संरक्षण मंत्रालय

सागरी सुरक्षा: माहिती एकत्रीकरण केंद्र -हिंद महासागर क्षेत्र (आयएफसी -आयओआर) आणि प्रादेशिक समन्वय परिचालन केंद्र (आरसीओसी ) यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 22 FEB 2023 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023

सागरी सुरक्षा आणि संरक्षण  क्षेत्रात विद्यमान सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी,माहिती एकत्रीकरण  केंद्र -हिंद महासागर क्षेत्र (आयएफसी -आयओआर )  ने 21 फेब्रुवारी 2023 रोजी सेशेल्सच्या प्रादेशिक समन्वय परिचालन केंद्राबरोबर सामंजस्य करार केला. आयएफसी -आयओआर चे संचालक कॅप्टन रोहित वाजपेयी आणि आरसीओसीचे संचालक कॅप्टन सॅम गोंटियर यांनी स्वाक्षरी केलेल्या या सामंजस्य कराराचा उद्देश सागरी क्षेत्राबाबत जागरूकता, माहितीची देवाणघेवाण आणि कौशल्य विकास वृद्धिंगत करण्यासाठी  दोन्ही केंद्रांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे हा आहे.

भारतीय नौदलाच्या  आयएफसी -आयओआरची स्थापना भारत सरकारने 22 डिसेंबर 2018 रोजी गुरुग्राम येथे केली. प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या भारताच्या दृष्टीकोनानुसार ( सागर)  हिंद महासागर क्षेत्रात सहकार्यात्मक सागरी संरक्षण आणि सुरक्षा वृद्धिंगत करणे हा यामागचा उद्देश होता. उत्तम संबंध, संकलित माहिती चक्र आणि वेळेवर सूचना देता याव्यात यासाठी आयएफसी -आयओआरने भागीदार राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय संपर्क अधिकाऱ्यांना भारतात आमंत्रित केले होते. आतापर्यंत या केंद्राने ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, जपान, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, श्रीलंका, सेशेल्स, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका या 12 भागीदार राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय संपर्क अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे.

हिंद महासागर आयोगाद्वारे अंमलबजावणी करण्यात आलेल्या पश्चिम हिंद महासागरातील सागरी सुरक्षा व्यवस्थेला  प्रादेशिक सागरी माहिती एकत्रीकरण केंद्र (RMIFC), प्रादेशिक परिचालन समन्वय केंद्र  (RCOC) आणि स्वाक्षरी करणाऱ्या सात  देशांची कोमोरोस, जिबूती, फ्रान्स, केनिया, मादागास्कर, मॉरिशस आणि सेशेल्स) राष्ट्रीय केंद्रे सहाय्य करत आहेत.

स्थापना झाल्यापासून आयएफसी -आयओआरने अनेक बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा केंद्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत आणि सध्याचा उपक्रम आयएफसी -आयओआर  आणि आरसीओसी  यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करेल. या दृष्टीकोनामुळे  पश्चिम हिंद महासागरावर विशेष लक्ष केंद्रित करून केंद्रांना चाचेगिरी आणि सशस्त्र दरोडा, मानवी आणि प्रतिबंधित तस्करी, बेकायदेशीर अनियंत्रित आणि बेकायदेशीर मासेमारी, शस्त्रे चालवणे, शिकार करणे, सागरी दहशतवाद, यासारख्या अपारंपरिक सागरी सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी एक सामायिक सागरी सामंजस्य प्रभावीपणे विकसित करण्यास मदत होईल.

या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना आरसीओसी आणि आयएफसी -आयओआरच्या दोन्ही संचालकांनी  समुद्रातील घडामोडींबाबत माहितीचे आदान-प्रदान आणि विश्लेषण वृद्धिंगत करण्याच्या गरजेबाबत सहमती दर्शवली. हा सामंजस्य करार हिंद महासागर क्षेत्रातील सहकार्यात्मक सागरी संरक्षण आणि सुरक्षा वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रांमध्ये विश्वास वाढवेल आणि समन्वय सुधारेल असे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाला आयओसीचे सरचिटणीस आणि प्रतिनिधी, सेशेल्समधील भारताचे उच्चायुक्त आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1901446) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil