कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हैदराबाद येथे आयोजित वैज्ञानिक प्रशासकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात; आयजीओटी मॉड्यूल्सचेदेखील केले उद्घाटन
Posted On:
17 FEB 2023 2:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज हैदराबाद येथील भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयात वैज्ञानिक प्रशासकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली.
या प्रसंगी, केंद्रीय मंत्र्यांनी आयजीओटी मंचाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या प्रशासनविषयक अभ्यासक्रमाच्या मॉड्यूलचेदेखील उद्घाटन केले.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, महामारी, शाश्वतता आणि हवामान बदल यांसारख्या आपल्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची जोड अत्यावश्यक ठरते. म्हणूनच, आपल्याला तंत्रज्ञानविषयक प्रशासन या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे समजून घ्यावे लागेल असे ते म्हणाले.
वैज्ञानिकांसाठी ‘विज्ञान संवाद’या विषयावरील अभ्यासक्रम सुरु होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. सिंह यांनी आनंद व्यक्त केला. हे सर्व प्रयत्न ज्यांच्यासाठी सुरु आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांशी, आपल्या सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग कोणकोणती कार्ये करत आहे याविषयी संवाद साधणे हे विज्ञान या विषयाला लोकप्रियता मिळवून देण्यातील सर्वात पहिले आव्हान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आयजीओटी मंचावरील अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन लोकांसाठी सुरु असलेले वैज्ञानिक क्षेत्रातील कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवावे असा आग्रह केंद्रीय मंत्र्यांनी सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांना केला.
वैज्ञानिक प्रशासकांसाठीच्या या अभ्यासक्रमाची रचना एएससीआय आणि सीबीसी यांनी केली असून त्यात खासगी क्षेत्राशी सहकारी संबंध स्थापन करण्याच्या दृष्टीने देखील सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली.
ज्येष्ठ वैज्ञानिकांसाठी आयोजित परिणामकारक नेतृत्व आणि सर्जनशीलतेवर आधारित या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की त्यातून, सर्जनशील मानसिकतेच्या कौशल्यांची माहिती सहभागी वैज्ञानिकांना देणे, प्रभावी नेते बनण्यासाठी विविध योग्यता शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यातून विज्ञानविषयक संस्थांना आजच्या स्पर्धात्मक वातावरणात अधिक प्रभावीपणे काम करण्यास सक्षम करणे ही उद्दिष्ट्ये साध्य होतील.
S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900147)
Visitor Counter : 184