाम, एरोस्पेस, संरक्षक साधने आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील विविध उद्योगांना तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या उत्पादनांचा फायदा होत आहे. अन्य उद्योगांमध्ये या उत्पादनांमध्ये अधिक टिकाऊपणा आणि सामर्थ्य तसेच उत्तम औष्णिक आणि रासायनिक प्रतिकार यासारखे कार्यात्मक गुणधर्म यात सुधारणा झाली आहे."उत्पादन प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात करण्यात येणारा तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वापर विविध प्रकारच्या उद्योगांना परिपूर्ण करतो, त्यामुळे ते भारतातील उच्च मूल्याचे क्षेत्र बनते",याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.
भारत हा वस्त्रप्रावरणे आणि तयार कपडे निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी यावेळी दिली.आपण कापडाच्या कमी किंमतीच्या कच्च्या मालापासून तयार कपडे, औद्योगिक आणि तांत्रिक वस्त्रोद्योग यांसारख्या उच्च मूल्याच्या उदयोन्मुख उद्योगांकडे वळलो आहोत आहेत,असे त्यांनी सांगितले.
उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना, एचएसएन कोड्स, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान यासारख्या उपक्रमांसह तांत्रिक वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे, असे वस्त्रोद्योग राज्यमंत्र्यांनी सांगितले. “मानवनिर्मित फायबर फॅब्रिक आणि तयार कपडे आणि तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी वस्त्रोद्योग उत्पादन संलग्न योजने (पीएलआय ) अंतर्गत उत्पादनासाठी रु. 19,798 कोटींची गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे.उद्योग क्षेत्राचा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे.”, असे त्यांनी नमूद केले.
भारताचे G20अध्यक्षपद आपल्या वस्त्रोद्योग, तयार कपडे आणि व्यापारी उद्योगाला बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, असे त्या म्हणाल्या. पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा हा मूलत: एक डिजिटल मंच असून हा मंच महामार्ग, रेल्वे,पाटबंधारे, ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, सिंचन, आरोग्यसेवा, यांसारख्या पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वयित अंमलबजावणीसाठी रेल्वे आणि रस्ते मंत्रालयासह 16 मंत्रालयांना एकत्र आणेल. पीएम गति शक्ती तांत्रिक वस्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देते, असे त्या म्हणाल्या.
रु, 1,480 कोटी खर्चाच्या राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाचाही मंत्र्यांनी उल्लेख केला. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या प्रमुख स्तंभांमध्ये संशोधन नवोन्मेष आणि विकास ’, ‘जाहिरात आणि बाजारपेठ विकास ’, ‘शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य’ आणि ‘निर्यात प्रोत्साहन’ यांचा समावेश आहे. धोरणात्मक क्षेत्रांसह देशातील विविध पथदर्शी मोहिमांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये तांत्रिक वस्त्राचा वापर वाढवण्यावर या अभियानात भर देण्यात येत आहे, असे दर्शना जरदोश यांनी सांगितले. नवी ज्ञान प्रणाली विकसित करण्यासाठी तसेच तांत्रिक वस्त्रोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
डिझाइन, अभियांत्रिकी, फॅब्रिकेशन आणि प्रोटोटाइपिंग या क्षेत्रात स्थानिक कौशल्याचा वापर करून तांत्रिक वस्त्रोद्योगातील यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या स्वदेशी विकास, वस्त्रोद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करून आपल्या राष्ट्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
प्रशिक्षण समर्थन अनुदानाच्या सामान्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार (जीआयएसटी), सूचीबद्ध कंपन्यांना द्वितीय/तृतीय/चतुर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या बी. टेक च्या विद्यार्थ्यांना संबंधित विभाग / पात्र खाजगी / सार्वजनिक संस्थांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान करण्यासाठी दरमहा रु. 20,000 प्रति विद्यार्थी अनुदान देण्यात येणार आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली. ही अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाईल, (i) पात्र कंपन्यांची सूचीबद्धता, (ii) प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण कालावधीत जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या निधी समर्थनाच्या अधीन. पात्र संस्था 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या तसेच मंत्रालयाच्या अंतर्गत वस्त्र संशोधन संघटना आणि कापड यंत्रे उत्पादक संघटनेशी संलग्न कापड उद्योग असतील. सूचीबद्ध केलेले उद्योग/ संस्था संबंधित विषयातील अभियांत्रिकी संस्थांना सार्वजनिकरित्या अर्थसहाय्यित संस्थांमध्ये तसेच राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन यादीत (NIRF) 200 क्रमांकापर्यंत श्रेणीबद्ध असलेल्या खाजगी संस्थांना प्रशिक्षण देऊ शकतात. यामुळे तांत्रिक वस्त्रांच्या क्षेत्रात उत्पादनासाठी उद्योग प्रशिक्षित अभियंत, व्यावसायिक, आणि उच्च कुशल कामगार तयार करण्यात मदत होईल. यासोबतच या उद्योगाचे सहाय्यक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहनही मिळेल.
नवी मार्गदर्शक तत्त्वे तांत्रिक वस्त्रोद्योगामध्ये खाजगी आणि सार्वजनिक शैक्षणिक संस्थांना सक्षम करुन नवीन तांत्रिक वस्त्र पदवी कार्यक्रम ( स्नातक आणि स्नातकोत्तर) सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान पारंपरिक पदवी कार्यक्रमांना तांत्रिक वस्त्रांवरील नवीन विषयासह अद्यतनित करण्यास सक्षम करतील, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. केवळ वस्त्रोद्योग क्षेत्रातच नव्हे तर अभियांत्रिकीच्या इतर शाखा जसे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स इ. याशिवाय कृषी संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तांत्रिक वस्त्रांमध्ये नवी प्रणाली विकसित करण्याचा मंत्रालयाचा मानस आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. यामध्ये पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) पदवी कार्यक्रमांच्या संदर्भात प्रयोगशाळा उपकरणांचे अद्यतन/सुधारणा, प्रयोगशाळा कर्मचार्यांचे प्रशिक्षण आणि विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विभाग/विशेषीकरणाच्या शिक्षक सदस्यांचे विशेष प्रशिक्षण यांचा समावेश असेल.
टेक्नोटेक्स 2023, हे भारताला आघाडीचे तांत्रिक वस्त्र उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृढ प्रयत्नाचे प्रतिनिधित्व करणारे आयोजन आहे, असे मंत्री म्हणाले.तांत्रिक वस्त्रोद्योग स्टार्टअपसाठी एक योजना तयार केली जात आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव राजीव सक्सेना यांनी सांगितले. या क्षेत्रातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. या उपक्रमाचा एक घटक संशोधन आणि विकासाशी संबंधित आहे आणि ही योजना उद्योग आणि संशोधन संस्थांसाठी खुली आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात उच्च दर्जाची तांत्रिक वस्त्रोद्योग यंत्रे तयार करता यावीत यासाठी या उपक्रमाद्वारे वस्त्रोद्योग मंत्रालय योग्य प्रस्ताव आमंत्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रालय बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि तांत्रिक वस्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर मंत्रालयांसोबत काम करत आहे, असेही ते म्हणाले.
उद्योगाच्या वाढीला समर्थन देणारी शाश्वत आणि नाविन्यपूर्ण प्रणाली तयार करण्यासाठी वस्त्रोद्योग सरकारसोबत काम करेल असे आश्वासन फिक्की टेक्नोटेक्स आयोजन समितीचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक मोहन कावरी यांनी दिले.
भारतीय उद्योगाला तांत्रिक वस्त्रांच्या अपेक्षित जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची आणि जागतिक बाजारपेठेत प्रमुख पुरवठादार बनण्याची मोठी संधी आहे, असे फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य आर. डी. उदेशी यांनी सांगितले
तीन दिवसीय प्रदर्शनासोबतच परिषद आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन, 2047 मध्ये भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योगाची कल्पना करण्याचा प्रयत्न करते. हे प्रदर्शन तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात भारत आणि इतर देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीच्या अफाट संभाव्यतेचे उदाहरण देते. तसेच तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या विविध विभागातील सहभागी, अभ्यागत आणि इतर प्रमुख निर्णय निर्मात्यांना एकत्रित आणून अधिक नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करणे, नवीन व्यवसाय संधी ओळखणे आणि वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे यासारख्या बाबींना चालना देते. या प्रदर्शनाची कार्यक्रम पत्रिका येथे पहा.
उद्घाटन सोहळा येथे पाहता येईल.
S.Patil/Sonal C/Shraddha/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901538)
Visitor Counter : 214