संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

IDEX आणि NAVDEX 23 मध्ये सहभागी होण्यासाठी आयएनएस सुमेधा अबू धाबीत दाखल

Posted On: 20 FEB 2023 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 फेब्रुवारी 2023

 

20 ते 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित  NAVDEX 23 (नौदल संरक्षण प्रदर्शन) आणि IDEX 23 (आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन) मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे  सुमेधा हे जहाज 20 फेब्रुवारी 2023 रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी येथे दाखल झाले. आघाडीच्या दोन प्रादेशिक आणि  नौदल संरक्षण प्रदर्शनांमध्ये या जहाजाचा सहभाग भारताच्या स्वदेशी जहाज बांधणीचे सामर्थ्य प्रदर्शित  करेल तसेच पंतप्रधानांचे 'आत्मनिर्भर भारत' स्वप्न अधोरेखित करेल.

आयएनएस सुमेधा हे स्वदेशी बनावटीच्या शरयू श्रेणीतील तिसरे गस्तीचे जहाज आहे आणि 7 मार्च 2014 रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आले होते. गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे या जहाजाची निर्मिती करण्यात आली असून ते शस्त्रे आणि सेन्सर्सच्या प्रभावी श्रेणीने सज्ज आहे आणि एक इंटिग्रल  हेलिकॉप्टर वाहून नेऊ  शकते आणि कठीण प्रसंगातही तग धरू शकते. विविध मोहिमांसाठी तैनात करता येणारे एक अत्यंत शक्तिशाली जहाज असून भारतीय जहाज बांधणी उद्योगाची क्षमता सिद्ध करते. युएई द्वारे आयोजित या कार्यक्रमातील जहाजाचा सहभाग भारत आणि युएई यांच्यातील धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित करतो. 

जानेवारी 2017 मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून अबू धाबीचे तत्कालीन युवराज  आणि यूएईचे विद्यमान अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध 'व्यापक धोरणात्मक भागीदारी'मध्ये रूपांतरित झाले  होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2022 मध्ये चौथ्यांदा यूएईला भेट दिली ज्यामुळे संबंध अधिक दृढ झाले.

दोन्ही नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढवण्यासाठी, झायेद तलवार हा भारतीय नौदल-यूएई नौदल द्विपक्षीय सराव मार्च 2018 मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आला होता. तर शेवटचा सराव ऑगस्ट 2021 मध्ये झाला होता. भारतीय नौदलाच्या जहाजांनी सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यूएई बंदराला नियमित भेटी दिल्या आहेत. अबुधाबीमध्ये सुमेधाचा सहभाग हे त्याच दिशेने एक पाऊल आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1900843) Visitor Counter : 231


Read this release in: English , Urdu , Hindi